गौरी खेर
‘सॉफ्ट स्किल्स’ प्रशिक्षक
अंगभूत गुणांना सॉफ्ट स्किल्सची जोड लाभली की तुमचे व्यक्तिमत्त्व चौफेर होते. जागतिकीकरणानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आपल्याकडे झालेल्या आगमनानंतर कॉर्पोरेट वातावरणात वाढलेल्या स्पर्धात्मकतेला सामोरे जाण्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास होणे आवश्यक ठरते आणि त्याकरता सॉफ्ट स्किल्स विशेष महत्त्वाची ठरतात. नोकरीच्या बाजारपेठेत तुम्हाला झुकते माप मिळावे याकरता संवादकौशल्ये, नेतृत्वक्षमता, सांघिकरीत्या काम करणे, आत्मविश्वास अशी अनेक सॉफ्ट स्किल्स तुमच्यात बाणवणे आवश्यक ठरते. या कौशल्याच्या विकासाकरता विद्यार्थिदशेतच प्रत्येकाने प्रयत्नशील राहायला हवे.
वाचन, निरीक्षण, समाजात मिसळणे, विद्यार्थिदशेत लहानसहान कामे करणे याद्वारे सॉफ्ट स्किल्सना झळाळी प्राप्त होते. व्यावसायिक जगात वावरताना वागण्या-बोलण्याची तंत्रे या विषयीचे काही नियम असतात. ते माहीत असणे आणि त्याचे पालन करणे अध्याहृत असते. पेहराव, फोन, ई-मेल विषयक एटिकेट पाळावे लागतात. विद्यार्थिदशेत या सर्वच बाबतीत काहीसे सैलसर वागणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या. पालकवर्गानेही परीक्षेतील गुणांच्या पलीकडेही अनेक गोष्टी करिअर घडवण्यासाठी आवश्यक असतात, हे लक्षात घ्यायला हवे.
सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यासाठी महाविद्यालय हे उत्तम व्यासपीठ असते. महाविद्यालयीन स्पर्धामध्ये, विद्यार्थी मंडळांमध्ये सहभागी होणे या गोष्टी सॉफ्ट स्किल्सच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. अभ्यासेतर छंद जोपासण्यातूनही व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विकसित होतात.
पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या बाजारपेठेत उतरताना स्व-परिचय पत्र (बायोडेटा), मुलाखतीची तयारी, पेहराव आदी बारीकसारीक घटकांकडे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे ठरते. गटचर्चा अथवा मुलाखतीत उत्तम कामगिरी होण्याकरता संवादकौशल्य आवश्यक असते आणि ते अवांतर वाचनाने वृद्घिंगत होते. बायोडेटामध्ये नमूद केलेल्या ई-मेल आयडीत शक्यतो आपले नाव व आडनाव असावे. छंद म्हणून जो नमूद केला असेल त्याची सविस्तर आणि ठोस माहिती तुमच्याकडे असायला हवी. अनेकदा छंद मोघम व चुकीचा नमूद केल्याने मुलाखतीच्या वेळी अडचणी निर्माण होतात.
वयाच्या १८ वर्षांपर्यंत व्यक्तिमत्त्व विकसित होत असते. तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी दुसरे कुणीही नाही तर तुम्ही स्वत: जबाबदार असता. दहावी ते पदवी प्राप्त होण्याचा कालावधी हा ऊर्जादायक आणि उत्साहवर्धक असतो. तो वायफळ घालवण्यापेक्षा नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी उपयोगात आणायला हवा. सुट्टीच्या कालावधीत जर अर्धवेळ काम केले तर वास्तव जगाचा परिचय विद्यार्थ्यांना होऊ शकतो. पालकांनीही विद्यार्थ्यांला सुरक्षित कवचात वाढवण्यापेक्षा उघडय़ा जगात धडपडण्याची, टक्केटोणपे खाण्याची संधी मुलाला दिली तर ते मूल निश्चितच लवकर प्रगती साधते.

– श्रीकांत सावंत, संकेत सबनीस, शर्मिला वाळूंज