एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

चालू घडामोडी हा घटक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात आधी नमूद करण्यात येतो. कारण सगळ्याच घटक विषयांचे पारंपरिक ज्ञान आणि विषयाची समज परीक्षेमध्ये तपासली जाणार असली तरी त्यापुढे जाऊन उमेदवारांना त्या त्या विषयाशी संबंधित अद्ययावत माहिती असणे आणि तिच्याबाबत त्यांनी जागरूक असणेही आयोगाला अपेक्षित आहे. त्या दृष्टीने चालू घडामोडी हा घटक म्हटले तर वेगळा आणि म्हटले तर इतर घटक विषयांचा संदर्भ असा विचारात घेता येतो.

revised dates of mpsc exam declared soon
‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….
मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…

अनेक जागतिक घटनांचा प्रभाव भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांवर पडत असतो. या सर्व बदलांचे प्रतिबिंब  ‘सामान्य अध्ययन’ प्रश्नपत्रिकेत उमटते. हे लक्षात घेऊन चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी, तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करणे आवश्यक आहे. या घटकाबाबत मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या  विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात येतात :

अभ्यासक्रमामध्ये जागतिक आणि भारतातील चालू घडामोडी असा उल्लेख आणि ढोबळ वर्गीकरण केलेले असले तरी या घटकामध्ये बऱ्याच व्यापक बाबी समाविष्ट होतात. यामध्ये राज्यातील चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान स्वरूपाचे प्रश्नही समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ राज्य महिला आयोगाच्या कार्याबाबत, तसेच साहित्य अकादमीबाबत पारंपरिक मुद्दे विचारण्यात आले आहेत. तसेच राज्यातील व्यक्तिविशेष तसेच पुरस्कार विचारण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय ते राज्य स्तरावरील विविध पुरस्कार, ते मिळवणाऱ्या व्यक्तींची इतर माहिती, पुरस्कार देणाऱ्या संस्था/ संघटना यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. केंद्र व राज्य शासनाचे उपक्रम, योजना यांवरील प्रश्न नेमकी तरतूद विचारणारे आहेत. राज्यव्यवस्था घटकावर न्यायालयीन निर्णय, चर्चेतील कायदे/ विधेयके, चर्चेतील मुद्द्याबाबतची राज्यघटनेतील तरतूद असे मुद्दे विचारलेले दिसतात.

पर्यावरण आणि भूगोल या घटकाबाबत लक्षणीय घटना घडली असेल त्या वर्षी नेमकी माहिती विचारणारे आणि विश्लेषणात्मक प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत. अभ्यास करताना पुढील उपघटक विचारात घेता येतील

जागतिक चालू घडामोडी

विश्व चषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत/ महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पाहाव्यात.

चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रांतील पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्याबाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.

नैसर्गिक आपत्ती, वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक/ खगोलशास्त्रीय/ लक्षणीय पर्यावरणीय घटना यांबाबत मूलभूत व संकल्पनात्मक माहिती करून घ्यावी.

खगोलशास्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानविषयक अद्ययावत माहिती, भारताचा सहभाग असलेले महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांचा  आढावा घ्यावा.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, परिषदा त्यांमधील भारताची भूमिका, झालेले ठराव/ निर्णय व इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यावा.

भारतातील चालू घडामोडी

राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते, महाराष्ट्राची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्मा पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.

चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

सामान्य अध्ययन घटकांशी संबंधित चालू घडामोडी

यामध्ये भारताचे द्विपक्षीय तसेच संघटना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध, निवडणुका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे या राज्यव्यवस्था घटकाशी संबंधित बाबी पाहायला हव्यात.

नैसर्गिक आपत्ती, वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक घटना, त्यांची वैशिष्ट्ये समजून घ्यावीत.

आर्थिक विकास दर, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निर्देशांक, जनगणना, बँक दर, जीएसटी, आर्थिक क्षेत्रातील नवे निर्णय, जीडीपी, जीएनपी यांची अद्ययावत माहिती असायला हवी. विविध शासकीय योजना, त्यांच्या तरतुदी, लाभार्थी यांचा आढावा घ्यायला हवा.

राज्यातील चालू घडामोडी

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना व प्रकल्प, राज्य शासनाचे महत्त्वाचे व चर्चेत असलेले निर्णय यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.

भाषा, साहित्य, पत्रकारिता, क्रीडा इत्यादी क्षेत्रांतील राज्यस्तरीय पुरस्कार आणि राज्य स्तरावरील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. राज्यामध्ये आयोजित होणारी साहित्य संमेलने, चित्रपट महोत्सव इत्यादींचा आढावा घ्यायला हवा.

सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती खेळांचे नियम, लोकपरंपरा, सर्वात मोठे/ लहान भौगोलिक क्षेत्र, शहरांची उपनावे, प्रसिद्ध व्यक्तींची अवतरणे अशासारखे मुद्दे विचारले जाऊ शकतात.

उमेदवारांचा एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की, एका विषयाची घडामोडींची माहिती वेगवेगळ्या दोन-तीन संदर्भ पुस्तकांत वाचली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत परीक्षार्थीना हा प्रश्न पडतो. यावर एखादे दुसरे गाइड वाचणे हा पर्याय ठरू शकत नाही अथवा माहितीस्रोत म्हणून एकाच संदर्भ पुस्तकाचा वापर करणेही उपयोगाचे ठरत नाही. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की, अशा तºहेने अभ्यास केल्यास आपण स्पर्धेत टिकणे कठीण आहे याची जाणीव होते. यासाठी इंग्रजी संदर्भ पुस्तके वापरणाऱ्या उमेदवारांनी इंडिया ईयर बुक, आर्थिक पाहणी अहवाल व अर्थसंकल्प यांची प्रत्यक्ष डॉक्युमेंट्स पाहावीत. राज्याचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल मराठी व इंग्रजीतून उपलब्ध होतो. नव्या योजना, कायदे यांचा अभ्यास करण्यासाठी योजनेचे संके तस्थळ व कायद्याची मूळ प्रत पाहावी.