महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी भौगोलिक संज्ञा, संकल्पना पक्क्या करून घेणे महत्त्वाचे ठरते. भूगोल या घटकाची तयारी करताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात यावर दृष्टिक्षेप-
सामान्य अध्ययन पेपर-१ चा अभ्यासक्रम पाहिल्यास इतिहास, भूगोल व भूगोलात अंतर्भूत कृषी व पर्यावरण असे चार उपघटक निदर्शनास येतात. साहजिकच भूगोलाच्या विभागाला जास्त वेटेज देणे अपेक्षित आहे. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन विषयांच्या अभ्यासामध्ये भूगोलाचे विविध कंगोरे आणि पायाभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी भौगोलिक संज्ञा, संकल्पना पक्क्या करून घेणे महत्त्वाचे आहे. विषयाची तयारी करायची नेमकी योजना पाहू या.
भूगोल विषयाचे भौतिक, सामाजिक व आíथक असे ठळक तीन उपविभाग पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात आयोगाने स्पष्ट केले आहेत. पर्यावरणविषयक बाबी भौतिक भूगोलामध्ये व कृषीविषयक बाबी आíथक भूगोलामध्ये समाविष्ट करता येतात. त्यामुळे मुख्य परीक्षेतही भूगोलाचे हेच तीन उपविभाग करून अभ्यास करावा लागेल. यामुळे पूर्व व मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सामायिक मुद्दे आधी तयार करण्याची पद्धत अवलंबता येईल.
भूगोलाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास शक्य आहे. विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे व्याख्या (definition) व प्रक्रियांचा मुद्देसूद अभ्यास कमी वेळेत चांगले आकलन होण्यास मदतगार ठरतो. या विषयाच्या अभ्यासातही काही बाबींचा क्रम लावून घ्यायला हवा. सगळय़ात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळय़ा भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप/ वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे.
 – भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या/ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षेतील इतर घटक विषयांच्या तयारीसाठीसुद्धा महत्त्वाच्या आहेत.
 – पृथ्वीचे वजन, वस्तुमान, ढगांचे प्रकार इ. बाबी सोडता येतील. भूरूपांपकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इत्यादींचाच अभ्यास केल्यास अभ्यासाचे ओझे कमी होईल.
 – कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत-
– भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी
– घटना घडू शकते/घडते ती भौगोलिकदृष्टय़ा महत्त्वाची ठिकाणे.
– प्रत्यक्ष घटना/प्रक्रियेचे स्वरूप
– घटनेचे/प्रक्रियेचे परिणाम.
– पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम.
– असल्यास आíथक महत्त्व
– भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे
– नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/प्रक्रिया (current events)
– भूरूप निर्मिती हा घटक पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकांखाली मुद्दय़ांच्या वा तक्त्याच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. अपक्षयामुळे होणाऱ्या भूरूपांमधील साम्यभेद आणि संचयामुळे होणाऱ्या भूरूपांमधील साम्यभेदांचीही नोंद घ्यावी लागेल. प्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे.
– भौतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ.बाबत भौतिक भूगोलातून प्रश्न विचारले जाऊ शकतात. जागतिक भूगोलाचा भाग फक्त पूर्वपरीक्षेत असल्याने फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ.चा तक्त्यामध्ये वास्तविक अभ्यास पुरेसा आहे.
– भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आíथकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याने या भागाचा thorough अभ्यास करायला हवा. पुढील मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा- खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े, रचना, आíथक महत्त्व.
– भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. नदीप्रणालींच्या अभ्यासातच जल व्यवस्थापनातील (पाण्याची गुणवत्ता, भूजल व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग) महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायला हव्यात. यामुळे पाणी या नसíगक संसाधनाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होईल. त्यानंतर कृषी व इतर कारणांसाठी वापर, व्यवस्थापन इ. मुद्दे कृषीविषयक घटकाच्या तयारीमध्ये समाविष्ट करता येतील.
– भारतातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आíथक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या प्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी. उदा. महाराष्ट्रात उत्तर ते दक्षिण पुढील क्रमाने प्रणाली आढळतात. सातपुडा पर्वत – तापीपूर्णा खोरे – सातमाळा – अजिंठा डोंगररांगा – गोदावरी खोरे – हरिश्चंद्र – बालाघाट डोंगर – भीमा नदी खोरे – शंभू महादेव डोंगर – कृष्णा खोरे.
या सर्व भौगोलिक संकल्पना समजून घेतल्यावर पर्यावरणीय भूगोलाच्या संकल्पनांचा अभ्यास करणे सयुक्तिक ठरते व त्यानंतर भौगोलिक चालू घडामोडी समजून घेणे सोपे होते. याबाबतची व पुढील अभ्यासाची रणनीती पुढच्या लेखामध्ये पाहू.
    
thesteelframe@gmail.com