13 December 2019

News Flash

यूपीएससीची तयारी : भूगोल चालू घडामोडी व संभाव्य प्रश्न

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने विविध घडामोडी घडत असतात.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अमर जगताप

विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण यूपीएससीने आजपर्यंत विचारलेले प्रश्न, त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांची अपेक्षित उत्तरे याबद्दल चर्चा केली. मात्र, आज आपण थोडय़ा वेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहोत. आजच्या लेखामध्ये आपण चालू घडामोडींमधील घटना व त्यावरील संभाव्य प्रश्न काय असू शकतात? याचा विचार करणार आहोत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने विविध घडामोडी घडत असतात. या घडामोडींपकी ज्या घडामोडी भूगोल विषयाशी संबंधित आहेत; त्यावर निश्चित प्रश्न विचारले जातात. अशा घटना वाचनात आल्यानंतर त्या घटनांची सविस्तर माहिती करून घेणे, त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे संबंधित घटनेमागे भूगोल विषयातील कोणती मूलभूत संकल्पना विचारलेली आहे; हे शोधून त्यांचा परस्पर संबंध विशद करण्याचा प्रयत्न उत्तरांमध्ये करणे आवश्यक आहे. हे सर्व करताना त्यावर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो? याचा अंदाज बांधणे आवश्यक आहे. तसे सुचलेले प्रश्न नोंदवून त्यांचे उत्तर लिहिण्याचा सराव करणे आवश्यक आहे.

सद्य:स्थितीत भारतात नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस सर्वत्र पडतो. त्यावेळेस मुंबईजवळील बदलापूर शहरास (उपनगरास) पुराचा तडाखा बसला होता. अचानक वाढलेल्या नदीच्या पाण्याच्या पातळीमुळे रेल्वेमार्ग पाण्याखाली जाऊन एक प्रवासी रेल्वेगाडी भर पुरात अडकली आणि शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. तसेच बदलापूर शहरात पाणी पसरल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोगाद्वारे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो का? याची चाचपणी विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. या घटनेवर पुढीलप्रमाणे प्रश्न विचारला जाऊ शकतो.

  1. Indian Urban Centres are becoming prone to flood problems; explain those which have coastal locations. Comment.

किंबहुना चेन्नईला काही वर्षांपूर्वी आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या प्रकारच्या घटनेमागील भौगोलिक व मानवनिर्मित कारणांचा सहसंबंध अभ्यासून; त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेणे. तसेच गेल्या १-२ दशकांमध्ये वेगात वाढणाऱ्या कारणांचा परामर्श वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेणे आवश्यक आहे.

बदलापूर पूर घटनेची चर्चा या अनुषंगाने आपण करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना उत्तरामध्ये कोणते घटक असावेत व त्यांचा क्रम काय असावा याचा अंदाज येईल. उत्तरामध्ये सर्वप्रथम पूरस्थितीस कारणीभूत नसíगक किंवा भौगोलिक कारणे कोणती आहेत याचा उल्लेख करावा. ही कारणे पूर्वीदेखील कार्यरत होती. मात्र, पुराची समस्या गेल्या एक दशकामध्ये वाढली आहे. कारण या भौगोलिक क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य वाढले आहे. प्रश्नाचे उत्तर एवढय़ावरच न थांबवता मानवी हस्तक्षेप या प्रदेशामध्येच का वाढत आहे? याचे कारणसुद्धा स्पष्ट करणे आवश्यक आहे. उत्तराची मांडणी याच क्रमाने होणे आवश्यक आहे.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण विभागाच्या उत्तर भागामध्ये मुंबई व सभोवतालचा प्रदेश समाविष्ट होतो. या प्रदेशामुळे नर्ऋत्य मान्सूनमुळे जून ते सप्टेंबर कालावधीत प्रतिरोध (OROGRAPHIC) स्वरूपाचा पाऊस मोठय़ा प्रमाणात पडतो. हा पश्चिम किनारी प्रदेश अत्यंत अरुंद व निमुळता आहे. या प्रदेशाच्या पूर्वेस सह्य़ाद्रीचा उतार व पश्चिमेस अरबी समुद्राचा किनारा अशी रचना आहे. सह्य़ाद्रीच्या उतारावरील अतिवृष्टी आणि या प्रदेशातील पावसाचे सर्व पाणी याच प्रदेशात वाहून येते. तेथून समुद्रात जाते. मात्र, त्याच वेळेस समुद्रास भरती आल्यास पाणी या अरुंद प्रदेशात मोठय़ा प्रमाणात साचून राहते. या स्थितीत किनाऱ्यावरील व खाडीच्या दुतर्फा असणाऱ्या पाणथळ भू-प्रदेशामध्ये (Wetland) पावसाचे अतिरिक्त पाणी काही तास सामावून घेतले जाते. काही तासांनंतर ओहोटी आल्यास हे पाणी सागरामध्ये वाहून जाते. परिणामी, किनारी प्रदेशातील उंचावरील (मानवी वस्तीस योग्य) प्रदेश पूर समस्येपासून सुरक्षित राहतो. मात्र, गेल्या काही वर्षांत या नसíगक परिस्थितीत मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. मुंबई व सभोवतालच्या प्रदेशामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये रोजगाराकरिता मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. मानवास निवासी व आíथक प्रक्रियांकरिता जमिनीची आवश्यकता भासते. वाढत्या लोकसंख्येची जमिनीची गरज पूर्ण करण्यासाठी मानवाने या प्रदेशातील पाणथळ भूमी, त्यामधील खारफुटीची वने नष्ट केली; तेथे भराव टाकून त्या जमिनी बांधकामासाठी वापरल्या. त्यामुळे पुराच्या वेळेस पाणी सामावण्याची त्या प्रदेशाची क्षमता संपुष्टात आली. त्याचप्रमाणे नसíगक जल प्रवाहांमध्ये भराव टाकून अतिक्रमण केले; ज्यामुळे त्या प्रवाहांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली. काही ठिकाणी तर ओढे, नाले यांसारख्या छोटय़ा प्रवाहांचे अस्तित्वच नष्ट केले गेले. तसेच नसíगक व मानवनिर्मित पाणी निचरा करणाऱ्या प्रवाहांमध्ये घनकचऱ्याची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावल्यामुळे पाणी वाहण्याऐवजी साठून राहू लागले. अशा प्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे पाण्याची जागा मानवी वस्तीने व्यापली. परिणामी, पाणी मानवी वस्तीमध्ये शिरल्यामुळे पूरस्थिती उद्भवली.

थोडक्यात, गेल्या काही दशकांमध्ये भारतातील मोठय़ा शहरांमध्ये व त्या सभोवतालच्या प्रदेशांमध्ये रोजगाराच्या संधी, शिक्षण, या कारणांकरिता अतिरिक्त स्थलांतर व त्यातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ही मानवनिर्मित कारणे या समस्येस कारणीभूत आहेत. परंतु या कारणांमागे देखील काही घटक आहेत, की जे या व इतर समस्यांना कारणीभूत आहेत. बारकाईने विचार केल्यास या अतिरिक्त स्थलांतरणास कोणते घटक कारणीभूत आहेत? त्यास भारतातील लोकसंख्या विस्फोट (अल्पकालावधीत मोठय़ा प्रमाणात वाढलेली लोकसंख्या) आणि प्रादेशिक असमतोल ही कारणे आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात जन्मदर घटला, मात्र मृत्युदर पुरेसा न घटल्याने लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. विकासाची प्रक्रिया सर्वत्र समान प्रमाणात न झाल्याने देशात मोजक्याच शहरांमध्ये आíथक वृद्धी वेगात होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. या स्थितीत मोठय़ा प्रमाणात वाढलेली लोकसंख्या मोजक्याच संख्येत असणाऱ्या या विकास केंद्रांकडे म्हणजे शहरांकडे मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित झाली व पर्यावरणाचा वेगात ऱ्हास होऊ लागला. या सर्व घटनांचा परिपाक म्हणजे नागरी केंद्रांमध्ये उद्भवणाऱ्या पूर व इतर आपत्ती होय.

थोडक्यात, यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण व संतुलित प्रादेशिक विकास हेच उपाय/मार्ग आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी समस्येचा आढावा घेऊन समस्येचे मूळ उत्तरामध्ये मांडावे. चालू घडामोडींचा या प्रकारे सर्व बाजूंनी विचार करून संभाव्य प्रश्नांची यादी करावी.

First Published on August 10, 2019 12:14 am

Web Title: geography current events and potential questions upsc abn 97
Just Now!
X