कोणतीही योजना जेव्हा पहिल्यांदा तयार केली जाते तेव्हा परिपूर्ण नसते. एखादी नवीन गोष्ट साध्य करण्याच्या बहुतेक सुरुवातीला पुन:पुन्हा अपयशी होतील. हे अपेक्षित धरायला हवं. प्रतिसाद स्वीकारण्याची आणि कामाच्या योजनेत दुरुस्त्या करण्याची तुमची क्षमता यशासाठी महत्त्वाची आहे. काय योग्य, काय अयोग्य हे सतत विचारत राहा, कोण योग्य आहे यापेक्षा काय योग्य आहे,याची जास्त काळजी घ्या.
तुम्हाला जेव्हा अडचण असेल तेव्हा उपायाभिमुख बनण्याचा संकल्प करा. प्रक्रियेचा एक भाग म्हणून समस्या अपेक्षित असू द्या आणि त्यांना परिणामकारकरीत्या प्रतिसाद देण्याचा संकल्प करा. तुम्ही जर ध्येयं वेळापत्रकानुसार प्राप्त करू शकत नसाल तर  अडचणी लक्षात घ्या आणि त्यावरच्या उपायांचा पाठपुरावा करा.
तुम्ही एखादे नवीन ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टीने काम सुरू करता तेव्हा तुम्हाला लगेचच धक्के, अडथळे, अडचणी आणि तात्पुरत्या अपयशांचा अनुभव येतो. ते साहजिकच आहे. एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी अनेक प्रयत्नांची गरज असते; स्वत:साठी निश्चित केलेली ध्येये साध्य करण्यासाठी तुम्हाला द्यावी लागणारी ती किंमत आहे.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,
पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.