|| स्वाती केतकर- पंडित

जानेवारी १९९९मध्ये जि.प. शाळा कारी इथे नव्या ‘म्याडम’ येणार होत्या. नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल होते. त्या कशा असणार? रागावणाऱ्या की मवाळ? मुख्य म्हणजे वर्गात डांबणाऱ्या की खेळायला सोडणाऱ्या? पण झाले भलतेच. मॅडम स्वत:च खेळाडू होत्या. त्यामुळे मैदानावर जायला त्यांची कधीच ना नव्हती. उलट खरी गंमत तर पुढेच घडली जेव्हा एक दिवस मॅडमनी स्वत: पँट शर्ट घालून मल्लखांबावर अवघड कसरती करून दाखवल्या. त्या झाल्यावर त्यांनी विचारले, कोणकोणाला हे करायचे आहे? शाळेतले निम्म्यापेक्षा जास्त हात वर झाले. तेव्हापासून म्हणजे मे १९९९पासून कारी गावातल्या त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये माया पवार-मोहिते मॅडमची मल्लखांबाची व्यायामशाळा सुरू झाली.

शिक्षिका म्हणून कारी गावात रुजू झाल्यावर त्यांना लक्षात आले की, गावातल्या मुलींचा विकास करायचा असेल तर केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगाचे नाही. त्याला खेळाची जोडही हवीच. कारण खेळातून मिळणारा आत्मविश्वासच त्यांना जीवनशिक्षणाच्या शाळेत तारू शकेल. हे करण्याचा एकमेव मार्ग त्यांना दिसत होता, तो म्हणजे मल्लखांबाचा. म्हणूनच मल्लखांबाचे विनामूल्य प्रशिक्षण त्यांनी शाळेतच द्यायला सुरुवात केली.

शाळेच्या आवारात वडाचे एक भलेमोठे झाड आहे. सुजीत शेडगे या आपल्या गुरूकडून माया यांनी मल्लखांबाची दोरी आणली आणि एक लाकडी मल्लखांब शाळेला भेट मिळाला होता. इतक्याच साधनसामुग्रीवर त्यांची व्यायामशाळा सुरूझाली. खरे तर आहे, कारण आजही या साहित्यामध्ये केवळ १०-१२ गाद्यांची भर पडली आहे. बाकी सामान तेवढेच. रोज सकाळी शाळा भरायच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर ही व्यायामशाळा चालते. सुरुवातीला मुली येत नव्हत्या कारण खेडय़ातले वातावरण, पोरींना कशाला हवाय व्यायाम नी खेळ? अशी मानसिकता. पण मायानी हार मानली नाही. कधी पालकांशी संवाद साधत कधी इतर खेळाडूंचे दाखले देत त्यांनी अनेक मुलींना या मल्लखांबाकडे वळवले. प्रशिक्षण सुरू झाल्यावर अडचणी संपल्या नव्हत्या. मुली ‘मोठय़ा’ झाल्यावर त्यांनी मल्लखांबासाठी लागणारे शर्ट-पँट कसे घालावे? असा अनेक पालकांचा प्रश्न होता. पण इथेही त्यांच्याशी संवाद साधल्यावर माया यांनी त्यांना पटवून दिले की, शेतात कामाची गरज म्हणून साडी खोचणे जितके नैसर्गिक आहे, तितकेच खेळाची गरज म्हणून असे कपडे घालणे. हळूहळू या व्यायामशाळेतील खेळाडू, जिल्हास्तरावर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धामध्ये भाग घेऊ लागले. जोरदार कामगिरी करू लागले. २००७साली गावच्या २ मुली राष्ट्रीय स्तरावर निवडल्या गेल्या. त्यानंतर मात्र गावकऱ्यांना वेगळे सांगण्याची गरज उरली नाही.

आज संस्थेला जवळपास २० वर्षे झाली आहेत. आजघडीला त्यांच्या व्यायामशाळेतील ११ खेळाडू राष्ट्रीयस्तरावर खेळतात. दोन खेळाडू जिल्हा सवरेत्कृष्ट खेळाडू ठरले आहेत तर दोघांना विद्यापीठातून सवरेत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मिळाले आहे. पण या ‘कारी मल्लखांब संघ, कारी’ संस्थेचा प्रवास इतका सोपा नव्हता. १९९९ला कारी गावात रुजू झालेल्या माया यांची २००८मध्ये बदली झाली ती, याच तालुक्यातील पांगारे गावच्या शाळेत. ही शाळा कारी गावापासून लांब होती. आता व्यायामशाळा बंद होणार की काय अशी भीती होती. पण मायामधल्या जिद्दी खेळाडूने पुन्हा या सगळ्यावर मात केली. त्या रोज साताऱ्याहून लवकर कारीला शाळेत येत, मल्लखांबाचे प्रशिक्षण देत, मग दुचाकीवरून पांगारीची शाळा गाठत ती सुटल्यावर पुन्हा कारीला दाखल होत आणि सरतेशेवटी संध्याकाळी ७.३० वाजता त्यांचा कारी गावातला दिवस संपे, की पुन्हा दुचाकीने साताऱ्याला घरी रवाना. यानंतर २०१०मध्ये याच जिल्ह्य़ातील पळसावडे गावी त्यांची बदली झाली. हे गाव तर आणखीच दुर्गम होते. डोंगरातल्या या गावात पोहोचणेच मोठे कठीण होते. पण इथेही माया थांबल्या नाहीत. साडेनऊ वर्षे कारीबाहेर राहूनही  व्यायामशाळेतले प्रशिक्षण थांबवलेले नाही. शेवटी २०१८मध्ये त्यांची पुन्हा कारी गावात बदली झाली. आजही कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय त्या ही संस्था चालवतात. खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसांतून संस्थेचा खर्च चालतो. माया म्हणतात, मल्लखांबाचा प्रचार आणि प्रसार हे माझे ध्येय आहे. माझ्याकडे येणाऱ्या सगळ्याचजणी काही उत्तम मल्लखांबपटू बनत नाहीत पण समाजभान असलेल्या आत्मनिर्भर स्त्रिया मात्र त्या नक्कीच होतात.

पूजा चव्हाण ही या व्यायामशाळेतील राष्ट्रीय स्तरावरची खेळाडू. शेतकरी कुटुंबातल्या पूजाला सरावादरम्यान पाठीच्या मणक्याला मोठी दुखापत झाली. त्यात तिचे १ वर्ष गेले. पण पूजा हरली नाही.  घरच्यांचा विरोध पत्करून ती पुन्हा उभी राहिली. विद्यापीठातून राष्ट्रीय स्तरावर खेळून तिने त्यात पारितोषिकही मिळवले. इतकेच नव्हे तर एमपीएससीचा अभ्यास करून केवळ दीड वर्षांत ती परीक्षा पास झाली. इतकेच नव्हे तर तिच्या बॅचला महाराष्ट्रात मुलाखतीत पहिली आली. सध्या तिचे नाशिकला नोकरीपूर्व प्रशिक्षण सुरू आहे. मायाच्या मल्लखांब चळवळीचे हे यश आहे. खेडय़ापाडय़ातल्या अनेक पोरींना या मल्लखांबाने आधार आणि आत्मसन्मान मिळवून दिला आहे.

जि.प. शाळा कारी, ता. जि. सातारा इथे विद्यार्थी गणितातल्या करामती आणि मल्लखांबावरच्या कसरती एकत्रच शिकतात. मैदानावर मल्लखांबाचे धडे गिरवण्यात या गावातल्या मुलींचा लक्षणीय सहभाग आहे. हे घडवणाऱ्या त्यांच्या शिक्षिका आहेत, शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या खेळाडू माया पवार-मोहिते.

swati.pandit@expressindia.com