News Flash

गिर्यारोहण- छंदाकडून करिअरकडे

छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. या क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि करिअर संधींविषयी-

| August 12, 2013 12:02 pm

छंद म्हणून जोपासल्या जाणाऱ्या गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते.  या क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि  करिअर संधींविषयी-

१७मे २०१३. ताशी ७० किलोमीटर वेगाने वाहणारे अतिथंड वारे, विरळ वातावरण, – ३० ते – ४० अंश असे प्रतिकूल तापमान.. या सर्व आव्हानांना छेद देत पुण्याच्या गिरीप्रेमी मित्र मंडळाच्या सदस्यांनी अथक सामूहिक प्रयत्नांनी उमेश झिरपे यांच्या विवेकी नेतृत्वाखाली हिमालयातील २९,०३५ फुटांवर असणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा मराठी पावलांची मोहोर उमटवली आणि या एका क्षणाची आतुरतेने वाट पाहणारा अवघा महाराष्ट्र आणि देशातील अनेक गिर्यारोहणप्रेमी या धाडसी घटनेने थरारून गेले.. अशा चढायांचे वृत्तांत वाचले की तरुणाईच्या मनात नकळत या चित्तथरारक छंदाबद्दल औत्सुक्य निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.
गिर्यारोहण म्हणजेच माउण्टनीअरिंग हा फार पूर्वापार चालत आलेला आणि उत्साही, धाडसी गिरीप्रेमींनी  जोपासलेला छंद आहे. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे चौदाव्या, पंधराव्या शतकात झालेल्या या प्रकारच्या डोंगरांवरच्या चढायांच्या मागील उद्देश बरेच वेगळे असत. उदा. सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेणे, शत्रू प्रदेशाची टेहाळणी करणे, हवामानविषयक अंदाज बांधणे वगरे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र काही शास्त्रीय निरीक्षणासाठी, अस्तित्वात असलेल्या हिमनद्यांचा शोध घेण्यासाठी गिर्यारोहण सुरू झाले.
गिर्यारोहण हे इतर मदानी खेळ किंवा जंगल भ्रमंतीपेक्षा खूप वेगळे ठरते. या प्रकारात शारीरिक, मानसिक क्षमतांचा कस लागतो. सरळसोट डोंगरकडे चढण्यासाठी गरज भासते ती प्रचंड धर्याची, संयमाची, सतर्कतेची आणि उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याची. डोंगरचढाई कितीही रोमहर्षक वाटली तरी शिखरांच्या वाढत्या उंचीनुसार कमी होत जाणारा प्राणवायू, थंड हवामान आरोहकांसाठी मोठी अडचण ठरू शकते. वातावरणात अचानक होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे गरजेचे ठरते. त्यातून बर्फाळ प्रदेशातील चढाईसाठी इतर बरीच व्यवधाने पाळावी लागतात. गिर्यारोहण ही समूहाने करण्याची गोष्ट आहे. अर्थात यातूनच नेतृत्वगुण, अचूक व सत्वर निर्णयक्षमता या गुणांचा आपोआप विकास होतो. सुरक्षित व जलद चढाईसाठी हल्ली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा प्रगत उपकरणांशी जुळवून घेणेही महत्त्वाचे ठरते.
भारताच्या पर्वतीय भागातील परदेशी गिर्यारोहकांची वाढती संख्या लक्षात घेता गिर्यारोहकांच्या मदतीसाठी प्रशिक्षक, वाटाडय़ा म्हणून काम करणारे किंवा त्यांच्या निर्वेध आरोहणासाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या प्रशिक्षित, अनुभवी व्यक्तींची गरज वाढली आहे. फक्त हौस म्हणून या छंदाकडे पाहणाऱ्या युवावर्गासाठी या क्षेत्रात करिअर संधीही उपलब्ध होऊ शकतात. गिर्यारोहणाचे रीतसर प्रशिक्षण घेऊन इच्छुक विद्यार्थी माउण्टनीअिरग गाईड म्हणून रोजगार मिळवू शकतात. हे प्रशिक्षण घेताना इच्छुक उमेदवाराने शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम असणे अनिवार्य असते.
भारतात गिर्यारोहण, जंगलभ्रमंती, प्रस्तरारोहण (रॉक क्लाइम्बिंग) या पर्यटन व्यवसायाला पूरक ठरणाऱ्या छंदांना प्रोत्साहन, मार्गदर्शन देण्यासाठी तसेच हिमालयीन पर्वतीय भागातील पर्यावरण रक्षणाच्या योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी इंडियन माउण्टनीअरिंग फौंडेशन या संस्थेची स्थापना १९६१ साली झाली. हिमालयन माउण्टनीअरिंग इन्स्टिटय़ूट, नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माउण्टनीअरिंग, अटलबिहारी वाजपयी इन्स्टिटय़ूट ऑफ माउण्टनीअरिंग, जवाहर इन्स्टिटय़ूट ऑफ माउण्टनीअरिंग, इंडिअन इन्स्टिटय़ूट ऑफ स्कीईंग अँण्ड माउण्टनीअरिंग. या सर्व गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था इंडियन माउण्टनीअरिंग फौंडेशन या संस्थेशी संलग्न आहेत. या सरकारमान्य संस्थांतील गिर्यारोहण प्रशिक्षणाची ओळख करून घेऊ.
हिमालयन माऊंटनीअरिंग इन्स्टिटय़ूट – दार्जििलग
ही स्वायत्त संस्था नोव्हेंबर १९५४ साली पश्चिम बंगालमधील पर्वतीय भागातील दार्जीिलगमध्ये स्थापन झाली. या संस्थेत बेसिक, अ‍ॅडव्हेन्चर अभ्यासक्रम शिकवले जातात. गिर्यारोहणातील र्सवकष शिक्षण देणारे १६ अभ्यासक्रम दरवर्षी राबवले जातात.
बेसिक माऊंटनीअरिंग – २८ दिवसांच्या या अभ्यासक्रमामध्ये उमेदवारांना गिर्यारोहणाची एक कला म्हणून ओळख करून दिली जाते. धाडसी वृत्ती, आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे हा यामागील प्रमुख हेतू असतो. पुस्तकी, तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण, ट्रेकिंग, आइस क्राफ्ट अशा मूलभूत गोष्टी याअंतर्गत शिकविल्या जातात.
अ‍ॅडव्हान्स्ड माऊंटनीअरिंग कोर्स – २८ दिवसांच्या या शिक्षणक्रमात गिर्यारोहणासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी तसेच निरनिराळी आयुधे यांच्या वापराचे शिक्षण दिले जाते. बेसिक शिक्षणक्रमात ‘अ’ दर्जा मिळवणारे विद्यार्थीच या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात.
मेथड्स ऑफ इन्स्ट्रक्शन कोर्स – ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून करिअर करायचे आहे, अशांसाठी हा २८ दिवसांचा प्रशिक्षणक्रम राबविला जातो. अ‍ॅडव्हान्स्ड माऊंटनीअरिंग कोर्समध्ये ‘अ’ श्रेणी प्राप्त केलेले प्रशिक्षार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात.
अ‍ॅडव्हेन्चर कोर्सेस – १५ दिवसांचा हा अभ्यासक्रम दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत चालविला जातो.
वरील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त फक्त मुलींसाठी गिर्यारोहणाचे स्वतंत्र अभ्यासक्रम १९६१ सालापासून राबविणारी ही देशातील पहिली संस्था आहे. अंध व्यक्तींसाठीही गिर्यारोहण प्रशिक्षणाचा खास कार्यक्रम संस्थेतर्फे चालविला जातो. अधिक माहितीसाठी www.hmi-darjeeling.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
जवाहर इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटनीअरिंग
पहलगाम येथे असणाऱ्या या संस्थेद्वारा गिर्यारोहणातील बेसिक, अ‍ॅडव्हान्स्ड, अ‍ॅडव्हेन्चर, स्कीइन्ग असे अभ्यासक्रम चालविले जातात. अधिक माहितीसाठी www.jawaharinstitutepahalgam.com या संकेतस्थळावर संपर्क साधा.  
नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटनीअरिंग
ही संस्था १४ नोव्हेंबर १९६५ रोजी उत्तरकाशी, उत्तराखंड येथे स्थापन झाली. या संस्थेमार्फत बेसिक माउण्टनीअरिंग कोर्स, अ‍ॅडव्हेंचर कोर्स, २८ दिवसांचा अडव्हान्स्ड कोर्स राबविला जातो.
‘सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू’ हा खास प्रशिक्षणक्रम या संस्थेमार्फत चालविला जातो. आपत्कालीन परिस्थितीत मृत तसेच जिवंत माणसांचा शोध घेण्याचे रीतसर प्रशिक्षण यात दिले जाते. दगडी, बर्फाळ प्रदेशातून माउंटन नेव्हिगेशन, रेडिओ टेलिफोनी, ऑडिओ व्हिज्युअल सिग्नल्स असे तंत्रज्ञान वापरून हरवलेल्या किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे शिक्षण यातून दिले जाते. सध्यातरी अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. अधिक माहिती साठी www.nimindia.net   या संकेतस्थळावर संपर्क साधा.
इंडिअन इन्स्टिटय़ूट ऑफ स्कीईंग अ‍ॅंण्ड माऊंटनीअरिंग, गुलमर्ग
या संस्थेची स्थापना केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या सौजन्याने १९६९ साली गुलमर्ग येथे झाली. धाडसी खेळांची पर्यटकांमध्ये आवड निर्माण करून पर्यटन व्यवसायाची भरभराट व्हावी, हा यामागील प्रमुख हेतू होता. संस्थेतर्फे वॉटर राफ्टिंग, पॅराग्लायिडग, ट्रेकिंग, माऊंटनिअिरग, स्कीईंग यातील अल्प मुदतीचे शिक्षणक्रम राबविले जातात. अधिक माहितीसाठी iismgulmarg.com या संकेतस्थळावर संपर्क साधा.
अटलबिहारी वाजपेयी  इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटनीअिरग अ‍ॅण्ड स्पोर्टस्, मनाली
अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्ट्स संदर्भात प्रशिक्षण देणारी ही देशातील सर्वात मोठी संस्था गणली जाते. १९६१ साली स्थापन झालेल्या या संस्थेकडून पॅराग्लायिडग, माउण्टनीअिरग, ट्रेकिंग यातील बेसिक, अ‍ॅडव्हान्स्ड अभ्यासक्रम चालविले जातात. अधिक माहितीसाठी www.adventurehimalaya.org या संकेतस्थळावर संपर्क साधा.
करिअर संधी
वरील प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना सरकारी किंवा खासगी प्रशिक्षण संस्थांतून रॉकक्लाइम्बिंग गाईड, अ‍ॅडव्हेंचर ट्रीप गाईड, प्रशिक्षक अशा नोकऱ्या मिळू शकतात. गिर्यारोहण मोहिमांतून टूर गाईड म्हणून नेमणूक होऊ शकते. अशा व्यक्ती स्वत:ची गिर्यारोहण संस्थाही सुरू करू शकतात. तसेच पूर, भूकंप, जलप्रलय अशा नसíगक आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमधूनही कामाची संधी मिळू शकते. गिर्यारोहण मोहिमांचे आयोजन करणाऱ्या सरकारी अथवा स्वयंसेवी संस्थांतून ट्रेकिंग गाईड, कॅम्प लीडर म्हणून प्रशिक्षित उमेदवारांना अनुभव मिळू शकतो. दरवर्षी होण्याऱ्या शेकडो हिमालयीन गिर्यारोहण मोहिमांमध्ये, परदेशी गिर्यारोहक आपल्या सोबत परदेशातूनच गाईड आणि टेक्निकल इन्स्ट्रक्टर स्टाफ घेऊन येतात. जर या परदेशी गिर्यारोहकांची ही गरज भारतातूनच पुरवली गेली तर देशातील गिर्यारोहक युवकांना अर्थार्जनाच्या मुबलक संधी प्राप्त होतील.
या संधींचे सोने करायचे असेल तर भारतीय गिर्यारोहकांच्या गाठीशी रीतसर प्रशिक्षण आणि पुरेसा अनुभव असणे गरजेचे  आहे. गिर्यारोहण मोहिमांतील या संधी हेरून त्यासाठी योग्य व्यक्ती पुरवणाऱ्या संस्था माध्यम म्हणून निर्माण होण्याची गरज आहे. असे झाले तर गिर्यारोहण केवळ हौस न राहता एक व्यवसाय किंवा प्रभावी करिअर ऑप्शन ठरू शकेल यात शंका नाही.                      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:02 pm

Web Title: hiking hobbies towards career
टॅग : Hiking
Next Stories
1 पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती
2 कृषीक्षेत्राला आले सुगीचे दिवस!
3 शेती व्यवसाय आणि युवावर्ग
Just Now!
X