आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. कामाच्या मुबलक संधी आणि आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या क्षेत्राचा करिअर म्हणून युवावर्गाने जरूर विचार करायला हवा. या क्षेत्रातील कामाच्या विविध संधी  आणि अभ्यासक्रमांविषयी..
बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती संख्या, विस्तारलेले उद्योग आणि आपली बदलती जीवनशैली यामुळे गेल्या काही वर्षांत हॉटेल उद्योगाला चांगलीच बरकत आली आहे. जागतिकीकरणामुळे विविध बैठका, परिषदा, परिसंवाद, विविध प्रदर्शने तसेच सांस्कृतिक आर्थिक, क्रीडा इ. क्षेत्रातील घडामोडी आणि महोत्सव यांच्या वाढत्या आयोजनामुळे हॉटेल व्यवसाय आज दमदार वाटचाल करत आहे.
१९६३ साली केंद्र सरकारची मान्यता असलेली १६३ मोठी हॉटेल्स कार्यरत होती. आज ही संख्या हजाराच्या घरात पोहोचली आहे. रेस्तराँज, क्लब्ज, हेरिटेज हॉटेल्स असे हॉटेल्सचे कितीतरी प्रकारही आज चलतीत आहेत. तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ उपलब्ध होतील अशी आणि निवासाच्या वेगवेगळ्या सोयीसुविधा असतील अशी वेगवेगळ्या श्रेणींची हॉटेल्स आज ठिकठिकाणी उभारलेली
दिसून येतात.
हॉटेल व्यवस्थापन आणि आदरातिथ्य या विषयीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हॉटेल उद्योगासोबत क्लब मॅनेजमेन्ट, हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड कॅटरिंग, इन्स्टिटय़ूशनल अँड इंडस्ट्रियल कॅटरिंग, कॅटरिंग डिपार्टमेन्टस् इन बँक्स अँड इन्शुरन्स हाऊसेस, शासकीय मालकीचे रेल्वे, संरक्षण दलांचे कॅटरिंग विभाग इत्यादी ठिकाणी कामाच्या अनेक संधी मिळू शकतात. या क्षेत्रात आज किमान दोन लाख मनुष्यबळाची गरज असून आगामी काही वर्षांत हाच आकडा साडेचार लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज केंद्र शासनाच्या एका अहवालात व्यक्त करण्यात   आला आहे.  
या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आज सुमारे ५० लाख व्यक्ती कार्यरत आहेत. या क्षेत्रासंबंधीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि आवश्यक मनुष्यबळ यांचे प्रमाण आजही व्यस्त असून आज या क्षेत्राला सुमारे ३५ हजार प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. हे लक्षात घेत दहावी-बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर त्या विद्यार्थ्यांला लवकर आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल तसेच नियोजनाने भविष्यात स्वतंत्र व्यवसायाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करता येईल.
आवश्यक कौशल्ये
हॉटेल उद्योगात काम करणे हे केवळ करिअर नव्हे तर ती एक जीवनशैली आहे. उमेदवाराला या संबंधित कामांची शंभर टक्के आवड असेल तरच तो हॉटेल व्यवसायात आनंद आणि समाधान प्राप्त करू शकतो. या क्षेत्रात वेळेची तमा न बाळगता प्रसन्न चेहऱ्याने काम करावे लागते. मेहनत आणि संघभावनेने काम करण्याची वृत्ती या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आवश्यक ठरते.
कामाचे विभाग
आदरातिथ्य उद्योगात करिअर करणाऱ्यांना विविध महत्त्वाच्या विभागांचा पर्याय उपलब्ध असतो-
* प्रशासकीय विभाग : हा हॉटेल्समधील सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग समन्वय विभाग म्हणून ओळखला जातो. हॉटेल्समधील विविध विभागांचा परस्परांशी समन्वय साधण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील असतो. समन्वय आणि पर्यवेक्षणासोबतच हॉटेलचे एकूण व्यवस्थापन आणि आर्थिक नियंत्रण यावर या विभागाचा वरचष्मा असतो.  महाव्यवस्थापक हा या विभागाचा प्रमुख असतो.
* फ्रंट ऑफिस : हॉटेलमध्ये प्रवेश करताच समोर दिसते ते फ्रंट ऑफिस. यालाच स्वागत कक्ष असेही म्हणतात. ग्राहकांचा या कक्षाशी थेट संबंध येतो. या दृष्टिकोनातून फ्रंट ऑफिसची जबाबदारी सर्वाधिक असते. ग्राहकांना योग्य ती माहिती देणे, त्यांना हव्या असलेल्या खोल्यांचे आरक्षण करणे, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या नोंदी ठेवणे, हॉटेलमधील खोल्यांची सुव्यवस्था राखणे, फ्रंट ऑफिसमध्ये जमा होणाऱ्या पैशांच्या देवाणघेवाणीची जबाबदारी सांभाळणे, पत्रव्यवहार करणे इ. कामे फ्रंट ऑफिसला करावी लागतात. व्यवस्थापक हा या विभागाचा प्रमुख असतो आणि त्याच्या हाताखाली सहाय्यक व्यवस्थापक, रिसेप्शनिस्ट, लॉबी एक्झिक्युटिव्ह, इन्फर्मेशन असिस्टंट, बेल बॉय, बेल कॅप्टन, डोअरमन इ. विविध कर्मचारी काम करतात. फ्रंट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या मदत करण्यास तत्पर आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या असणे अपेक्षित असते. त्याशिवाय आत्मविश्वास, व्यवहारचातुर्य, गणिताचे ज्ञान, जनसंपर्काची आवड या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. बडय़ा हॉटेल्समध्ये परदेशी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
* विक्री आणि विपणन : या विभागाचे महत्त्वाचे काम म्हणजे प्रवास एजंटाशी संपर्क साधणे, ग्राहकांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने व्यावसायिकांशी सातत्याने संबंध ठेवणे, चर्चासत्रे, परिसंवाद, परिषदांच्या आयोजनासाठी मोठमोठय़ा कंपन्यांच्या संपर्कात राहणे. याशिवाय या विभागांद्वारे जनसंपर्क आणि जाहिरात विभाग सांभाळला जातो. संबंधित हॉटेलची प्रतिमा उंचावण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील असतो. या विभागात काम करण्यासाठी जनसंपर्क, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि संभाषणचातुर्य असणे आवश्यक ठरते. इतर अथवा परदेशी भाषांचे ज्ञान ही उमेदवाराची जमेची बाजू मानली जाते.
* हाऊस कीपिंग : हॉटेलमध्ये स्वच्छता राखण्यासाठी हा विभाग कार्यरत असतो. हॉटेल्सच्या रूम्स स्वच्छ राखणे, ग्राहकाला रूम्समधील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या बारीक-सारीक गरजांकडे लक्ष देणे, स्वच्छता आणि व्यवस्थेबरोबरच खोल्यांची अंतर्गत सजावट योग्य राखणे इत्यादी कामे हा विभाग करीत असतो. या विभागात हाउसकीपर, फ्लोअर सुपरवायझर, चेंबर बॉय, सफाईवाले, मदतनीस काम करीत असतात. या विभागातील कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या शिफ्टमध्ये काम करावे लागते. या विभागात काम करायचे असेल तर उमेदवाराकडे संघटनकौशल्य आवश्यक ठरते. विशेषत: अकुशल कामगारांकडून काम करवून घेणे हा गुण आवश्यक ठरतो.
* खानपान विभाग : ज्याप्रमाणे फ्रंट ऑफिस हा हॉटेलमधील मोठा संवेदनशील विभाग समजला जातो तीच बाब खाद्य, पेय विभागाची. कारण पदार्थाच्या चवीवरच त्या हॉटेलचे भवितव्य अवलंबून असते. या विभागाचे दोन विभाग केले जातात. एका विभागाचा प्रमुख कॅटरिंग व्यवस्थापक असतो तर दुसऱ्या विभागाचा प्रमुख खानपान सेवा संबंधीचा व्यवस्थापक असतो. यापैकी कॅटरिंग विभागाची कामे म्हणजे विक्री-प्रतिनिधींना, पुरवठादारांना भेटणे हे होय. पदार्थ बनविण्याच्या कच्च्या मालाचा साठा, नियोजन, कटलरी, स्वयंपाकाची भांडी आणि संपूर्ण विभागासंबंधीची देखभाल करणे ही होय.
खानपान सेवासंबंधीचा व्यवस्थापक हा मुख्यत्वे हॉटेलच्या मुदपाकखान्यावर नियंत्रण ठेवीत असतो. खाद्यपदार्थाची निवड, बदलत्या बाजारभावानुसार किमती ठरवणे, कच्चा माल अथवा पदार्थ वाया जाणार नाही, याची दक्षता घेणे, चवीची श्रेणीनिश्चिती, नव्या उमेदवारांना यासंबंधीचे प्रशिक्षण देणे ही कामे व्यवस्थापक करतात. रेस्टॉरंट मॅनेजर आणि फूड मॅनेजर यांच्या सहकार्याने त्याला काम करावे लागते. या विभागातील पँट्री सुपरवायजर पदार्थाच्या साठय़ावर नियंत्रण ठेवीत असतो.
ज्या उमेदवारांना या विभागात काम करायचे आहे त्यांना रूचकर खाद्यपदार्थ बनवणे, चव राखणे यात स्वारस्य हवे. त्यांना कामांचा उरक, दबाबाखाली काम करण्याची सवय असणे आवश्यक आहे.
* वित्त विभाग : हॉटेलचा दैनंदिन अर्थव्यवहार पाहणे, हॉटेलची आर्थिक घडी बसवणे, व्यवसायवाढीचे आर्थिक प्रकल्प तयार करणे, व्यवसायात वृद्धिंगत करण्यासाठी निरनिराळ्या आर्थिक योजना समोर ठेवणे आणि प्रत्यक्ष आर्थिक गुंतवणूक करणे ही कामे या विभागातर्फे केली जातात. या विभागात एका बाजूने चार्टर्ड अकौंटंट, फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट, मार्केट रिसर्चर महत्त्वाची भूमिका बजावतात तर दुसऱ्या बाजूने हॉटेलच्या दैनंदिन व्यवहारात अकाउंटंट, चीफ कॅशिअर, कॅश क्लार्क, बिल क्लार्क ही पदे महत्त्वाची असतात. उमेदवार कार्यतत्पर आणि आकडेवारीत गती असलेला असावा लागतो. अकाउण्ट्स क्षेत्राची पूर्ण माहिती आणि संगणकाचे ज्ञान या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात.
* अभियांत्रिकी विभाग : हा विभाग हॉटेलची तांत्रिक यंत्रणा सांभाळत असतो. त्यात एअर कंडिशनर्स, बॉयलर्स, वीज व्यवस्था, बांधकामातील छोटे बदल. इ. तांत्रिक बाबी येतात. मुख्य अभियंत्याच्या हाताखाली मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल कर्मचारी तसेच आर्किटेक्ट काम करीत असतात. प्लंबर       पान ४ पाहा श्व्       पान १ वरून श्व् कारपेंटर, कॅबिनेट मेकर, वायरमन यांना या विभागात संधी असते. याशिवाय या क्षेत्रात सिक्युरिटी, पर्सोनेल, पर्चेस हे तीन विभाग महत्त्वाचे आहेत.
पर्चेस विभाग हा खरेदी विभागाशी संबंधित असून, यात पर्चेस मॅनेजर, पर्चेस क्लार्क, स्टोअरकीपर, स्टोअर क्लार्क इ. पदे येतात. पर्सोनेल विभागावर कर्मचाऱ्यांची भरती व कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना राबवण्याचे काम या विभागावर असते. त्यासाठी या विभागात पर्सोनेल मॅनेजर, वेल्फेअर मॅनेजर यांच्याबरोबर टाइम ऑफिस कर्मचाऱ्यांची गरज असते. याशिवाय प्रशिक्षण लाँड्री, दूरध्वनी, जनसंपर्क, हेल्थ क्लब, बिझनेस सेंटर हे छोटे-मोठे विभाग कार्यरत असतात.
प्रशिक्षणानंतर जसे हॉटेल उद्योगात भरती होता येते, तसेच अकुशल कामगार मोठय़ा प्रमाणात स्वकर्तृत्व कष्ट आणि शिस्त याद्वारे उत्तम आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकतो.

प्रशिक्षण संस्था
हॉटेल व्यवसायात भरती प्रामुख्याने हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमधील पदवी/ पदविका या आधारे केली जाते. केंद्र शासनाच्या वतीने देशभर अशा १९ संस्था असून त्यापैकी एक संस्था मुंबईत आहे. केंद्र सरकारची मान्यता असलेल्या फूड क्राफ्ट संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांची निम्नस्तरीय आणि मध्यम व्यवस्थापनात मोठय़ा प्रमाणात भरती केली जाते. असे केंद्र पुण्यात आहे. ही झाली शासकीय पातळीवरील प्रशिक्षण आणि भरतीप्रक्रिया. त्याचप्रमाणे साखळी पद्धतीची अनेक हॉटेल्स देशात असून त्यांची स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रे आहेत. यासाठी महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स, ट्रेनिंग मॅनेजर, द ताज महाल हॉटेल, मानसिंग रोड, नवी दिल्ली-११ तर्फे दोन वर्षांचा या विषयाचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यातील उमेदवारांना उत्तम विद्यावेतन मिळते. अभ्यासक्रम पूर्ण होताच उमेदवारांना सेवेत सामावून घेतले जाते. ज्या उमेदवारांना बारावीला ४५ टक्के गुण आहेत, त्यांना अ‍ॅप्रेंटिस म्हणून भरती केले जाते आणि तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला जातो.
* ऑबेरॉय सेंटर ऑफ लर्निग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट यांच्या ओबेरॉय स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेतर्फे नवी दिल्लीत हॉटेल ऑपरेशन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट (डउछऊ) हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. या संस्थेतर्फे सीनिअर किचन ट्रेनिंग (तीन वर्षे) अभ्यासक्रमही शिकवला जातो. याशिवाय हाऊसकीपिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग आणि ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट संबंधी प्रत्येकी दोन वर्षांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यासाठी हॉटेल मॅनेजमेंटच्या पदविकाधारकांसोबत पदवीधरांनाही प्रवेश दिला जातो. अधिक माहितीसाठी ओबेरॉय सेंटर ऑफ लर्निग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट १, रामनाथ मार्ग, दिल्ली- ५४ या ठिकाणी संपर्क साधावा. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना सेवेत सामावून घेतले जाते.
* कर्नाटकच्या मणिपाल येथे वेलकम ग्रुप ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिक व्हॅली या संस्थेतर्फे तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतो. यात बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवेश दिला जातो.
* अकादमी ऑफ क्युलिनर एज्यु. एडेड, दि गोवा बीच रिसॉर्ट, गोवा येथे तीन वर्षांचा कॅटरिंग अँड फूड सायन्स अभ्यासक्रम घेतला जातो.

bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…
Navi Mumbai parking problem
नवी मुंबई : वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंग समस्या अधिक जटील

अभ्यासक्रम
हॉटेल अभ्यासक्रमातील देशातील सर्वोच्च संस्था म्हणजे केंद्र सरकारची नवी दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ही होय. त्यांच्या अधिपत्याखाली देशभर १९ प्रशिक्षण संस्था असून महाराष्ट्रात कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्युट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई-२८ ही संस्था मुंबईत आहे. यातील प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यासाठी उमेदवाराला ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
* गव्हर्नमेन्ट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंगच्या डेहराडून, अलमोरा येथे हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्था असून दोन्ही ठिकाणी तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम शिकवला जातो.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मौलाना आझाद एज्युकेशन कॅम्पस, औरंगाबाद येथून हॉटेल मॅनेजमेंटमधून बी. ए. करता येते.
* नवी दिल्लीच्या आर. एम. इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आणि चार वर्षांचा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अभ्यासक्रम करता येतो.
* इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी अँड सप्लाइड न्युट्रिशन, मिरत येथे तीन  वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू आहे.
* कालिकतच्या ओरिएन्टल स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू आहे.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ुशनल एरिया पुंडग, रांची-८३४००४.
(तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम)
* मेरिट स्वीस एशियन स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, २२ हॅवलॉक रोड, उटी- ६४३००१.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कोलकाता- ७०००६४. (तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रम)
* आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, ए. एस्सी. सेंटर, बंगळुरू (तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रम)

राज्यातील प्रशिक्षण संस्था
अनेक अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंगचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा लागतो. यासाठीचे अर्ज पुढील ठिकाणी उपलब्ध होतील.
* जॉइन्ट डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिजनल ऑफिस गव्हर्नमेन्ट पॉलिटेक्निक कॅम्पस, व्ही. एम. व्ही. रोड, गाडगेनगर,
अमरावती- ४४४६०३.
* जॉइन्ट डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिजनल ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिजनल ऑफिस स्टेशन रोड, उस्मानपुरा,
औरंगाबाद- ४३१००५.
* जॉइन्ट डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिजनल ऑफिस, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, गव्हर्नमेन्ट पॉलिटेक्निक कॅम्पस,
नागपूर- ४४०००१.
* जॉइन्ट डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिजनल ऑफिस, सामानगाव रोड, गव्हर्नमेन्ट पॉलिटेक्निक्स, नाशिक रोड, नाशिक- ४२२१०१.
* जॉइन्ट डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिजनल ऑफिस, बहिरट पाटील चौक, गव्हर्नमेन्ट पॉलिटेक्निक फॉर डिस्टन्स लर्निगसमोर,
पुणे-४११०१६.                  2