|| प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख

इंग्लंडमधील लंडन येथे स्थित असलेले इम्पिरियल कॉलेज ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मेडिसिन हे एक शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ ‘इम्पिरियल कॉलेज’ या नावाने सर्वत्र ओळखले जाते. या विद्यापीठाची स्थापना १९०७ साली झाली आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार इम्पिरियल कॉलेज हे जगातले आठव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.

इसवी सन १८५१मध्ये प्रिन्स अल्बर्टने ‘व्हिक्टिोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियम’, ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’, ‘रॉयल अल्बर्ट हॉल’, ‘रॉयल कॉलेज’ आणि ‘इम्पिरियल इन्स्टिटय़ूट’ या सर्व छोटय़ा संस्थांना एकत्रित आणून एक मोठे सांस्कृतिक केंद्र तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार मग १९०७ मध्ये रॉयल चार्टरच्या माध्यमातून रॉयल कॉलेज, रॉयल स्कूल ऑफ माईन्स आणि सिटी अ‍ॅण्ड गिल्डस् कॉलेज व इतर काही संस्थांना एकत्र आणून इम्पिरियल कॉलेजची स्थापना केली गेली. तीस वर्षांपूर्वी १९८८ मध्ये इम्पिरियल कॉलेज स्कूल ऑफ मेडिसिनची स्थापना सेंट मेरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूलमध्ये विलीनीकरणाद्वारे करण्यात आली. अलीकडे २००४ मध्ये, राणी एलिझाबेथ यांच्या पुढाकाराने इम्पिरियल कॉलेज बिझिनेस स्कूलची स्थापना झाली.

इम्पिरियल कॉलेज हे मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देते. तरीही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक वापरावर विद्यापीठाचा भर अधिक आहे. ‘सायंटिफिक नॉलेज-द क्राऊिनग ग्लोरी अ‍ॅण्ड द सेफगार्ड ऑफ द एम्पायर’ हे इम्पिरियल कॉलेज विद्यापीठाचे ब्रीदवाक्य विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस दक्षिण केन्सिंग्टनमध्ये स्थित आहे तर व्हाइट सिटीमध्ये विद्यापीठाचा नूतनीकरण केलेला नवीन परिसर आहे. इम्पिरियल कॉलेजचे सिल्वुड पार्क येथे संशोधन केंद्र आहे तर लंडनमधील हॉस्पिटल्स व आरोग्य केंद्रांमधून वैद्यकीय शिक्षणासाठी साहाय्य घेतले जाते. विद्यापीठाच्या एकूण विद्यार्थ्यांपकी जवळपास साठ टक्के विद्यार्थी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत आणि ते जगभरातील एकूण १४० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधित्व या एकाच कॅम्पसमध्ये करतात. कॅम्पसमध्ये विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आणि निवासी व्यवस्था आहेत. सध्या इम्पिरियल कॉलेजमध्ये जवळपास चार हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास अठरा हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

इम्पिरियल कॉलेज विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. त्यापकी बहुतांश अभ्यासक्रम हे चार किंवा पाच वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी वैद्यकीय, जैवतंत्रज्ञान, विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. इम्पिरियल कॉलेजमध्ये एकूण पाच प्रमुख शैक्षणिक विभाग म्हणजे फॅकल्टीज आहेत. विद्यापीठातील फॅकल्टी ऑफ इंजिनीयिरग, फॅकल्टी ऑफ मेडिसिन, फॅकल्टी ऑफ नॅचरल सायन्सेस, इम्पिरियल कॉलेज बिझनेस स्कूल आणि एज्युकेशन सेंटर या पाच प्रमुख विभागांमार्फत शेकडो पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

इम्पिरियल कॉलेज विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आíथक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना काही अटींवर हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इम्पिरियल कॉलेज रेडिओ, इम्पिरियल कॉलेज टीव्ही, फेलिक्स न्यूजपेपरसारख्या संगीत, नाटय़ व क्रीडा क्षेत्रातील इतर अनेक  सोयीसुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

संकेतस्थळ – http://www.imperial.ac.uk/

वैशिष्टय़े

राजघराण्याकडून मिळणारी आíथक मदत व मौलिक मार्गदर्शन यांमुळे इम्पिरियल कॉलेज विद्यापीठ हे नेहमीच वलयांकित राहिलेले आहे. विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण व संशोधन यामुळे हे विद्यापीठ जगभरातील सर्व कुशाग्र विद्यार्थ्यांना दरवर्षी आकर्षति करते. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध लेखक, कलाकार आणि शास्त्रज्ञ, निर्माण केले आहेत. यामध्ये महान शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग, साहित्यिक एच. जी.वेल्स यांचा समावेश आहे.

आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार, विद्यापीठातील एकूण १४ माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आणि एक टय़ुरिंग पुरस्कार विजेते आहेत.

itsprathamesh@gmail.com