सध्याच्या काळात स्पर्धा वाढतेय, मुलांच्या मनावरचं यशापयशाचं दडपण वाढतंय आणि तसंच मुलांच्या समस्यांचं प्रमाणही! मुलांसाठी बरंच काही करत असतानाही असं का, हा प्रश्न पालकांना अस्वस्थ करतोय. या टप्प्यावर मुलांना समजून घेणं आपल्याला कठीण जातंय का, याचा विचार होणं आवश्यक ठरतं.
व्यक्तिगत पातळीवर मुलांच्या शिक्षणाची चिंता वाहताना सामाजिक पातळीवर हाच प्रश्न  उग्र होताना दिसतो. केवळ १० ते १५ टक्के विद्यार्थ्यांचं करिअर घडविणाऱ्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये दहावीपर्यंत गळतीचं प्रमाण सुमारे ६० ते ६५ टक्के इतकं भयानक आहे. शिक्षणाची थाटलेली दुकानं, परीक्षापद्धतीतील त्रुटी, विद्यार्थ्यांचं आत्महत्येचं वाढतं प्रमाण, कमालीची बेकारी.. एक ना अनेक. एकूणच, बहुसंख्य विद्यार्थ्यांचं भवितव्य न ठरवू शकणाऱ्या आपल्या शिक्षणपद्धतीविषयीचे हे अपेक्षित प्रश्न… सर्वासाठीच!
१.  जीवन समृद्ध करतं ते शिक्षण; मग केवळ साक्षर होऊन नोकरी वा व्यवसाय करून पसे कमावणं हेच शिक्षणाचं एकमेव फलित आहे काय?
२.  अभ्यास हा शिकण्यासाठी (अर्थात जगण्यासाठीही) करायचा असतो. मग अभ्यास करणं बहुसंख्य मुलांना शिक्षा का वाटते? चौथी-पाचवीपर्यंत साधारणपणे ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी पुढल्या इयत्तांमध्ये कमी-कमी का होत जाते?
३.  मनुष्य अनुभवांतून, कृतीतून, सरावातून चुकतमाकत शिकत असतो; शहाणा होत असतो, मग विविध विषयांची माहिती (पाठांतर वा लिहून) लक्षात ठेवून परीक्षेच्या वेळी आठवून सांगणं वा लिहिणं; यातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचं.. गुणवत्तेचं मूल्यमापन होतं का? पुढल्या इयत्तेत गेल्यावर मागील अभ्यास विसरला जातो; मग केवळ परीक्षेसाठीच अभ्यास करायचा असतो का?
४. परीक्षेचं स्वरूप साचेबंद असूनही, बरेच सोपे वस्तुनिष्ठ प्रश्न असूनही; नोट्स, गाइडस्, अपेक्षित प्रश्नसंच असूनही; अचूक उत्तरांसाठी क्लास..
सराव वर्ग असूनही; पालकांनी वेळ आणि हजारो रुपये खर्च करूनही; हजारो विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ३५% गुण मिळवणं अशक्य का होतं? मुलांचं आकलन वा स्मरणशक्ती इतकी सुमार असते का?
५.  मुलं घरी मनापासून अभ्यास करण्यासाठी बसत नाही म्हणून; त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं म्हणून; टी.व्ही., नेट, मोबाइल, खेळ यांमध्ये बराच वेळ वाया घालवतात म्हणून; आणि अर्थातच, अधिक टक्के मिळावेत म्हणून; क्लासेसवर हजारो रुपये खर्च केले जातात, तरीही बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये विशेष फरक पडत नाही, असं का?
६.  बहुसंख्य विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं ठाऊक असूनही.. परीक्षेच्या भीतीमुळे वा अभ्यासाच्या टेन्शनमुळे नीट काही आठवत नाही किंवा अचूकपणे लिहिता येत नाही, त्यामुळे परीक्षेत अपेक्षित गुण मिळत नाहीत; अशा वेळी केवळ परीक्षेतील गुणांवरून साधारण/ मध्यम/ हुशार अशी तुलना वा वर्गवारी करणं योग्य आहे का?
७.  कोणताही विद्यार्थी जसा एखाद्या विषयात ‘ढ’ असू शकतो, तसा दुसऱ्या एखाद्या विषयात सर्वाधिक हुशार असू शकतो (हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी’). कठीण वा नावडत्या विषयांत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं एक लाखमोलाचं वर्ष वाया जातं. मग वर्षभरातील वाचन,
लेखन, गृहपाठ, स्पर्धामधला सहभाग, खेळ, शिस्त, अभ्यास प्रकल्प, कळत नकळत मिळालेलं शहाणपण, मत्रीभाव, उपस्थिती आणि एक अभ्यासाचं वर्ष यांची गोळाबेरीज विद्यार्थ्यांला ‘नापास’ या संकल्पनेपासून वाचवू शकणार नाही का?
८.  उत्तरपत्रिकांचं गुणमापन/ मूल्यमापन हे त्या त्या विषयाच्या शिक्षकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोनावर, अपेक्षांवर, तारतम्य वृत्तीवर अधिक अवलंबून असतं. मग या पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच प्रकारे योग्य आणि अचूक गुणमापन कसं शक्य आहे?
९.  शाळा-कॉलेजात शक्यतो पाच तास, क्लासेसचे किमान तीन ते चार तास, होमवर्कसाठी अंदाजे एक ते दोन तास म्हणजे दिवसभरातील साधारणपणे १० तास ‘अभ्यास एके अभ्यास’ करण्यासाठी सातत्यानं लागणारी एकाग्रता, शारीरिक क्षमता, मानसिकता आणि चिकाटी सर्वच मुलांमध्ये एकाच वेळी सारख्या प्रमाणात असते काय?
१०.  सहा वर्षांच्या आतील मुलांना सक्तीनं लिहायला, वाचायला शिकवणं हे अनसíगक आणि अशास्त्रीय आहे, असं मेंदूशास्त्र सांगतं. मग आपण कोवळ्या वयातच मुलांच्या शिक्षणाचा बाजार का मांडला आहे?
११. बालवयातील बौद्धिक जडणघडणीच्या काळात; मेंदू आणि शारीरिक वाढीच्या दृष्टीनं खेळ हे अधिक पोषक-पूरक असतात. मग केवळ अभ्यासासाठी आपण मुलांचं स्वच्छंदी खेळणं बंद करून त्यांच्या ‘खऱ्या शिक्षणाचा’.. जगण्यातल्या आनंदाचा खेळखंडोबा का करीत आहोत?
१२.  बालवयात स्वत:हून अनेक गोष्टी करू पाहणाऱ्या मुलांना जाणत्या वयात स्वयंशिस्त वा स्वावलंबन म्हणून स्वत:ची अथवा घरातली कामं करणं कमीपणाचं का वाटतं? दिवसभरात जगण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी हजारोंच्या श्रमातून, सेवेतून मिळत असतात; मग आपल्या शिक्षणपद्धतीत श्रममूल्यांना, व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व का नाही?
१३.  शिकण्याच्या आरंभापासूनच शिक्षा, भीती, तुलना, अपेक्षा आणि स्पर्धा यांचं चुकीच्या पद्धतीनं मुलांच्या मनावर दडपण आणलं जातं. त्यामुळे दहावीपूर्वीच सुमारे ६० ते ६५% शाळा सोडणारी.. वयात येताना विविध मनोविकारांनी ग्रासलेली.. आत्मविश्वास, स्व-ओळख हरवून बसणारी, आत्महत्या, व्यसनं आणि अंधश्रद्धांना बळी पडणारी मुलं पाहून; शिक्षणपद्धतीत मूलभूत बदल व्हावेत असं वाटत नाही का?
१४.  खरं तर नवनव्या चुकांमधूनच अनुभव आणि शहाणपण मिळत असतं, हे ठाऊक असूनही बहुतेक शाळा, क्लासेस आणि घराघरांमधून मुलांची नेमकी समस्या वा मानसिकता लक्षात न घेता सर्वसाधारण चुकांसाठी अवहेलना केली जाते. सर्वासमोर ‘गाढव’, ‘बेअक्कल’, ‘मठ्ठ’, ‘नालायक’ ठरवून अपमान केला जातो. शाळेत, क्लासेसमध्ये शिकविण्यापेक्षा शिक्षेसाठी पट्टी, डस्टर तर बऱ्याच घरांमधून पट्टी, बेल्ट, काठी, झाडू, चप्पल यांचा वापर केला जातो. या चुकीच्या शिक्षांचा मुलांच्या मनावर आणि भावविश्वावर होणारा विपरीत परिणाम जाणवत नाही का?
१५. मूल हे मातृभाषेतून वा कौटुंबिक भाषेतून सहज संवाद साधत शिकत असतं. कोणतीही भाषा ही ऐकून, बोलून शिकता येते. अभ्यासानं त्या भाषेवर प्रभुत्वही मिळवता येतं. जर मुलांना मातृभाषेचं नीट आकलन झालं नाही; तर दुसरी कोणतीही भाषा शिकताना वा आत्मसात करताना अनेक भावनिक आणि भाषिक समस्या उद्भवत असतात. कारण आपल्याकडे कोणत्याही भाषेचा अभ्यास हा केवळ परीक्षेतल्या गुणांसाठी विषय म्हणूनच मर्यादित राहतो. ज्यांना उपजत भाषिक बुद्धिमत्ता लाभलेली आहे अशा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या काही मुलांचा अपवाद वगळता अनेक मुलं ही विविध मनोविकारांनी ग्रासलेली आढळत असतानाही; आपण हे दुष्टचक्र का थांबवत नाही? इंग्रजीत संभाषण करणं वा शिकणं हेच यशाचं एकमेव गमक आहे काय? मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या स्पध्रेच्या जगात यश मिळवताच आलं नाही का?
१६.  माणसाच्या हातात प्रतिसृष्टी घडविण्याचं सामथ्र्य दडलं आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाटय़, संगीत, साहित्य, इ. ६५ कलांचा आविष्कार हातातूनच घडत असतो. आपल्या शिक्षणपद्धतीत केवळ गृहपाठ वा उत्तरं किंवा उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी हाताचा वापर केला जातो. हाताचं हृदयाशी आणि मेंदूशी असलेलं नातं तुटल्यामुळे आयुष्यातल्या प्रारंभीची सुमारे १५ ते १७ वष्रे आपण अभ्यासाच्या नावाखाली हातातल्या प्रतिभेचा, सर्जनशीलतेचा बळी घेत नाही काय?१७. भाषिक आणि गणिती बुद्धिमत्ता ज्यांना उपजत लाभल्या आहेत; त्यांना आपली शिक्षणपद्धती अधिक पोषक आणि उपयुक्त आहे. ज्यांना हॉवर्ड गार्डनरच्या थिअरीनुसार.. सांगीतिक, शारीरिक, अवकाशीय, आंतर-व्यक्ती, व्यक्ती-अंतर्गत, निसर्गविषयक बुद्धिमत्ता लाभतात त्यांना आपण ‘ढ’ ठरवत नाही काय? नाटय़, चित्र, संगीत, नृत्य, खेळ, अभिनय, पत्रकारिता, अनुवाद, चित्रकला, शिल्पकला, साहित्य, जाहिरात, प्रकाशआरेखन, अक्षरसुलेखन, निवेदन, दिग्दर्शन, संपादन, नेतृत्व, गायन, वादन, छायाचित्रण, वेषभूषा, रंगभूषा, ध्वनिमुद्रण, सजावट, कलादिग्दर्शन या आणि अशा अनेक कला क्षेत्रांत करिअर करता येईल अशा विद्यार्थ्यांना अगदी पाचवीपासून त्यांची बुद्धिमत्ता, गुणवत्ता, क्षमता, कल आणि सुप्त गुण ओळखून त्यांच्या आवडीच्या विषयांचं शिक्षण देणं शक्य होणार नाही काय?
१८.  शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो, मग आपल्या आजूबाजूला शिक्षण घेऊनही भ्रष्ट, व्यसनी, बेशिस्त, व्यभिचारी, कामचोर, खुनशी प्रवृत्तीची, सामाजिक भान नसलेली माणसं दिवसेंदिवस का वाढत आहेत?
१९. आपण जो व्यवसाय वा नोकरी करीत आहात, त्याचा तुमच्या पदवीशी, पदविकेशी (अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि शिक्षणशास्त्र या शाखा सोडल्यास) खरंच किती संबंध आहे आणि तुमच्या आजवरच्या यशात, कर्तृत्वात दहावी आणि बारावीच्या टक्क्यांचं योगदान नेमकं किती आहे?
२०. पदवी/ पदविका घेतल्यावर वा कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीसाठी ‘अनुभव आहे काय?’ असं विचारण्यात येतं, याचा अर्थ असा, १५-१७ वष्रे केलेल्या अभ्यासाचा, शिक्षणाचा व्यावहारिक अनुभवांशी संबंध नाही. मग आयुष्यातली जडणघडणीची.. उमेदीची २०-२२ वष्रे आणि हजारो रुपये खर्चून मिळवलेल्या पदवीला, पदविका आणि कोर्सला खरंच काही अर्थ नाही का?
२१. मेंदू हा शिकण्याचा अवयव असल्यामुळे; एक माणूस म्हणून आयुष्याचं मोल, आरोग्य-आहाराचं महत्त्व, राष्ट्रप्रेम, समाज बांधिलकी, व्यक्तिमत्त्व विकास, कलांचा अभ्यास नि आस्वाद, मूल्यशिक्षण, नागरिकशास्त्र, संभाषण कौशल्य, सेवाभाव, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरणाचं संरक्षण, निसर्गप्रेम, खेळ, विज्ञाननिष्ठता, इतिहास, लंगिकता यांचं ‘शिक्षण’ परीक्षेशिवाय देता येणार नाही का? इतर सर्वच विषयांची साचेबंद पद्धतीनं परीक्षा आवश्यक आहे काय? काही विषय अनुभवांसाठी, ज्ञाननिर्मितीसाठी, आनंदासाठी, सर्जनशीलतेसाठी, जगण्यासाठी परीक्षा न घेता शिकवता येणार नाहीत काय?