News Flash

एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था, ग्रामविकास व सहकार

पेपर ४ मधील कृषीविषयक घटकांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून करणे आयोगाला अपेक्षित आहे.

| August 24, 2015 01:12 am

पेपर ४ मधील कृषीविषयक घटकांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून करणे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचे आर्थिक पलू या पेपरच्या तयारीसाठी अभ्यासणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यासक्रमाची विभागणी कशा प्रकारे करावी हे आपण मागच्या लेखामध्ये पाहिले. आज आपण अभ्यास कसा करावा याची चर्चा करुयात.
कृषी क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व समजून घेण्यासाठी पाहणी अहवालातून GDP, GNP रोजगार आयात-निर्यात यातील कृषी क्षेत्राचा वाटा (टक्केवारी) पाहायला हवा. याबाबत उद्योग व सेवा क्षेत्राशी कृषी क्षेत्राची तुलना लक्षात घ्यावी. कृषी व इतर क्षेत्रांचा आंतरसंबंध पाहताना कृषी आधारित व संलग्न उद्योगांचे स्वरूप, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व या बाबींचा आढावा घ्यावा.
वेगवेगळ्या पंचवार्षकि योजनांमध्ये कृषिविकासासाठी ठरविण्यात आलेली धोरणे व योजनांचा थोडक्यात आढावा घ्यावा आणि त्यांचे यशापयश लक्षात घ्यावे. १०व्या, ११व्या व १२व्या पंचवार्षकि योजनांमधील कृषीविषयक धोरणे, योजना यांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. याचबरोबर ग्रामीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या सामाजिक व आíथक क्षेत्रातील योजनांचाही आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा विचार करायला हवा.
कृषी क्षेत्राची वैशिष्टय़े
कृषी क्षेत्रासाठी होणारा जमिनीचा वापर वेगवेगळ्या पलूंतून लक्षात घ्यायला हवा. एकूण जमिनींपकी शेतीसाठी होणाऱ्या वापराची टक्केवारी, सिंचित क्षेत्राची टक्केवारी व क्षेत्रफळ, कोणत्या पिकासाठी किती जमीन वापरली जाते त्याची टक्केवारी माहीत असणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेमध्ये अग्रेसर असलेली पहिली तीन राज्ये व क्रमवारीतील महाराष्ट्राचा क्रमांक तसेच महाराष्ट्रातील प्रमुख पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असेलेले पहिले तीन जिल्हे माहीत करून घ्यावेत.
महत्त्वाच्या पिकांसाठी राज्यातील उत्पादकता कमी/जास्त का आहे याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचे सामाजिक, आर्थिक परिणामही समजून घ्यावेत आणि त्यावरील विविध उपाययोजना माहीत करून घ्याव्यात. हे करताना शासकीय योजनांवर भर द्यावा. त्याचप्रमाणे ICAR, MCAER अशा संस्थांचे कार्य समजून घ्यावे. या संस्थांची रचना, स्थापना वर्ष, कार्य, उद्दिष्ट समजून घ्यावे.
कृषी उत्पादकतेमध्ये पशुधनसंपत्तीचाही महत्त्वाचा वाटा असतो. पशुधनाच्या संख्येबाबत, टक्केवारीबाबत व उत्पादकतेबाबत अग्रेसर असलेली राज्ये व जिल्हे यांची माहिती असायला हवी. पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, धवलक्रांती, रजतक्रांती, गुलाबीक्रांती इत्यादींचा आढावा घ्यायला हवा. यामधील तरतुदी, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष, मूल्यमापन इत्यादी पलू  लक्षात घ्यावेत.
मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन व पशुसंवर्धन या क्षेत्रांची वैशिष्टय़े, गरजा, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व इत्यादी पलू व्यवस्थित समजून घ्यावेत. अभ्यासादरम्यान या क्षेत्रांच्या संवर्धनासाठीचे शासकीय उपाय व योजनांचा आढावा घेणे अत्यावश्यक आहे.
कृषी उत्पादकतेमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या जलव्यवस्थापनाचा सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे. पर्जन्याश्रयी शेती, सिंचित शेती इत्यादी सिंचनावर आधारित शेतीचे प्रकार व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. पाटबंधाऱ्यांचे प्रकार, वैशिष्टय़े, महत्त्व माहीत असावेत. मृदा संधारणाची गरज, आवश्यकता, त्यातील घटक, समस्या, उपाय इत्यादी बाबी समजून घ्याव्यात. जलसंधारणाचे महत्त्व, प्रकार, घटक, समस्या, उपाय इत्यादी बाबी समजून घ्याव्यात. या दोन्हीमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी ठाऊक असणे आवश्यक आहे.
कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर, हरितक्रांती, यांत्रिकीकरण, जीएम बियाणे यांचे स्वरूप, महत्त्व, परिणाम यांची समज विकसित व्हायला हवी. तंत्रज्ञानाच्या वापराचे आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय परिणाम व्यवस्थित समजून घ्यावेत. समस्या व उपायांचा आढावा घ्यावा आणि चालू घडामोडींबाबत अद्ययावत माहिती मिळवावी.
कृषी अर्थशास्त्र
कृषी उत्पादनांचे वितरण व मूल्यांकन करणाऱ्या संस्थांची माहिती असणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किमती तसेच कृषी उत्पादनांच्या विपणनासाठीच्या व किंमत स्थिरीकरणासाठीच्या शासकीय योजना माहीत असायला हव्यात. साठवणुकीतील समस्या व त्यावरील उपाय माहिती करून घ्यावेत. या दृष्टीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक आहे.
कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची स्थापना, रचना, कामे, उद्दिष्टे इत्यादी बाबींच्या अनुषंगाने आढावा घ्यावा. ग्रामीण कर्जबाजारीपणाचा अभ्यास हा कारणे, स्वरूप, उपाय व परिणाम या मुद्दय़ांच्या अनुषंगाने करायला हवा.
कृषी उत्पादनांच्या निर्यातीबाबत GATT व WTO चे महत्त्वाचे करार, त्यातील तरतुदी व संबंधित चालू घडामोडी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. या तरतुदी व घडामोडींचा भारतीय कृषी क्षेत्रावरील व निर्यातीवर होणारा परिणाम समजून घ्यावा. शेतकरी व पदासकारांचे हक्क, त्यांचे स्वरूप व अंमलबजावणी यांचा आढावा घ्यायला हवा.
अन्न व पोषणआहार
भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. परीक्षार्थीनी अन्न स्वावलंबन, अन्नसुरक्षा या संकल्पना समजून घ्यायला हव्या. अन्नसुरक्षा अधिनियम, अन्न सुरक्षिततेमधील समस्या व उपाय, त्या दृष्टीने अन्नाची आयात व निर्यात या बाबी समजून घ्याव्यात. अन्नाचे कॅलरी मूल्य व त्याची मोजणी, चांगले आरोग्य व समतोल आहार, मानवी शरीरास आवश्यक ऊर्जा व पोषण मूल्य यांचा तक्त्यामध्ये अभ्यास करता येईल.
भारतातील पोषणविषयक समस्या, त्याची कारणे व परिणाम, याबाबतची शासनाची धोरणे, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन इत्यादी पोषणविषयक योजनांची उद्दिष्टे, त्याचे स्वरूप, लाभार्थी अशा मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2015 1:12 am

Web Title: indian agriculture system rural development and cooperatives
Next Stories
1 करिअरन्यास
2 सैन्यदलात कायदा पदवीधरांसाठी संधी
3 नवी संधी
Just Now!
X