इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ येथे उपलब्ध असणाऱ्या वन-व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५०% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५% गुणांसह) उत्तीर्ण असावी अथवा ते यंदा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदारांनी सीएटी-२०१३ ही व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटी-२०१३ मधील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
विशेष शिष्यवृत्ती : वरील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील कामगिरीच्या आधारे दरमहा पाच हजार रुपयांची विशेष शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ९०० रुपयांचा (राखीव गटातील उमेदवारांनी ४५० रुपयांचा) डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या नावे असणारा व भोपाळ येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिटय़ूटच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती आणि तपशिलासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या http://www.iifm.ac.in/admission अथवा http://www.mponline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, नेहरू नगर, भोपाळ ४६२००३ या पत्त्यावर
२१ जानेवारी २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांना वन-व्यवस्थापन क्षेत्रात विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.