केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय अर्थ-सेवा व भारतीय सांख्यिकी सेवा-२०१५ अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर  स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. त्याकरता खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
उपलब्ध जागा
या स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या जागांची एकूण संख्या ६१ असून, त्यापैकी सहा जागा भारतीय अर्थ सेवा तर ५५ जागा भारतीय सांख्यिकी सेवेअंतर्गत उपलब्ध आहेत.
 शैक्षणिक पात्रता
अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत-
भारतीय अर्थ सेवा : उमेदवारांनी अर्थशास्त्र, व्यवसाय अर्थशास्त्र, अप्लाइड इकॉनॉमिक्स, इकॉनॉमॅट्रिक्स यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
भारतीय सांख्यिकी सेवा उमेदवारांनी सांख्यिकी, गणितीय सांख्यिकी, अप्लाइड स्टॅॅटिस्टिक्स यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोगट
उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड परीक्षा
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा मुंबईसह देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
स्पर्धा परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क
अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर २० मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २६ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.