उद्योगाचा विस्तार आणि उन्नतीसाठी हस्तांतरणाची मदत होऊ शकते, ही गोष्ट लघुउद्योजकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. काळजीपूर्वक केलेल्या अधिकारांच्या हस्तांतरणाने जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे वाटप होते आणि त्याद्वारे नेतृत्वांची निर्मितीही होते..
स्वत:तील औद्योगिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून मोठा उद्योगसमूह निर्माण करण्याची तुमची महत्त्वाकांक्षा आहे का? संभ्रमात टाकणारी बाब म्हणजे उद्योग मोठय़ा प्रमाणावर वाढवण्याची इच्छा असूनही जवळपास ८० टक्के लघु आणि मध्यम उद्योजकांवर पहिल्या पाच वर्षांच्या आतच गाशा गुंडाळण्याची वेळ येते. दळणवळण, तंत्रज्ञान, आíथक अडचणी, स्पर्धा या बाह्य आव्हानांसोबतच भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावणारे अंतर्गत आव्हान म्हणजे भारतीय लघु उद्योजकांची संकुचित विचारसरणी.
जेव्हा मध्यम आकाराच्या उद्योगाची वाटचाल मोठय़ा उद्योगाच्या दिशेने सुरू होते, तेव्हा उद्योजकाने नफ्यातील वाढ, विक्री व विपणन, नवीन उत्पादनाचे विकसन, उद्योगासाठी नवनवीन भौगोलिक क्षेत्रांची निवड, ‘ब्रँड’चे विकसन अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरते. या सर्व मोठय़ा ध्येयांवर लक्ष केंद्रित करायला सवड मिळण्यासाठी व्यवस्थापनाची दुसरी फळी तयार करणे गरजेचे असते, पण प्रत्यक्षात मात्र, उद्योगउभारणीच्या पहिल्या दिवसापासून व्यवसायातील दैनंदिन कामकाजात गुरफटलेला उद्योजक सर्व सत्ता स्वत:च्याच हातात ठेवतो, हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडे अधिकार सोपवण्यास तो राजी नसतो.
लघु उद्योगाच्या मालकाचा बहुतांश (८७ टक्के) वेळ कार्यालयीन दैनंदिन कामात/ मूल्यवर्धन नसलेली कामे उरकण्यात जातो. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘खरेदी व्यवस्थापन’, हे त्याच्या अंगवळणी पडलेले काम. इतके वर्ष पुढाकार घेऊन हिकमतीने जोडलेल्या पुरवठादारांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे सोपवण्यापेक्षा स्वत:च करणे उद्योजकाला सोपे वाटते, कारण कार्यपद्धतीची पूर्ण जाण असल्याने, पुरवठादारांकडून जास्तीतजास्त सवलती आणि लाभ (कमी किमतीत खरेदी करणे) करून घेणे त्याला सहज जमते. पण प्रश्न असा उभा राहतो की, ही लघु उद्योजकाच्या वेळेची योग्य गुंतवणूक आहे का? की यामुळे मोठय़ा, महत्त्वाच्या उद्दिष्टांकडे दुर्लक्ष होईल, तसेच नवीन नेतृत्वाच्या घडण प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल? खरं पाहता, महत्त्वपूर्ण निर्णायक प्रकल्प कामांमध्ये सहकारी कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतल्याने, त्यांच्या कौशल्यांत व क्षमतांत वाढ होते. आगामी काळात त्यांच्यावर कामगिरी सोपवताना, त्या उत्तमरीत्या पूर्ण होतील, याबाबत कर्मचाऱ्यांचाहीं आत्मविश्वास वाढतो आणि उद्योजकांचीही कर्मचाऱ्यांबद्दलची विश्वासार्हता वाढते.
सर्व कामे स्वत: करण्याची उद्योजकाची मानसिकता नफ्याला मारक ठरते. परिणामी, व्यवसाय प्रचंड तोटय़ात जातो, भांडवल व साधनसामग्रीचेही नुकसान होते आणि उदयास येणारा एक शक्तिशाली उद्योग, पत्त्यांचा ढीग कोसळावा तसा भुईसपाट होतो. एक ताजे उदाहरण पाहूया- स्वत: मालक चालवत असलेली धातू उद्योगातील एक कंपनी होती. त्यात काहीशे कोटींचा धातूमालाचा साठा, पुरेशा आणि सुरक्षित साठवणीच्या सुविधेशिवाय कंपनीत पडून होता. पावसाळ्यापूर्वी या धातूसाठय़ाच्या रक्षणासाठी छप्पर घालणे गरजेचे होते, परंतु कारखान्यातील मुख्य व्यक्तीच्या हातात निर्णयस्वातंत्र्य नसल्याने, तो हा छप्पर बांधण्याचा निर्णय वेळेवर अमलात आणू शकला नाही, या निर्णयाला मालकाकडून मान्यता मिळेपर्यंत पावसामुळे धातूमालाचे व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. जर कारखान्यातील मुख्य व्यक्तीकडे निर्णय घेण्याचे पुरेसे अधिकार मालकाकडून हस्तांतरित झालेले असते तर कदाचित हे नुकसान टळले असते, अशा प्रकारचे अधिकारांचे हस्तांतरण कर्मचारीवर्गात जबाबदारीची जाणीव आणि कंपनीबद्दल विश्वास निर्माण करते. नुकसानीच्या शक्यतेला घाबरून, अधिकार सोपवण्याबद्दल मनात असणारी भीती उद्योजकाने काढून टाकली पाहिजे.  
उद्योजकांना द्विधा मन:स्थितीला सामोरे जावे लागते. ‘मी कशा प्रकारे हस्तांतरण करायला हवे?’, ‘मी कोणत्या गोष्टींचे हस्तांतरण करायला हवे?’ आणि
‘मी कोणाकडे हस्तांतरण करायला हवे?’ हे प्रश्न उद्योजकाला
पडणे स्वाभाविक आहे.
जर हस्तांतरण (अधिकारांचे) योग्य पद्धतीने झाले तर त्यात दोघेही (उद्योजक, कर्मचारी वर्ग) यशस्वी ठरतात. उद्योजकासाठी निर्णयांचे गांभीर्य आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता यांचे निदान करणे अत्यावश्यक ठरते. सर्वप्रथम एखाद्या विशिष्ट प्रकल्पाचे ध्येय समोर ठेवून त्यासाठी लागणाऱ्या कार्यपद्धतीची आखणी करणे, कालावधी/ अंतिम मुदत, कामाबद्दलच्या अपेक्षा, उत्पादनाची अपेक्षित गुणवत्ता, संभाव्य धोके आणि अपयश आल्यास होणारे दुष्परिणाम, या सर्व मुद्दय़ांचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांचा अनुभव, ज्ञान, कौशल्ये, विचारसरणी, कामाची पद्धत, काम पूर्ण करण्यासाठीची त्याची क्षमता आणि त्याच्यावरील इतर कामांच्या जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.
पुढची पायरी म्हणजे, आखणी केलेल्या कार्यपद्धतीनुसार, ‘निर्णयांचे/अधिकारांचे हस्तांतरण’ यांचा उपलब्ध कर्मचाऱ्यांनुसार ‘आधारक’ (मॅट्रिक्स) आखणे. हस्तांतरणाच्या या योजनेची अंमलबजावणी धोरणीपणे होणे गरजेचे आहे. मालकाने (उद्योजकाने) ‘सर्वज्ञ’ असल्याचा आव न आणता, कर्मचाऱ्यांमध्ये ‘मी हे करू शकतो’ हा आत्मविश्वास िबबवणे यातच खरे
आव्हान आहे.
अशा हस्तांतरणामुळे कामात ज्या चुका किंवा समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्याकडे उद्योजकाने उदार आणि खुल्या दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचे आहे. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या मते, ‘ए शिप इज ऑल्वेज सेफ अ‍ॅट द शोअर बट दॅट इज नॉट व्हॉट इट इज बिल्ट फॉर’. अपरिचित कामे आत्मसात करण्यासाठी त्यांचा सराव करण्याची आणि ती पूर्ण करून दाखवण्याची संधी कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे.
अर्थात, सर्वच कामे किंवा जबाबदाऱ्या कर्मचाऱ्यांवर सोपवून चालणार नाहीत. लघु उद्योजकांनी मूलभूत धोरण आखणी आणि नियोजनाची कामे स्वत:कडे ठेवून, इतर व्यवस्थापकीय कामे उदा. संघर्ष निरसन (कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन), कार्य मूल्यमापन वगर. योग्य तो विवेक बाळगून हस्तांतरित केली पाहिजेत.
योग्य कामे योग्य कर्मचाऱ्याकडे सोपवली गेल्यास रचनात्मक बदल दिसून येतो. मात्र, कर्मचाऱ्याची कार्यक्षमता आणि सोपवलेले काम याचा मेळ जमला नाही तर याचे दोन परिणाम होऊ शकतात- स्वत:चा बचाव करण्यासाठी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेतो किंवा कामाबाबत निष्क्रियता दाखवतो. परिणामी, पूर्ण झालेले काम उत्तम कार्यशक्तीने झालेले नसते. हस्तांतरणाचे मोजमाप, सोपविलेल्या कामांना मिळणाऱ्या प्रतिक्रियांवरून करता येऊ शकते.
सरतेशेवटी, उद्योगाच्या विस्तार आणि उन्नतीसाठी हस्तांतरणाची (डेलिगेशन) मदत होऊ शकते, ही गोष्ट लघु उद्योजकांनी मान्य करणे गरजेचे आहे. तसेच चांगल्या कर्मचाऱ्यांचा हुशारीने वापर केल्यास, असे कर्मचारी उद्योगाच्या प्रगतीसाठी बाजारपेठेत उपयुक्त ठरतात. काळजीपूर्वक केलेल्या अधिकारांच्या हस्तांतरणाने, जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे वाटप होते आणि त्याद्वारे नेतृत्वांची निर्मिती होते..  
(सीनिअर कन्सल्टन्ट, अ‍ॅक्युमेन.), shawn.crasta@acumen.co.in