सुदर्शन पटनाईक या वाळू शिल्प साकारणाऱ्या अवलिया कलाकाराची कला सातासमुद्रापार परिचित आहे. ओदिशा राज्यातील या वालुका शिल्पांच्या जादूगाराने पुरी येथील समुद्रकिनारी वालुका शिल्प शिकविणारी संस्था उभारली आहे. समाजातील प्रवाह, आनंद आणि दु:खद घटनांना देखण्या शिल्पांतून व्यक्त करणाऱ्या या कलेतील ज्ञान आता संपूर्ण जगासाठी उपलब्ध होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि मनुष्यबळ मंत्रालय यांच्या मदतीने वालुका शिल्पकलेचा मुक्त अभ्यासवर्ग येत्या मार्चपासून ऑनलाइन स्वरूपात सुरू होणार आहे. जगात पहिल्यांदाच अशा प्रकारचा वालुका शिल्पाचा अभ्यासवर्ग होणार असून त्याचे रीतसर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतातील कला महाविद्यालयांमध्ये शिल्पकलेला जाणारा मोठा विद्यार्थी वर्ग आहे. माती, पाषाण आणि प्लास्टर ऑफ पॅरिसपासून शिल्प घडविण्याच्या पारंपरिक शिक्षणाला प्रचंड मागणी आहे. वालुका शिल्प हा हौसेचा मामला असला, तरीही त्यामध्येही उत्तम करिअर करता येते, याचे उदाहरण सुदर्शन पटनाईक यांनी घालून दिले आहे. जगभरामध्ये वालुका शिल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत चालला आहे. केवळ हौसेसाठीच नाही, तर व्यावसायिकरीत्या कलाकार या कलेचा फायदा करून घेत आहेत. गेल्या वर्षभरापासून पटनाईक यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि मुक्त विद्यापीठाकडे आपला प्रस्ताव सादर केला. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वालुका शिल्पकला शिकविण्याचा अभ्यासक्रम, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती यांच्याबाबतची आपली निरीक्षणे मांडली. त्यांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमामध्ये ऑनलाइन व्हिडीओद्वारे वालुका शिल्पे घडविण्यातील मूलभूत घटकांपासून ते खास कसबींची माहिती करून दिली जाणार आहे. या अभ्यासक्रमाची पूर्ण तयारी झाली असून जगभरातून त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक विभाग संचालक श्रीकांत मोहपात्रा यांनी सांगितले. या अभ्यासक्रमामुळे जगभरातील वालुका शिल्प साकारणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळेल आणि वालुका शिल्प ही उपयोजित कला म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास पटनाईक यांना वाटतो. कोणतीही कला दिवाणखान्यामध्ये वस्तूरूपात विराजमान झाली की तिचे मूल्य कला आश्रयदाते आणि जाणकारांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. वालुका शिल्पाचा अभ्यासक्रम अधिकाधिक कलोपासक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यावर येत्या काही वर्षांत ही कलादेखील इतर कलांसारखी दिवाणखान्यातील वस्तूरूपात येऊ शकेल, असा अंदाज आहे.

आत्मविश्वासाची इंटर्नशाला

सांसारिक आणि नैमित्तिक जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिलांना नोकरी किंवा आवडत्या क्षेत्रातील काम थांबवावे लागते. कामात खंड पडल्यामुळे अनेकींच्या करिअरची वाट कायमची बंद होते. पदवी घेतलेली असते, अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो, पण करिअर पुन्हा सुरू करण्यासाठी कामाचा आवश्यक अनुभव गाठीशी नसतो. तर कधी प्रशिक्षण कालावधी पूर्ण झालेला नसतो. भारतात ६५ ते ७० टक्के महिलांनी कामात खंड घेतल्यानंतर त्यांना पुन्हा काम सुरू करण्याची संधी मिळत नाही, असे अनेक अहवालांमधून समोर आले आहे.

एका अहवालानुसार २००४ ते २०११ या कालावधीपर्यंत दोन कोटी महिलांनी विविध कारणांनी आपली नोकरी, करिअरला तिलांजली दिली आहे. आता महिलांना पुन्हा त्यांचे करिअर सुरू करण्याची संधी ऑनलाइन मोहिमेने दिली आहे. ‘इंटर्नशाला’ येत्या मार्च महिन्यापासून चार हजार महिलांना रोजगारक्षम बनविण्यासाठी सक्रिय झाले आहे. आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. याद्वारे इंटर्नशिप मिळवून येत्या काळात अनेक संस्था, आस्थापनांच्या कार्यामध्ये उमेदवारांची मदत होणार आहे. त्याचबरोबर महिलांना रोजगारक्षमतेचा आत्मविश्वास मिळणार आहे.     संपर्क – https://internshala.com/

रसिका मुळ्ये

Rasika Mulye@expressindia.com