23 February 2020

News Flash

विद्यापीठ विश्व : विद्यार्थीस्नेही

यूसीएलए विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजलिस

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख :

लॉस एंजलिसमध्ये स्थित असलेले ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-लॉस एंजलिस (यूसीएलए)’ हे अमेरिकेतील एक प्रमुख शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या असलेल्या एकूण दहा कॅम्पसपैकी हा चौथा कॅम्पस आहे. यूसीएलए या सर्वत्र परिचित असलेल्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाचा क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत बत्तीसावा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना १९१९ साली झाली. सुरुवातीला ‘सदर्न ब्रांच ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’ असे नाव असलेल्या या विद्यापीठाला १९२७ नंतर आताच्या नावाने ओळखले जाऊ लागले. Let there be light  हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

यूसीएलए विद्यापीठाचा कॅम्पस चारशेपेक्षाही अधिक क्षेत्रफळ असलेल्या परिसरामध्ये स्थित आहे. यूसीएलएमध्ये चार हजारांपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पंचेचाळीस हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. शासकीय विद्यापीठ असूनही यूसीएलएमधील दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे म्हणूनच या विद्यापीठास ‘पब्लिक आयव्ही’ असेही संबोधले जाते.

अभ्यासक्रम

यूसीएलए विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत. या दोन्ही स्तरांवर विद्यापीठातील एकूण १०९ शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. हे सर्व विभाग एकूण ३८०० पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि १२५ पेक्षाही अधिक मेजर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. यूसीएलएमधील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. याशिवाय विद्यापीठ डॉक्टरल अभ्यासक्रम व प्रोफेशनल ग्रॅज्युएट डिग्रीज यांसारखे पर्यायही  उपलब्ध करून देत आहे. यूसीएलएमधील सर्व शैक्षणिक व संशोधन विभागांमध्ये समाविष्ट होणाऱ्या विषयांमध्ये प्रामुख्याने एअरोस्पेस, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉमी, बायोइंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ह्य़ुमॅनिटीज, सायन्सेस, अँथ्रॅपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्टरी, लिंग्विस्टिक्स, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, म्युझिक, डान्स, इंग्लिश, सायकॉलॉजी, एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, एज्युकेशन, पब्लिक अफेअर्स, लाँ, पब्लिक पॉलीसी, सोशल वेल्फेअर, जिओग्राफी यांसारख्या शेकडो आंतरविद्याशाखीय आणि बहुआयामी विषयांचा समावेश आहे. यूसीएलएमधील बरेचसे विषय हे देशातच नव्हे तर जगातील अव्वलस्थानी आहेत.

सुविधा

यूसीएलए विद्यापीठाच्या दाव्यानुसार विद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण ९७ टक्के विद्यार्थी हे कॅम्पसमधील वसतिगृहांमध्ये राहतात. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५२ %  विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची आर्थिक मदत तर ३४ % विद्यार्थ्यांना ‘पेल ग्रँट’ हा मदतनिधी दिला जातो. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये खाद्यपदार्थाच्या अद्ययावत सोयी उपलब्ध असून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले एक हजारपेक्षाही अधिक क्लब्स आहेत. विद्यापीठाचा कॅम्पस सुरक्षित असून विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यूसीएलएने ‘स्टुडंट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स’, रोनाल्ड रेगन मेडिकल सेंटर, कौन्सेिलग व डिसएबिलीटी सर्व्हिस यांसारख्या अनोख्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

वैशिष्टय़

यूसीएलएच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये २४ नोबेलविजेते, तीन फिल्ड पदकविजेते, पाच टय़ुिरग पुरस्कार विजेते, १३ मॅक आर्थर पुरस्कार विजेते आणि २६१ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. विद्यापीठातील सध्याचे काही प्राध्यापक हे त्यांच्या संशोधन क्षेत्रातील नोबेलविजेते आहेत. विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आतापर्यंत १४० पेक्षाही अधिक कंपन्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

संकेतस्थळ

http://www.ucla.edu/

First Published on August 6, 2019 3:06 am

Web Title: information about university of california los angeles zws 70
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा सराव प्रश्न
2 एमपीएससी मंत्र : राज्य कर निरीक्षक पदनिहाय पेपरची तयारी
3 शब्दबोध : दिवटा
Just Now!
X