इन्स्टिटय़ूट ऑफ मिनरल्स अ‍ॅण्ड मटेरियल्स टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर

|| प्रथमेश आडविलकर

ओदिशा राज्याची राजधानी असलेल्या भुवनेश्वर येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मिनरल्स अ‍ॅण्ड मटेरियल टेक्नॉलॉजी (आयएमएमटी) ही मटेरियल इंजिनीअरिंग आणि खनिजशास्त्राच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. ही संशोधन संस्था पूर्वी प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळा, भुवनेश्वर या नावाने ओळखली जात असे. या संशोधन संस्थेची स्थापना १९६४ साली झाली आहे. आणि अगदी तेव्हापासून देशाच्या सेवेमध्ये असणाऱ्या या संस्थेने पदार्थ अभियांत्रिकी आणि खनिजशास्त्रातील तंत्रज्ञानाची निर्मिती आणि त्या तंत्रज्ञानाचा तळागाळाच्या घटकांपर्यंत प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) इतर संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे ही संस्थादेखील सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

संस्थेविषयी: सुरुवातीला सीएसआयआरच्या नवी दिल्लीतील कार्यालयाच्या देखरेखीखाली असणारी देशाच्या पूर्वेकडील भागामध्ये कार्यरत असणारी ही संशोधन संस्था भारताच्या प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळांपकी एक होती. तेव्हा सर्वत्र ती प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळा भुवनेश्वर या नावानेच परिचित होती. नंतर मात्र २००७ मध्ये अजून काही नवीन विषयांतील संशोधन करण्यावर भर देऊन खनिजशास्त्र व पदार्थ अभियांत्रिकी संशोधनातील एक नेतृत्व निर्माण व्हावे या दीर्घकालीन उद्देशाने संस्थेचे नाव बदलून ते इन्स्टिटय़ूट ऑफ मिनरल्स अ‍ॅण्ड मटेरियल्स टेक्नॉलॉजी असे करण्यात आले. संस्थेने स्थापनेपासूनच मूलभूत आणि उपयोजित संशोधनावर भर दिलेला आहे. नसíगक स्रोतांचे व्यावसायिक शोषण रोखण्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) म्हणजेच खासगी व सरकारी भागीदारीच्या माध्यमातून काम करणे, तसेच शून्य कचरा प्रक्रियेसाठी अत्याधुनिक सल्ला सेवा राबवणे इत्यादी उपक्रमांमधून हे लक्षात येते की, आयएमएमटीमध्ये सुमारे गेल्या दशकापासून संशोधन आणि विकास (आर अ‍ॅण्ड डी) यांवर जास्त भर देण्यात आलेला आहे. यामुळे खनिज क्षेत्रातील भारतीय उद्योगांना जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निश्चितपणे मोलाची मदत झालेली आहे.

 

संशोधनातील योगदान : आयएमएमटी ही खनिजशास्त्राच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. मात्र सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेला विज्ञान क्षेत्रातील इतर शाखा जसे की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) करत आहे. या संशोधन संस्थेकडे खनिज आणि धातू उद्योगाच्या संशोधन आणि विकासाशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्या शाश्वत विकासासाठी विविध विषयांमध्ये मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानात्मक कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये तज्ज्ञ संशोधकांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे. संस्थेमध्ये होणाऱ्या या आंतरविद्याशाखीय संशोधनाला वाहून घेणारे एकूण १४० प्रमुख संशोधक तर इतर अनेक सहकारी तंत्रज्ञ संस्थेमध्ये संशोधन करत आहेत. खाणीशी संबंधित संशोधनातील खनिज प्रक्रिया, जैव-खनिज प्रक्रिया, मेटल्स एक्स्ट्रॅक्शन, प्रक्रिया अभियांत्रिकी, औद्योगिक कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, समुद्री आणि वन उत्पादने विकास, औषधी व सुगंधी वनस्पतींचे उपयोग, कोलॉयड्स अ‍ॅण्ड मटेरियल्स केमिस्ट्री  आणि पर्यावरणीय स्थिरता हे आयएमएमटीच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. याव्यतिरिक्त संस्था, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे तयार झालेल्या नवीन धोरणांच्या परिणामांमुळे देशात खनिज उत्पादन आणि खनिज उपयोगाच्या स्थितीमध्ये जे महत्त्वपूर्ण बदल झाले. या बदलांना अनुसरून आयएमएमटीचे मिनरल प्रोसेसिंग डिपार्टमेन्ट सध्या हलक्या दर्जाच्या खनिज वापराशी निगडित असलेल्या विविध समस्यांचे निराकरण कसे करता येईल या बाबतीमध्येही संशोधन करत आहे. तसेच, कनिष्ठ दर्जा श्रेणीतील अयस्क व खनिजांचे मूल्यमापन व योग्य प्रवाह पत्रके विकसित करण्यासाठी वापर करणे, स्केलअपसाठी डिझाइन डेटाची निर्मिती करणे, गुंतागुंतीच्या खनिजांच्या प्रक्रियेसाठी अभिनव आणि नवीन तंत्रांचा विकास करणे, कचरा आणि तत्सम उत्पादने यांपासून मौल्यवान वस्तू निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेचा विकास, विविध वनस्पती व रोपांच्या कार्यक्षमतेत योग्य बदल करून सुधारणा करणे, खनिजप्रक्रियेमध्ये आवश्यक असलेल्या युनिट ऑपरेशनमधील ऊर्जेमध्ये कपात करण्यात यश मिळवणे, खनिज, धातू व रासायनिक उद्योगांशी संबंधित पर्यावरण प्रदूषणाचा अभ्यास करणे इत्यादी संशोधनातील यशाच्या माध्यमांतून संस्था देशाला व समाजाला भरीव योगदान देत आहे.

 

विद्यार्थ्यांसाठी संधी : आयएमएमटी ही संशोधन संस्था मटेरियल इंजिनीयिरग आणि खनिजशास्त्र या विषयांतील देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रदेखील आहे. Academy of Scientific & Innovative Research (AcSIR)  च्या अंतर्गत येथे अनेक विद्यार्थी येथे पीएच.डी.चे संशोधन करतात. तसेच, आयएमएमटी देशातील कित्येक विद्यापीठांशी पीएच.डी. व इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संलग्न आहे. आयएमएमटी दरवर्षी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांना त्यांचे डिझरटेशन वर्क (प्रकल्प संशोधन) पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित प्रवेश देते. अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतात. विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी आयएमएमटीमधील विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेत असतात.

संपर्क : सीएसआयआर इन्स्टिटय़ूट ऑफ मिनरल्स अ‍ॅण्ड मटेरियल्स टेक्नॉलॉजी, [पूर्वीची संस्था -रिजनल रिसर्च लॅबोरेटरी], आचार्य विहार, दूरदर्शन कॉलनी, गजपती नगर, भुवनेश्वर, ओदिशा – ७५१०१३ दूरध्वनी – +९१- ६७४-२५६७१२६.

ई-मेल  – dir@immt.res.in

संकेतस्थळ  – http://www.immt.res.in

itsprathamesh@gmail.com