News Flash

परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विम्याची कवचकुंडले

जागतिकीकरणाने विद्यार्थ्यांना जगभरातील विद्यापीठांमध्ये शिकण्याच्या संधी खुल्या झाल्या. अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील परदेशी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या नेहमीच अधिक असते.

| September 15, 2014 01:05 am

जागतिकीकरणाने विद्यार्थ्यांना जगभरातील विद्यापीठांमध्ये शिकण्याच्या संधी खुल्या झाल्या. अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील परदेशी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या नेहमीच अधिक असते. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या वर्षी २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अग्रगण्य परदेशी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी अर्ज केला होता. आज महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये विशेषत: विज्ञान, तंत्रज्ञान आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अशा विद्याशाखांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतात.
परदेशी शिकताना अनेक जोखमींचा सामनाही करावा लागतो. त्यात विद्यार्थ्यांची सुरक्षा हा विद्यार्थ्यांकरता आणि त्यांच्या पालकांकरता कळीचा मुद्दा बनला आहे. आपल्या आप्तस्वकीयांपासून दूर, नवख्या देशामध्ये, परक्या व्यक्तींमध्ये राहणे ही चिंतेची बाब असते. त्यामुळे आणीबाणीच्या काळात तुमच्या मदतीला धावून येणारे माणूस गरजेचे असते. वैद्यकीय खर्च अथवा रुग्णालयात भरती होण्याचा ओढवलेला प्रसंग यामध्ये मौल्यवान परकीय चलन गमावणे परवडण्यासारखे नसते. म्हणूनच विद्यार्थ्यांना परदेशात चिंतामुक्त वातावरणात शिकायचे असेल तर त्यांचा विद्यार्थी पर्यटन विमा उतरवलेला असणे अत्यावश्यक ठरते.
शिक्षणावर लक्ष केंद्रित करता यावे आणि अनपेक्षित समस्यांचा परिणाम आपल्या शिक्षणावर होऊ न देता परदेशी राहायचे असल्यास विद्यार्थ्यांचा पर्यटन विमा उतरवणे आवश्यक ठरते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता हा विमा अत्यावश्यक असतो. परदेशातील वास्तव्याच्या दरम्यान आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याकरता होणारा खर्च हा परवडण्याजोगा नसतो.
अमेरिका आणि इंग्लंडमध्ये विद्यार्थ्यांकडे विमा पॉलिसी असणे अनिवार्य आहे. परदेशांतील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठे विद्यार्थ्यांना अडीच लाख डॉलपर्यंतचा विमा उतरवून घेण्यासाठी आग्रही असतात.
भारतातील बहुतेक सर्व विमा कंपन्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटन विमा देऊ करतात. या विम्याद्वारे उच्च शिक्षणाकरता परदेशी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अवैद्यकीय विमा सुरक्षा पुरवण्यात येते. या विम्यासाठी परदेशातील वैद्यकीय खर्चापेक्षा कितीतरी कमी खर्च येतो. ही सुरक्षा मुख्यत्वे अपघात आणि इतर आणीबाणीच्या गंभीर परिस्थितीकरता पुरवली जाते. विद्यार्थ्यांच्या परदेशातील वास्तव्याच्या काळात ही पॉलिसी ऑटो रिन्यूअल आणि एक्स्टेन्शन या सुविधेसह वैद्यकीय आणि अवैद्यकीय विमा सुरक्षा पुरवते. विमा उतरविण्याच्या आधीपासून असलेल्या आजारांकरता या पॉलिसीमध्ये सुरक्षा दिली जात नाही.
विद्यार्थी पर्यटन विम्याअंतर्गत पुरवले जाणारे सुरक्षाकवच खालीलप्रमाणे आहे-
जवळच्या वस्तूंचा विमा : परदेशी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल फोन किंवा लॅपटॉप असतो. या मूल्यवान वस्तूंचा विमा उतरवला जाणे अत्यावश्यक ठरते. काही पॉलिसींमार्फत मालमत्ता आणि अपघातविषयक सुरक्षा पुरवली जाते. त्याअंतर्गत परदेशी वास्तव्यादरम्यान तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यास किंवा त्यांची हानी झाल्यास तुम्हाला भरपाई दिली जाते.
वैयक्तिक दायित्वविषयक वैशिष्टय़ : तुम्ही प्रवास करत असाल तर काही विद्यार्थी पर्यटन विमा पॉलिसी तुम्हाला वैयक्तिक दायित्वाविषयक सुरक्षा मोफत देऊ करतात.
वैद्यकीय सुरक्षा : तुम्ही काही आठवडय़ांकरता किंवा काही महिन्यांकरता प्रवास करत असाल तर तुम्हाला वैद्यकीय गरज भासू शकते. परदेशात आरोग्यावर खर्च करणे अजिबात परवडण्याजोगे नसल्याने तुम्ही आरोग्य उत्तम राखणे आणि तुम्हांला पुरेशी वैद्यकीय सुरक्षा देणारा विद्यार्थी पर्यटन विमा उतरवून घेणे या दोन उपायांचा अवलंब करू शकता.
शिक्षणातील अडथळाविषयक सुरक्षा : परदेशी विद्यापीठांमध्ये पदवीचा अभ्यास ही गोष्ट मुळीच स्वस्त नाही. तुमच्या अभ्यासामध्ये काही कारणाने अडथळा येऊन तुमचे शिक्षण लांबले तर त्याकरता साहाय्य करणारा विद्यार्थी पर्यटन विमा उतरवून घेणेही हितावह ठरते.
विद्यार्थी पर्यटन विमा पॉलिसी खरेदी करताना आपण ज्या विद्यापीठामध्ये अर्ज करत आहोत तिथे ती पॉलिसी स्वीकारार्ह आहे याची खात्री करून मगच विमा काढावा. त्या विम्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव आहे आणि कुठल्या गोष्टी अंतर्भूत नाहीत याची संपूर्ण माहिती उच्च शिक्षणाकरता परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असणे अत्यावश्यक आहे.
मुकेश कुमार
कार्यकारी संचालक,
एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 1:05 am

Web Title: insurance cover for students in abroad
Next Stories
1 रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सच्या ३१ जागा
2 भूगोलाची तयारी
3 पारंपरिक नीतिशास्त्राचे आजच्या काळातील महत्त्व
Just Now!
X