News Flash

आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन

एमबीएच्या दुसऱ्या वर्षांत उपलब्ध असणाऱ्या स्पेशलायझेशनच्या विविध विषयांमधील आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट). काही विद्यापीठांमध्ये हा विषय विशेषीकरणासाठी

एमबीएच्या दुसऱ्या वर्षांत उपलब्ध असणाऱ्या स्पेशलायझेशनच्या विविध विषयांमधील आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट). काही विद्यापीठांमध्ये हा विषय विशेषीकरणासाठी (स्पेशलायझेशन) उपलब्ध आहे. आजच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या काळात हा विषय निश्चितच उपयोगी आहे. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संपूर्ण जग ही एक बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असे अनेक ब्रॅण्डस् जसे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत तसेच आपल्या देशातील ब्रॅन्डस्नासुद्धा जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी माहिती असणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना व्यवसाय व्यवस्थापनेचे वेगवेगळे पैलू ठाऊक असणे आवश्यक असते. या विषयाचा अभ्यास करताना क्रमिक पुस्तकांतून जशा अनेक गोष्टी शिकता येतात तशाच पुस्तकापल्याडच्या अनेक गोष्टींमधूनसुद्धा बरेच काही शिकता येते.
या विषयाच्या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करण्यासाठी आवश्यक अशा अनेक बाबींचा समावेश केलेला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ विकास व्यवस्थापन (ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट) या विषयांबरोबरच आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी (इंटरनॅशनल सप्लाय चेन मॅनेजमेंट) आंतरराष्ट्रीय कायदे, बौद्धिक संपदा अधिकार (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स), परकीय चलनाचे व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना हे समजून घ्यावे लागते की, व्यवसायातील जी मूलभूत कामे आहेत ती कायम राहतात. उदा. आर्थिक व्यवस्थापन, विपणन (मार्केटिंग) व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, पुरवठा साखळी अशी व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती कायम राहतात. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या कामांची व्याप्ती वाढते.
आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापनाचा अभ्यास करताना हे लक्षात घ्यायला हवे की, भांडवल उभारणी करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपलब्ध मार्गाची चाचपणी करावी लागते तसेच परकीय चलनाचे व्यवहार हे कशा पद्धतीने करावेत आणि परकीय चलनाची किंमत कशी ठरते या गोष्टीही लक्षात घ्याव्यात. या विषयाचा अभ्यास करताना रुपयाची किंमत इतर देशांच्या तुलनेत कशी कमी-जास्त होते याचे दररोज निरीक्षण करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या किमतीमध्ये बदल का होतात या गोष्टीची चर्चाही प्राध्यापकवर्गाशी तसेच मित्रमंडळींशी केली पाहिजे. रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय आणि त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर नेमका काय होतो याची चिकित्सा करणे आवश्यक आहे. रुपयाची किंमत इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत वाढल्याने आयात व निर्यात व्यापारावरील संभाव्य परिणाम अभ्यासावेत. या सर्व गोष्टींची माहिती विविध वृत्तपत्रांतून, नियतकालिकांमधून (विशेषत: आर्थिक विषयांवरील) तसेच या क्षेत्रात मोठा अनुभव गाठीशी असणाऱ्या तज्ज्ञव्यक्तींकडून घेता येईल. त्यासाठी अशा व्यक्ती आणि संस्थांसारखे माहितीचे स्रोत शोधून काढायला हवेत.
एखाद्या कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर शेअर विक्री करून भांडवल उभारणी करायची असल्यास किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातून कर्ज उभारणी करायची असल्यास त्या देशांतील कायद्यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. एखाद्या भारतीय कंपनीला जर परदेशी शेअरबाजारात नोंदणी करायची असेल तर तिथले नियम माहिती हवे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील विकसित, विकसनशील आणि मागास देशांच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायला हवा. ही माहिती मिळविण्यासाठी इंटरनेटची निश्चितच मदत होते.
देशांतर्गत मार्केटिंग आणि जागतिक स्तरावरील मार्केटिंग यांमधील फरक ‘आंतरराष्ट्रीय विपणन’ या घटकाचा अभ्यास करताना जाणून घ्यायला हवा. मार्केटिंगच्या कामांत सारखेपणा असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गोष्टींत तफावत असते. उदा. ग्राहकांचे मानसशास्त्र, ग्राहकांच्या आवडीनिवडी व पसंतीक्रम, त्यांची खरेदी करण्याची पद्धती, वस्तू वितरणाची पद्धत, जाहिरातींची माध्यमे. हे जाणून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ज्या कंपनीने निर्यात क्षेत्रात स्थान मिळवले आहे त्या कंपनीला भेट देऊन या सगळ्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणे. शक्य झाल्यास त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आणि त्यांचे अनुभव व त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे. याकरता मोठय़ा शहरांमध्ये जावे लागते असे नाही तर आपल्या भोवतालीही अशा अनेक कंपन्या असू शकतात. आंतरराष्ट्रीय मार्केटिंग या विषयावर अनेक जर्नल्स उपलब्ध आहेत. इंटरनेटद्वारे ही जर्नल्स वाचता येतील. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरांवर विकसित झालेली नवीन उत्पादने आणि वस्तूंचा जीवनक्रम या गोष्टींचा अभ्यास करावा. याचाच अर्थ असा की, आंतरराष्ट्रीय विपणनाचा अभ्यास करताना पुस्तकांसोबतच वेगळे मार्ग चोखाळणे आवश्यक आहे.
जी गोष्ट मार्केटिंगची, तीच इतर विषयांची आहे. आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ विकास (इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट) या विषयाचा अभ्यास करताना कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून त्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनापर्यंत सर्व कामांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती घेता येते तसेच ज्याला आपण एखाद्या कंपनीची कार्यसंस्कृती म्हणतो ती वेगवेगळ्या देशातील कंपन्यांमध्ये कशी असते हे अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. एखाद्या अमेरिकी, ब्रिटिश, जर्मन अशा विकसित देशातील कंपनीमधील कार्यसंस्कृती आणि तुलनेने विकसनशील देशातील कंपन्यांच्या कार्यपद्धतींमध्ये फरक जाणवतो. मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा संबंध त्या देशातील कर्मचाऱ्यांशी येत असल्यामुळे किमान एक किंवा दोन परकीय भाषा शिकणे मदतीचे ठरते. स्थानिक भाषेत आपण संवाद साधू शकलो तर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होतो.
या तीन वेगवेगळ्या कामांच्या जोडीला आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी व्यवस्थापन (इंटरनॅशनल सप्लाय चेन मॅनेजमेन्ट) हे अतिशय महत्त्वाचे काम या विशेषीकरणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये कंपनी भेटीद्वारे पुरवठा व्यवस्था जाणून घेणे गरजेचे ठरते.
आंतरराष्ट्रीय व्यवसायातील महत्त्वाचा घटक म्हणजे आयात-निर्यात करताना करावी लागणारी वेगवेगळ्या नियमांची पूर्तता आणि तयार करावी लागणारी कागदपत्रे. दस्तावेज करणे (डॉक्युमेंटेशन) हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. आयात-निर्यातीची प्रक्रिया ही गुंतागुंतीची असली तरी ती प्रयत्नपूर्वक समजून घेता येते. असे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या कार्यरत असतात. अशा कंपन्यांना भेटी देऊन कार्यप्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेता येईल. या प्रक्रियेमध्ये अनेक कायद्यांचा समावेश होतो. त्यामुळे अशा कायद्यांचाही अभ्यास आवश्यक ठरतो. प्रत्येक देशाचे आयात-निर्यातीचे धोरण असते. किमान आपल्या देशाचे धोरणतरी आपल्याला ठाऊक असायला हवे. याशिवाय जागतिक व्यापार संघटना, गॅट आणि इतर आंतरराष्ट्रीय कायद्यांची माहिती करून घ्यावी.
सारांशाने असे म्हणता येईल की, आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन हे निश्चितच महत्त्वाचे स्पेशलायझेशन आहे. मात्र, याचा अभ्यास करताना, इतर विषयांप्रमाणे फक्त पुस्तकांवरच अवलंबून चालणार नाही तर इतर साधनांचाही आधार घेणे व स्वत:च्या ज्ञानामध्ये भर टाकणे आवश्यक ठरेल.
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2015 1:04 am

Web Title: international business management 2
टॅग : Mbachi Tayari
Next Stories
1 मानसशास्त्राचा अभ्यास व संधी – मनाचिये गुंती..
2 इटलीत ‘रिस्क मॅनेजमेंट’मधील शिष्यवृत्ती
3 आयुर्विमा महामंडळाची सुवर्णजयंती शैक्षणिक शिष्यवृत्ती
Just Now!
X