मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मेक्सिकोतील विद्यापीठांमध्ये विविध विषयांतील पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी स्तरावरील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
या अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व शुल्क, मासिक वेतन आणि इतर संबंधित सुविधा असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील अर्जदारांकडून ३१ऑगस्ट २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी..
मेक्सिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने स्थापन झालेली AMEXCID (The Mexican Agency for International Development Cooperation) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक,आíथक व वैज्ञानिक क्षेत्रातील परस्पर सहकार्य व त्यातून विकास या हेतूंनी कार्यरत असलेली संस्था म्हणून ओळखली जाते. सप्टेंबर २०११ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. शैक्षणिक स्तरावर मेक्सिको व इतर देशांमध्ये आदानप्रदान व्हावे आणि त्याद्वारे सहकार्य वाढीस लागावे यासाठी संस्थेच्या शिक्षण विभागाकडून दर वर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मेक्सिकोतील विविध विद्यापीठांमध्ये विविध विषयांचे  पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डीच्या स्तरावरील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मेक्सिको आणि इतर देशांमध्ये विविध क्षेत्रांतील दीर्घकालीन संबंध रुजावेत हा या शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा प्रमुख हेतू आहे. जगातील एकूण १८० पेक्षाही जास्त देशांमधील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती कार्यक्रमात मेक्सिकोतील ेसुमारे ७० नामांकित शिक्षणसंस्था सहभागी झाल्या आहेत.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डीच्या स्तरावरील संशोधन अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते. शिष्यवृत्तीचा कालावधी त्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षांसाठी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी तर पीएच.डीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती व इतर सुविधा मिळतात. शिष्यवृत्तीच्या कालावधीत पदव्युत्तर शिष्यवृत्तीधारकाला दरमहा ८४१२ पेसो (मेक्सिकन चलन) तर पीएच.डी शिष्यवृत्तीधारकाला साधारणत: १०,५१५ पेसो एवढे विद्यावेतन मिळते. शिष्यवृत्तीच्या इतर सोयीसुविधांमध्ये शिष्यवृत्तीधारकाच्या अभ्यासक्रमाचे नोंदणी शुल्क व संपूर्ण शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती बहाल केल्यानंतर तिसऱ्या महिन्यापासून मेक्सिकन सरकारचा आरोग्य विमा, शिष्यवृत्ती कालावधीत एकदा विमानप्रवासाचा अधिभार इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
आवश्यक अर्हता
या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांला अर्ज करता येईल. विज्ञान-तंत्रज्ञान तसेच सामाजिक शास्त्रांचे विविध विषयांचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी अशा वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी असून त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हताही वेगवेगळ्या आहेत. अर्जदाराची आधीच्या शिक्षणक्रमातील शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्याला किमान ८/१० जीपीए असावा.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने स्वत:चा अर्ज पूर्ण करून त्यासोबत त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीची सविस्तर माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, तज्ज्ञांची शिफारसपत्रे, मागील शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, अनुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. पूर्ण झालेला अर्ज अर्जदाराने त्याच्या देशातील मेक्सिकन दूतावासात जमा करावा. ई-मेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे अर्ज जमा करण्याचा प्रयत्न करू नये.
निवड प्रक्रिया
अर्जदाराची त्याने निवडलेल्या विषयातील गुणवत्ता, आवड व त्याची शैक्षणिक पाश्र्वभूमी लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड केली जाईल. त्याने निवडलेल्या क्षेत्राचा त्याच्या देशावर भविष्यात होणारा परिणाम हा निकष शिष्यवृत्ती निवडीकरता महत्त्वाचा असेल. अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत नोव्हेंबर २०१५ पर्यंत कळवले जाईल.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१५ आहे.
महत्त्वाचा संदर्भ
http://amexcid.gob.mx/
itsprathamesh@gmail.com