News Flash

आयुष्याची घडी बसवणारी इस्त्री

दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा अडचणींवर कल्पकतेने कशी मात करता येते, हे दाखवून देणाऱ्या व्यक्तींचा आणि त्यांच्या संशोधनाचा परिचय करून देणारं मासिक सदर-

| April 14, 2014 01:01 am

दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा अडचणींवर कल्पकतेने कशी मात करता येते, हे दाखवून देणाऱ्या व्यक्तींचा आणि त्यांच्या संशोधनाचा परिचय करून देणारं मासिक सदर-
एल. पी. जी. गॅसचा उपयोग केवळ स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठीच केला जाऊ शकतो, असं नाही तर पाणी तापवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गीझरमध्येसुद्धा एल. पी. जी. गॅसचा वापर करता येतो, हे आपल्याला माहिती आहे. एल. पी. जी. गॅसवर चालणारे असे गीझर अनेक ठिकाणी वापरलेही जातात. पण एल. पी. जी. गॅसवर इस्त्री चालवली जाऊ शकते का? खरं म्हणजे, गीझरमध्ये इंधन म्हणून गॅसचा वापर करताना अशी नावीन्यपूर्ण कल्पना आपल्या मनातही येत नाही. आंध्र प्रदेशातल्या वारंगल जिल्ह्यातल्या अलायगुरम नावाच्या लहानशा गावात राहणाऱ्या के. िलगब्रह्मम यांच्या मनात मात्र ही नावीन्यपूर्ण कल्पना आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली.
पितळेची भांडी तयार करणं हा िलगब्रह्मम यांचा पिढीजात व्यवसाय. पण स्टेनलेस स्टील आणि प्लॅस्टिक यांचा वापर जसजसा वाढला, तसतशी पितळेची भांडी हद्दपार होऊ लागली. साहजिकच िलगब्रह्मम यांच्या कुटुंबापुढे पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. शेती करावी तर स्वत:ची जमीन नव्हती. दुसरा एखादा व्यवसाय करावा तर त्यासाठी आवश्यक असणारं कौशल्य नव्हतं.
कुटुंबाला भेडसावणाऱ्या आíथक संकटाचा फटका िलगब्रह्मम यांच्या मुलीला बसला. वह्या-पुस्तकं विकत घ्यायलाही पुरेसे पसे नसल्याने नाइलाजाने िलगब्रह्मम यांना तिचं शिक्षण बंद करावं लागलं. वयाची तिशी पार केलेल्या िलगब्रह्मम यांचं शिक्षणही तोकडं होतं. ते केवळ पाचव्या इयत्तेपर्यंत शिकले होते. त्यामुळे एखादी बरी नोकरी मिळण्याचीही संधी नव्हती. मात्र, िलगब्रह्मम यांच्याकडे एक असलेला महत्त्वाचा गुण म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेच्या बळावर आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची मनीषा िलगब्रह्मम बाळगून होते; आणि तशी संधी त्यांना मिळाली.
टेलिरगचा व्यवसाय करणाऱ्या आपल्या मित्राच्या दुकानात िलगब्रह्मम बसले होते. त्यांचा मित्र कपडय़ांना इस्त्री करत होता. या मित्राची इस्त्री करण्याची पद्धत जगावेगळी होती. इस्त्री करण्यासाठी त्याने स्टोव्ह पेटवला होता. या स्टोव्हवर तवा तापत ठेवला होता. तापलेल्या तव्यावर काही काळ इस्त्री ठेवायची आणि इस्त्री पुरेशी गरम झाली की, ती कपडय़ांवरून फिरवायची. कपडय़ांवर फिरवल्यामुळे थंड झालेली इस्त्री पुन्हा स्टोव्हवर ठेवलेल्या तव्यावर गरम करायची. असा त्यांचा उद्योग चालला होता. िलगब्रह्मम यांच्या मित्राकडे अशा प्रकारे इस्त्री करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. कारण गावात आठ – दहा तास लोड शेिडग असल्याने विजेची उपलब्धता नव्हती आणि गिऱ्हाइकांना वेळेत कपडे देणं भाग होतं.
आपल्या मित्राची ही अडचण आणि या अडचणीवर मात करण्यासाठी त्याने शोधलेली इस्त्री करण्याची जगावेगळी पद्धत पाहून िलगब्रह्मम यांच्या मनात एक नामी कल्पना आली; एल. पी. जी. गॅसवर चालणारी इस्त्री तयार केली तर? अशी इस्त्री जर तयार केली तर इस्त्रीसाठी विजेवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि कोळसे पेटवून इस्त्री करण्यात जो त्रास होतो, तोही होणार नाही.
सगळं आयुष्य धातुकाम करण्यात घालवलेल्या िलगब्रह्मम यांना अशी इस्त्री तयार करणं फारसं कठीण गेलं नाही. आपल्या मित्रांकडून काही रक्कम कर्जाऊ घेऊन त्यांनी गॅसवर चालणारी इस्त्री तयार करण्यात यश मिळवलं.
गॅसवर चालणारी ही इस्त्री आपल्या नेहमीच्या इस्त्रीसारखीच दिसते. मात्र ही इस्त्री एका प्लास्टिकच्या नळीने गॅस सिलेंडरला जोडली आहे. सिलेंडरमधून बाहेर पडणाऱ्या गॅसचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी रेग्युलेटरची सोय केली आहे. या इस्त्रीमध्ये तांब्याच्या नळ्या बसवल्या आहेत. या नळ्यांमधून एल. पी. जी. गॅस प्रवाहित केला जातो. पाणी तापवणाऱ्या गीझरमध्ये गॅस प्रवाहित केला की ज्याप्रमाणे स्वयंचलित यंत्रणेद्वारे तो पेट घेतो, त्याचप्रमाणे इस्त्रीमध्ये गॅस प्रवाहित केला की स्वयंचलित यंत्रणेद्वारे तो पेट घेतो आणि इस्त्री तापते.
िलगब्रह्मम यांनी तयार केलेल्या इस्त्रीची कार्यक्षमतासुद्धा खूप चांगली आहे. एक तासभर इस्त्री करण्यासाठी  केवळ १० ग्रॅम गॅस पुरतो.
िलगब्रह्मम यांनी आजूबाजूच्या लोकांना अशा प्रकारच्या इस्त्र्या तयार करून विकल्या. त्यामुळे त्यांना चांगली कमाई झाली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नाव झालं. िलगब्रह्मम यांनी मग या इस्त्रीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. या प्रयत्नांतूनच गॅस सिलेंडरला जोडता येईल अशी एका प्रकारची इस्त्री आणि सिलेंडरला न जोडता इस्त्रीमध्येच गॅस भरून वापरता येईल अशी एक इस्त्री अशा दोन प्रकारच्या इस्त्र्या करण्यात त्यांना यश आलं.
‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने िलगब्रह्मम यांना एल. पी. जी. गॅसवर चालणाऱ्या इस्त्रीचं एकस्व घेण्यासाठी मदत केली. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या इस्त्र्यांचं उत्पादन करण्यासाठीही उत्तेजन दिलं. वापरण्यासाठी सुरक्षित, सुलभ आणि कमी खर्चीक असलेल्या अशा प्रकारच्या सुमारे ६० ते ७० इस्त्र्या िलगब्रह्मम यांनी तयार करून विकल्या आहेत. एका इस्त्रीची किंमत साडेसहा हजार रुपये आहे. जशी मागणी येईल त्याप्रमाणे ते या इस्त्र्यांचं उत्पादन करतात. गॅसवर चालणाऱ्या इस्त्रीमुळे त्यांचं नाव झालं आहे आणि धातुकाम करणाऱ्या एका वर्कशॉपमध्ये नोकरीही मिळाली आहे. थोडक्यात, िलगब्रह्मम यांनी तयार केलेल्या इस्त्रीमुळे त्यांच्या आयुष्याची घडीनीट बसली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.             
hemantlagvankar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:01 am

Web Title: invention of iron
टॅग : Invention
Next Stories
1 फॅशनच्या दुनियेतील प्रवेश
2 मार्केटिंगचा अभ्यास
3 द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली
Just Now!
X