26 September 2020

News Flash

एकांडय़ा शिलेदाराचा वस्तुपाठ

एक झाडं लावणारा माणूस वास्तवातसुद्धा आहे आणि तोही आपल्या भारतात. या माणसाचं नाव आहे जादव पायेंग!

| June 16, 2014 01:06 am

जून महिना दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे पाऊस आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. जूनच्या पहिल्या पंधरवडय़ात पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमांची जणू रेलचेल असते. स्पर्धा, प्रदर्शनं, चर्चासत्रं, रॅली, वृक्षारोपणाचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम संपन्न होतात. कार्यक्रम संपले की, हे सगळं विसरलं जातं. पर्यावरणविषयक या कार्यक्रमांचा फॉलोअप घेतला जात नाही की त्यांची परिणामकारकता तपासली जात नाही. काही व्यक्ती मात्र हे कार्य केवळ ‘कार्यक्रम’ म्हणून न करता व्रत म्हणून स्वीकारतात. सभोवतालच्या व्यक्तींची, व्यवस्थेची तमा न बाळगता निसर्गाशी एकरूप होऊन संवर्धनाचं कार्य करणाऱ्या एका माणसाची गोष्ट ‘झाडं लावणारा माणूस’ (जाँ जिओनो या लेखकाच्या मूळ फ्रेंच पुस्तकाचा अनुवाद) या पुस्तकात अत्यंत प्रभावीपणे रेखाटली आहे. असाच एक झाडं लावणारा माणूस वास्तवातसुद्धा आहे आणि तोही आपल्या भारतात. या माणसाचं नाव आहे जादव पायेंग!
आपल्या देशाच्या पूर्वेकडच्या राज्यांसाठी पूरसमस्या काही नवीन नाही. १९७९ साली ब्रह्मपुत्रा नदीला प्रचंड पूर आला. या पुरामुळे सगळं काही वाहून नेलं; इतकं की लहानशी बी रुजायला मातीदेखील उरली नाही. नजर जाईल तिथे फक्त रेती आणि खडक. शेकडो प्राणी, वनस्पती ब्रह्मपुत्रा नदीच्या विळख्यात सापडून वाहून गेले. उरले ते फक्त काही सरपटणारे प्राणी. हळूहळू पूर ओसरला, ऊन पडलं. पण सावलीचा कुठेच पत्ता नसल्यामुळे तिथे उरलेले जीव उन्हाने पोळून निघाले. सभोवतालची ही सगळी भीषण परिस्थिती पाहून आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या कोकिलामुख गावातल्या जादव पायेंग या १६ वर्षांच्या कोवळ्या मुलाने ठरवलं की, या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं.
१९८० मध्ये अरुना चापोरी भागात वन विभागामार्फत सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पर्यावरणाच्या इतर कार्यक्रमांप्रमाणे हा कार्यक्रमसुद्धा सुफल संपूर्ण झाला नाही. या कामात जे कामगार काम करत होते, त्यामध्ये जादव होता. त्याने हे काम न थांबवता एकहाती पुढे न्यायचं आणि त्या जागेवर जंगल निर्माण करायचं ठरवलं. दोनशे हेक्टर जमिनीवर एकहाती जंगल निर्माण करण्याचा हा विचार धाडसाचा तरी असू शकतो किंवा वेडगळपणाचा! जंगल तयार करण्यासाठी रोपटी मागायला जादव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे गेला, पण सगळ्यांनी त्याला मूर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबू जरी उगवला तरी खूप झालं, असा विचार करून कुणीतरी त्याला बांबूची रोपटी दिली. मग बांबूचं वन उभारण्याचा जणू ध्यासच जादवने घेतला.
जंगल तयार करायचं म्हणजे चक्क एक परिपूर्ण अशी परिसंस्था उभारायची. त्यासाठी कित्येक किलोमीटरच्या परिसरात भटकंती करून त्याने वालकोल, अर्जुन, इजर, गुलमोहोर, कोरोई, मोज, हिमोलू अशा विविध झाडांची रोपटी जमवली आणि तिथे लावली. लावलेली रोपटी जगावीत, म्हणून जादव एक-दोन नव्हे तर ३० र्वष न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदीवरून आणून पाणी घालत असे. त्याच्या या प्रयत्नांमध्ये सरकार, गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारली तरी तो थांबला नाही. या जंगलात केवळ विविध वनस्पती, वृक्ष असून पुरेसं नाही, याची जाण जादवला होती. मग त्याने तब्बल ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या गावातून असंख्य लाल मुंग्या पकडून या वनात आणल्या. या लाल मुंग्या पकडताना आणि त्यांना इतक्या लांबून आणताना जादवने त्यांचे अगणित चावे मोठय़ा आनंदाने सहन केले. या मुंग्यांचं पुनर्वसन करायला जादवने सुरुवात केली.
जादवच्या अथक प्रयत्नांना निसर्गानेसुद्धा साथ दिली आणि त्याच्या मनात असलेलं जंगल साकारू लागलं. जादवला त्याच्या घरातले आणि गावातले लोक ‘मुलई’ असं म्हणायचे. त्यामुळे त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं ‘मुलई कथोनी’, म्हणजेच मुलईचं जंगल! बांबूच्या बनापासून सुरू झालेल्या या जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळण्याइतकी जैवविविधता आहे. ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्राजवळ तब्बल साडेपाचशे हेक्टर जमिनीवर तयार केलेल्या या एकमेवाद्वितीय मनुष्यनिर्मित अभयारण्यात आज चार वाघ, तीन एकिशगी गेंडे, शंभरेक  हरणं, शेकडो माकडं, ससे आणि इतर प्राण्यांचं वास्तव्य आहे. कित्येक स्थलांतरित पक्षी इथे दरवर्षी येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप इथे वर्षांतले सहा महिने वास्तव्याला असतो.
जादव पायेंग यांनी आपल्या वयाची पन्नाशी पार केली आहे. आपल्या कार्याने आदर्श घालून देणारे, पुरस्कार, प्रसिद्धी यांपासून लांब असलेले जादव पायेंग अगदी भावुक होऊन म्हणतात, ‘‘मी सहा वर्षांचा असताना नष्ट होत असलेले कुरूवा पक्षी या भागात पाहिले होते, पण गेल्या ४५ वर्षांत ते इथे दिसलेच नाहीत. आज मात्र तेच पक्षी माझ्या या जंगलात वास्तव्याला येतात. यापेक्षा आणखी काय हवं!’’ सुंदरबन बघायला येणाऱ्या पर्यटकांसाठीही ‘मुलई कथोनी’ हे एक आकर्षण बनलं. सुप्रसिद्ध ब्रिटिश माहितीपटकार टॉम रॉबर्ट यांनी या जंगलात काही काळ राहून एक माहितीपट तयार केला. त्यामुळे जादव पायेंग आणि त्यांनी निर्माण केलेल्या जंगलाचं नाव जगभर माहिती झालं. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच जंगलातील आपल्या जुन्या झोपडीत राहणारे जादव पायेंग निसर्ग राखण्याचं काम नि:स्वार्थीपणे करत आहेत. बायको, दोन मुलं आणि एक मुलगी अशा आपल्या कुटुंबाचा चरितार्थ ते घरात पाळलेल्या गाई-म्हशीचं दूध विकून चालवतात.
पर्यावरण संवर्धनाच्या तीन दशकांपेक्षा जास्त वर्षांच्या पायेंग यांच्या संघर्षमय प्रवासाची सरकारने दाखल घेतली. त्याचप्रमाणे दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाने ‘फॉरेस्ट मॅन ऑफ असम’ ही उपाधी देऊन सन्मानित केलं.
जादव पायेंग यांनी कुठला शोध लावला नाही; पण प्रस्थापित व्यवस्थेला दूषणं न देता एकांडा माणूस काय करू शकतो, याचा त्यांनी दाखवून दिलेला वस्तुपाठ म्हणजे एक प्रकारे इनोव्हेशनच म्हटलं पाहिजे.    
hemantlagvankar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 1:06 am

Web Title: jadav molai payeng environmental activist and forestry worker
Next Stories
1 शैक्षणिक तंत्रविज्ञानात एम.ए.
2 मुंबई विद्यापीठाचा मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम
3 मरिन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी, कोचीन येथे ज्युनिअर टेक्निकल ऑफिसरच्या ५ जागा
Just Now!
X