मागील काही लेखांमध्ये आपण जॉन मिल, जेरेमी बेन्थम यांसारख्या अठराव्या शतकातील उपयुक्ततावादी विचारवंतांनी मांडलेल्या नतिक चौकटींचा अभ्यास केला. याचबरोबर इमॅन्युअल कान्ट या तत्कालीन आदर्शवादी विचारवंतांनी एकूणच उपयुक्ततावादाचे केलेले खंडनही पाहिले. अठराव्या शतकात मांडले गेलेले हे विचार आजही विविध नतिक द्विधा परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात. नीतिनियमविषयक चौकटींचा विचार करत असताना या सर्व तत्त्वज्ञांबरोबरच वैचारिक तात्त्विक मांडणी सर्वप्रथम करणारे सॉक्रेटिस, प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांचे नतिक प्रश्नांबद्दलचे विचार आजही या क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. याशिवाय शतकांनुसार प्रश्नांचे संदर्भ बदलतात आणि म्हणून समकालीन राजकीय/ नतिक विचारवंतांची मांडणीदेखील महत्त्वाची ठरते. विसाव्या शतकातील नीतिनियमविषयक चौकटी आपल्याला या प्रश्नांचे संदर्भ समजून घेण्यास मदतीचा हात देतात. विसाव्या शतकातील अभ्यासपूर्ण व सखोल राजकीय तात्त्विक मांडणी करणारा पाश्चात्त्य विचारवंत म्हणजे जॉन रॉल्स. या लेखात आपण जॉन रॉल्स या समकालीन विचारवंतांने मांडलेल्या विचारांचा आढावा घेणार आहोत.
जॉन बोर्डेल रॉल्स (इ. स. १९२१ – इ. स. २००२)
१९२१मध्ये जन्मलेल्या जॉन रॉल्सने आपल्या कारकिर्दीचा महत्त्वाचा काळ हॉर्वर्ड विद्यापीठात व्यतीत केला. प्रिन्स्टन विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ अशा दर्जेदार पाश्चात्त्य विद्यापीठामधून शिक्षण घेतलेल्या रॉल्सने सामाजिक प्रश्न सोडवणारे वैचारिक लिखाण करण्याबरोबरच तत्त्वज्ञानामध्ये भरीव अमूर्त मांडणी करण्याचे योगदान दिले. भारतामधील विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कळीचे ठरलेले राजकीय तात्त्विक संघर्ष समजून घेण्यासाठी रॉल्सने मांडलेले विचार उपयुक्त ठरतात. जॉन रॉल्स यांचे प्रमुख कार्य ‘न्याय’ (Justice) या संकल्पनेभोवती झालेले दिसते. याच विषयावर त्यांची पुस्तके आणि शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.
रॉल्स यांनी त्यांच्या वैचारिक प्रयोगशीलतेतून (thought experiment) मूलभूत स्थिती (original position) या संकल्पनेवर आधारित सद्धांतिक मांडणी केली आहे. या मांडणीमध्ये रॉल्स असे गृहीत धरतो की, आपण सर्वानी अज्ञानाचा बुरखा (veil of ignorance) पांघरल्यास, म्हणजेच आपल्याला या जगाविषयी व त्यातील असमानतेविषयी जे ज्ञान आहे त्याच्याकडे लक्ष न देता जर आपण नव्याने समाजव्यवस्था स्थापन करण्याचा विचार केला तर ती समाजव्यवस्था न्यायी बनेल. यामध्ये अशा प्रकारे अज्ञानाचा बुरखा पांघरल्यानंतर ज्या अमूर्त स्थितीत मनुष्य असेल त्या स्थितीला रॉल्सने मूलभूत स्थिती (original position)) असे म्हटले. मूलभूत स्थितीत कोणालाच आपल्या भविष्यातील आíथक अथवा सामाजिक स्तराची कल्पना नसल्यामुळे प्रत्येकजण अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहील, ज्यामधून सर्वात तळागाळातील व्यक्तीच्या हक्कांचेदेखील संपूर्ण संरक्षण होईल. म्हणजेच आपण स्वत: त्या ठिकाणी असल्यास आपल्याला ज्या किमान हक्कांची व संधींची अपेक्षा असेल ते हक्क व संधी सर्वानाच मिळाल्या पाहिजेत, अशा विचारांवर ही समाजव्यवस्था आधारलेली असेल. याचाच अर्थ सर्वाच्या न्यायाचे हित जपणारी अशी ही व्यवस्था असेल. म्हणूनच मूलभूत स्थिती व अज्ञानाचा बुरखा या वैचारिक प्रयोगातून जन्माला आलेली सद्धांतिक मांडणी ही समान न्यायाचे वाटप करणारी असेल.
न्यायविषयक विश्लेषणाची मांडणी रॉल्सने प्रथमत: ‘Justice as Fairness’ या निबंधाद्वारे केली. आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना रॉल्स म्हणतो की, मूळस्थितीतील माणसे विवेकशील असतात, त्यांना चांगले – वाईट पारखण्याची क्षमता असते, तसेच न्यायाची मूलभूत जाणीव असते. आपल्या स्वहितासाठी कोणता मार्ग स्वीकारावा याची त्यांना विवेकी जाण असते. तसेच या अवस्थेतील व्यक्ती कोणतीही सत्ता अथवा ज्ञान नसल्याने एकमेकांवर जबरदस्ती करू शकत नाही. सर्वाच्या गरजा आणि हितसंबंध इतकेच नव्हे तर क्षमता समान पातळीवर असतात. या सर्वाचा परिणाम म्हणून स्वत:ची वेगळी ओळख (Identity) असणाऱ्या व्यक्ती यातून जन्म घेतील. या सगळ्या विचारांचा परिपाक रॉल्सच्या  ‘A Theory of Justice’ या ग्रंथातून समोर येतो.
रॉल्सने त्याच्या अभ्यासपूर्ण मांडणीमधून दोन प्रमुख तत्त्वे मांडली. त्यातील पहिले तत्त्व समान स्वातंत्र्य (Liberty Principle)  व दुसरे तत्त्व विषमतेचे तत्त्व (Difference Principle) म्हणून ओळखले जाते. या दोन तत्त्वांची व त्यातील बारकाव्यांची रॉल्सने संपूर्ण दखल घेतली आहे. त्याच्या पहिल्या तत्त्वांनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत स्वातंत्र्याचा समान हक्क असला पाहिजे. तसेच इतर व्यक्तींनाही तसाच मूलभूत स्वातंत्र्याचा हक्क असला पाहिजे. एकाचे स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्याशी सुसंगत असणे अपेक्षित आहे. तर त्याच्या दुसऱ्या तत्त्वांप्रमाणे समाजात आढळणाऱ्या असमानतेचे किंवा विषमतेचे योग्य नियोजन केले गेले पाहिजे. रॉल्सच्या मते जर विषमता सर्वाच्या फायद्याची असेल आणि जर विषमता अधिकारपदे आणि सामाजिक दर्जा यामुळे निर्माण होत असेल तर अशी सर्व अधिकारपदे आणि सामाजिक दर्जा मिळवणे सर्वाना खुले असले पाहिजे. या त्याच्या तत्त्वांचा भारतीय सामाजिक – राजकीय वर्तुळावर मूर्त व अमूर्त अशा दोन्ही स्वरूपात निश्चित प्रभाव आहे. हा प्रभाव नक्की कोणता व आपल्या रोजच्या आयुष्याशी कसा निगडित आहे हे पुढील लेखात पाहू. 

e filing system started in district court
यूपीएससीची तयारी : जॉन रॉल्स – न्यायाची मूलभूत संकल्पना
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
जॉन रॉल्स न्यायाची मूलभूत संकल्पना
जॉन रॉल्स-न्यायाची मूलभूत संकल्पना