|| स्वाती केतकर- पंडित

कोपरगाव तालुका नगर परिषद शाळा क्र. ९

Accident on Samriddhi highway in Sinnar taluka two dead three seriously
सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
Fire Breaks Out at Atharva Agrotech Industry Project in Buldhana near khamgaon midc
खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

भटक्या जमाती हे एके काळी भारताच्या संपूर्ण समाजजीवनाचे महत्त्वाचे अंग होते. वस्तूंची देवघेव करण्यासोबत अनेक सेवाही या जमाती देत असत. पण आता काळासोबत या जमातींच्या उपजीविकेचे स्वरूपही बदलते आहे. त्यांची भटकंती मात्र अजून संपलेली नाही. याच समाजातील काही मुलांना ज्ञानदानाचे काम करत आहेत, मंगल पवार. गेली १०-११वर्षे त्या कोपरगावमधल्या नगर परिषद शाळा क्र. ९मध्ये काम करत आहेत. गावच्या अगदी टोकाला वस्तीत त्यांची ही शाळा भरते. ही भागशाळा आहे. पहिली ते चौथीचे वर्ग इथे भरतात. शाळेत खोल्या आहेत ३, शिक्षक २ तर विद्यार्थीसंख्या ५०. इथे येणारी मुलं म्हणजे वैदु, भिल्ल, वाघरी, मसणजोगी, वडार या समाजातील. काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे राजस्थानातील एक भटकी जमातही राहायला आली होती, जे गायी पाळत असत.

दहा वर्षांपूर्वी मंगल जेव्हा पहिल्यांदा इथे आल्या तेव्हा गंमतच व्हायची. म्हणजे मंगल काय म्हणतात हे मुलांना कळायचे नाही तर मुले काय म्हणतात, हे मंगलना कळायचे नाही. कारण मुलांची भाषा वेगळी. ती तेलग भाषेच्या जवळ जाणारी.  इक्कड दा, किंद किसो, इल्लू पो अशा मराठीला अपरिचित शब्दांनी शाळेच्या आवारात गोंधळ घातलेला असायचा. हे सारे शब्द मुलांच्या बोलीभाषेतील शब्द होते. त्या  बोलीभाषेतून त्यांना मराठीच्या प्रांगणात आणण्याचे आव्हानच मंगलसाठी मोठे होते.

एकदा शब्दभेंडय़ा खेळताना बह्ण हे अक्षर आले, त्यावरून एका मुलाने बुआ हा शब्द सांगितला. त्याच्या भाषेत बुआ म्हणजे भात. तर दुसऱ्या मुलीने क ह्ण वरून कुरा शब्द सांगितला. कुरा म्हणजे भाजी. खरं तर मराठीच्या शब्दभेंडय़ांमध्ये त्यांचे हे शब्द बरोबर नव्हते तरीही मंगलने ते शब्द स्वीकारले. नंतर त्यांना मराठीतूनही शब्द विचारले. पण आपल्या बोलीभाषेतील शब्दांना आपल्या बाई हसत नाहीत, उलट त्या ते स्वीकारतात हे पाहिल्यावर मुलांना फार बरे वाटले. बाई आणि शाळा दोन्ही आपलेसे वाटू लागले.

भाषेचा हा तिढा सोडवण्यासाठी मंगलना मदत मिळाली, क्वेस्ट या संस्थेच्या नीलेश निमकर यांची. त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून मंगल अनेक गोष्टी शिकल्या, ज्या त्यांनी शिक्षणातही वापरल्या. थेट शब्दवाचन करण्यापेक्षा अक्षर, ध्वनी, अक्षरगट मग शब्द अशा टप्प्यांचा त्यांनी शिक्षणासाठी वापर केला. अक्षर किंवा शब्द वाचून दाखवताना त्याचा ध्वनी विद्यार्थ्यांच्या मनावर ठसेल याची काळजी घेतली. यातूनच पुढे पाठांकडे गेल्याने पाठय़पुस्तकांतले धडे विद्यार्थ्यांना अनोळखी राहिले नाहीत तर ओळखीचा शब्दध्वनी पाठांतूनही ऐकल्यावर त्याची गोडी अधिकच वाढली. शिवाय सुरुवातीला अक्षरे म्हणजे मुलांसाठी अनोळखी चित्रेच असतात. शब्द हे काहीतरी कठीण वाटू नयेत, यासाठी मंगलनी एक वेगळा उपक्रम राबवला. त्या मुलांना आज काय केले? कुठे गेला होतात? असे प्रश्न विचारत मग आलेले उत्तर फळ्यावर लिहून वाचून दाखवत म्हणजे ‘आज मी दुकानात गेलो. तिथे खाऊ घेतला.’ अशी वाक्ये फळ्यावर आल्याने मुलांना त्याची गंमत वाटे. खडू-फळा हे त्यांचे दोस्त होत. अर्थात याही टप्प्यावर मंगल बोलीभाषेला विसरल्या नव्हत्या. वेगवेगळ्या शब्दांसाठी बोलीभाषेतले शब्द मुलांकडून शिकून घ्यायला त्यांनी सुरुवात केली.

भाषेची आवड वाढीला लागण्यासाठी मंगल विद्यार्थ्यांना खूप गोष्टी वाचून दाखवतात. शिवाय चित्रावरून गोष्ट ओळखणे, पुढे काय होईल याचा अंदाज बांधणे, अशा प्रकारचे उपक्रमही घेतले जातात. ‘सहभागी वाचन’ असे नाव त्यांनी या उपक्रमाला दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते.

भाषेची अडचण असली तरी या समाजातील विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मात्र चांगलेच असते. कारण पालकांसोबत गावोगाव भटकताना त्यांनी व्यवहार पाहिलेला असतो. मंगल म्हणतात, व्यवहारज्ञान उपजत असल्याने गणिती क्रिया फारशा समजवाव्या लागत नाहीत. अगदी त वरून ताकभात यांना ओळखता येतो. संख्यालेखन आणि संख्यावाचन याच्या अनेक निरनिराळ्या पद्धती मुले स्वत:च शोधून काढतात. म्हणजे हातचे घेण्याच्या अनेक निरनिराळ्या पद्धती विद्यार्थ्यांना सुचतात. गणिताच्या मूलभूत क्रिया आणि संख्याओळख केल्यावर मुले आपणहून गणिते सोडवतात. याचा मंगलनी एक छान किस्सा सांगितला, २ मुलं आपापल्या गायींसाठी चारा आणायला गेले होते. दोघांना दोन-दोन पेंढय़ा घ्यायच्या होत्या. पण विक्रेता म्हणाला पाच पेंढय़ा घेतल्यात तर सूट देईन. या प्राथमिक शाळेतल्या चिमुरडय़ांना पटकन हिशोब केला आणि पाच पेंढय़ा घेऊन त्या अध्र्या करून घेतल्या त्यांचे पैसेही वाचले आणि चाराही जास्त मिळाला. मुळातील पक्के व्यवहारज्ञान आणि गणिती क्रियांची जोड यामुळे त्यांना हे जमते. तार्किक विचार, निर्णयक्षमता, समस्यापूर्ती अशा सगळ्या मुद्दय़ांच्या आधारे हे विद्यार्थी सरस ठरतात.

या शिक्षणाबरोबर मंगल विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठीही प्रयत्नशील असतात. त्यांनी चक्क शाळेमध्ये नेलकटर, साबण, डेटॉल सारे नेऊन ठेवले आहे. याचा परिणाम म्हणून आता सारे विद्यार्थी डेटॉलने हात धुतल्याशिवाय डबा उघडत नाहीत. विद्यार्थ्यांच्या या प्रगतीमुळे आसपासच्या नागरिकांकडूनही शाळेला मदत मिळत असते. विद्यार्थ्यांना चप्पल, वॉटरबॅग, वह्य़ा यांचे मोफत वाटप होते.

पाठय़पुस्तक अभ्यासक्रम समितीच्या सदस्य, मराठी भाषा समितीतील सदस्य अशी अनेक पदे भूषवलेल्या मंगलचे या विद्यार्थ्यांशी इतके छान बंध जुळले आहेत की, या सगळ्या पदांपेक्षा विद्यार्थ्यांनी ‘ये ताई’ असं म्हणत हक्काने मारलेली एकेरी हाकच त्यांना जास्त मानाची वाटते.

swati.pandit@expressindia.com