ए ल अ‍ॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे देशांतर्गत प्रमुख व प्रथितयश शिक्षण संस्थांमधून एम.टेक्. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हा पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बिल्ड इंडिया स्कॉलरशिप’ योजनेअंतर्गत विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येते.
शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश- या शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश काही निवडक, आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये ‘कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी’ या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीत विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊन त्यांना या क्षेत्रात उत्तम रोजगार संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- मद्रास व दिल्ली तसेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- त्रिचरापल्ली व सुरतकल (कर्नाटक) या संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक शैक्षणिक अर्हता- अर्जदार विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी व इंजिनीअरिंगमधील बीई/ बी.टेक्. यांसारखी पदवी परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा.
वयोमर्यादा- उमेदवारांचे वय १ जुलै २०१६ रोजी २३ वर्षांहून अधिक नसावे.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांची वरील शैक्षणिक संस्थांतर्फे संबंधित विषयाचे ज्ञान व मानसशास्त्रीय कौल तपासणारी चाचणी घेण्यात येईल. निवड चाचणीमध्ये निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे शिष्यवृत्तीसाठी त्यांची अंतिम निवड
करण्यात येईल.
रोजगार संधी- आपला अभ्यासक्रम यशस्वीपणे व समाधानकारकरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे एल अ‍ॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीत उचित संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांचा सुरुवातीचा एकत्रित पगार वार्षिक सहा लाख रुपये असेल.
शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीबरोबर ३ लाख रुपयांचा करारनामा करावा लागेल.
अधिक माहिती- कंपनीच्या http://www.lntecc.com careers या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० डिसेंबर २०१२ पर्यंत अर्ज करावेत.
शिष्यवृत्ती व इतर लाभ
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २४ महिने कालावधीसाठी दरमहा १३,४०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना शैक्षणिक शुल्क व आनुषंगिक लाभसुद्धा देय असतील.