विधी क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी भारत सरकारने नॅशनल लॉ स्कूल/विद्यापीठांची स्थापना केली आहे. सध्या देशात अशी १९ स्कूल्स कार्यरत आहेत. त्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी असे अभ्यासक्रम चालवले जातात. त्यांच्या प्रवेशासाठी दरवर्षी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (सीएलएटी- क्लॅट) घेतली जाते. त्याद्वारे बी.ए.एलएल.बी. या पाच वर्षे कालावधीच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
गेल्या काही वर्षांपासून काही सार्वजनिक कंपन्यांमध्येही विधी सल्लागारांच्या भरतीसाठी क्लॅटमधील गुणांचा आधार घेतला जात आहे. उदा. गेल- गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, ओएनजीसी. तसेच काही खासगी संस्थासुद्धा क्लॅटचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य़ धरतात. या परीक्षेसाठी साधारण ३५-४० हजार विद्यार्थी बसतात. परंतु लॉ स्कूलमधील एकूण जागा मात्र २००० आहेत. त्यामुळे स्पर्धा प्रचंड आहे. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या मराठी मुलांची संख्या अगदी कमी आहे.
क्लॅट परीक्षा पद्धती
चाळणी परीक्षेचा पेपर दोनशे गुणांचा आणि दोन तासांचा असतो. यामध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला १ गुण तर चुकलेल्या प्रश्नाचे ०.२५ टक्के गुण वजा होतात.
पेपरमध्ये पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले जातात-
१) इंग्रजी (४० गुण) – यामध्ये इंग्रजीवरील प्रभुत्व तपासले जाते. उताऱ्यावर आधारित प्रश्न असतात. त्यातील मध्यवर्ती कल्पना समजून घेऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. याद्वारे व्याकरण, शब्दसंग्रह, विषयाच्या आकलनाची तपासणी केली जाते. वाक्यांमध्ये रिक्त ठेवण्यात आलेल्या जागा उचित शब्दाने भरा अशा पद्धतीचेही प्रश्न विचारले जातात.
२) सामान्यज्ञान (५० गुण) – या पेपरमध्ये अर्धे प्रश्न चालू घडामोडींवर असतात. त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना-घडामोडींचा समावेश असतो. तर उरलेले अर्धे प्रश्न भारताचा भूगोल, इतिहास, विज्ञान, महत्त्वाची पुस्तके आणि लेखक आदी विषयांवर विचारली जातात.
३) प्राथमिक अंकगणित (२० गुण) – सरासरी, काळ, काम आणि वेग, अंतर, नफा आणि तोटा, गुणोत्तर आणि हिस्सा या घटकांवर प्रश्न विचारले जातात. त्यांचा दर्जा हा दहावीपर्यंतच्या गणिताचा असतो.
४) विधी शिक्षणाचा कल- विधीविषयक कल (५० गुण)- हा कल तपासण्यासाठी नीतितत्त्वे, वस्तुस्थिती आणि निष्कर्ष या प्रकारातील प्रश्न विचारले जातात. त्यासाठी नमुन्यादाखल काही कायदेशीर प्रस्ताव पेपरमध्ये दिले जातात. हे प्रस्ताव वास्तवात खरे नसतात. मात्र ते खरे समजून उत्तरे द्यावी लागतात. उमेदवार किती प्रमाणात अचूक निष्कर्ष काढू शकतो याची चाचणी घेतली जाते.
५) तार्किक क्षमता (४० गुण)- समस्या सोडवणुकीसाठी उमेदवार कशा प्रकारे तार्किक क्षमतेचा उपयोग करतो, त्याच्याकडे तार्किक सुसंगता आहे की नाही, अतार्किक बाबींची दुरुस्ती कशा रीतीने करतो या बाबींची चाचणी घेतली जाते. शृंखला, दिशा, समानता, तारतम्य, न्याय इत्यादी गोष्टींचा समावेश या भागात केला जातो. दृष्यात्मक तर्कशुद्धतेवर प्रश्न विचारले जात नाहीत.
क्लॅट परीक्षेसाठी एक सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. पण तो लवचीक आहे. त्यामुळे अमुक एकच प्रकारचे प्रश्न विचारले जातील, असे होत नाही. प्रश्नांचा कल उमेदवाराचा विधी शाखेकडील कल जाणून घेणारा असतो. त्याची तर्कशक्ती, गणितीय आणि भाषिक कौशल्य क्षमतेची चाचणी या परीक्षेद्वारे केली जाते.
गती आणि अचूकता महत्त्वाची
या परीक्षेसाठी वरील दोन गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण २०० प्रश्न सोडवण्यासाठी केवळ २ तासच असतात. या गणिताने एक प्रश्न सोडवायला एका मिनिटापेक्षाही कमी वेळ मिळतो. त्यामुळे प्रश्नांचा अधिकाधिक सराव हवाच. शिवाय नकारात्मक गुणपद्धती असल्याने अचूूकताही गरजेचीच. विद्यार्थ्यांसाठी अनेक ऑनलाइन सराव चाचण्या उपलब्ध आहेत. या चाचण्या देत राहिल्याने आपल्या कमकुवत आणि जमेच्या बाबी लक्षात येतात. कमकुवत बाबींवर लक्ष देणे शक्य होते. सतत सराव करून आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे, अत्यंत गरजेचे आहे. परीक्षेतील विविधांगी प्रश्नांचाही अभ्यास होणे गरजेचेच. त्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहाव्यात. एकूणच क्लॅट परीक्षेत उमेदवारांच्या सखोल ज्ञानाची व संकल्पनांच्या स्पष्टतेची कसोटी लागते.
अर्हता व इतर नोंदी
अर्हता – यंदा या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादेची अट ठेवण्यात आलेली नाही. बारावीतील कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांचे विद्यार्थी बसू शकतात. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीत ४५% तर राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४०% मिळणे आवश्यक असते.
दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास पुढीलप्रमाणे त्याचा गुणानुक्रम ठरवला जातो.
- चाळणी परीक्षेत विधी कल (लीगल अॅप्टिटय़ूड) या भागात मिळालेले गुण.
- उमेदवाराची उच्च वयोमर्यादा
- संगणकीय लॉट यंदा १३ मे २०१८ रोजी दुपारी ३ ते ५ या काळात चाळणी परीक्षा होणार आहे. ३१ मे २०१८ रोजी त्याचा निकाल आणि संवर्गनिहाय गुणवत्ता यादी जाहीर होईल.
- महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर.
- क्लॅट परीक्षेच्या माहितीसाठीचे संकेतस्थळ – http://information.clat.ac.in/
महाराष्ट्रातील संस्था-
१) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,मुंबई – या संस्थेत ५० जागा आहेत. यापैकी पन्नास टक्के जागा महाराष्ट्रासाठी राखीव आहेत.
संपर्क – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,
मुंबई. संकेतस्थळ – http://mnlumumbai.edu.in/
ईमेल- admission2018@mnlumumbai.edu.in
दूरध्वनी – ०२२ – २५५२५७७१.
२) महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर – या संस्थेत १२० जागा आहेत. त्या सर्व जागा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
संपर्क- ज्युडिशिअल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, सिव्हिल लाइन्स, लेडीज क्लबजवळ, सीपी क्लब रोड,
नागपूर- ४४०००१,
संकेतस्थळ – http://www.mnlunagpur.edu.in/
ईमेल – mnlunagpur@gmail.com
दूरध्वनी – ०७१२ – २५२२५८३.
३)महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद – या संस्थेत ५० जागा आहेत. त्या सर्व जागा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
संपर्क- गव्हर्नमेंट बी.एड. कॉलेज कॅम्पस, पदमपुरा, औरंगाबाद – ४३१००५,
संकेतस्थळ www.mnlua.ac.in
ईमेल – mnlunagpur@gmail.com
दूरध्वनी – ०२४० – २३३४८००.
तिन्ही संस्थांमधील अभ्यासक्रम पूर्णकालीन आणि निवासी स्वरूपाचा आहे.
इतर संस्था – या परीक्षेद्वारे पुढील संस्थांमध्येसुद्धा प्रवेश मिळू शकतो.
१) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगलूरु
२) नॅशनल अॅकॅडेमी ऑफ लीगल स्टडी अँड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद
३) नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सिटी, भोपाळ
४) वेस्ट बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्सेस, कोलकता,
५) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर,
६) हिदायतउल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूर
७) गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगर
८) डॉ. राममनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लखनौ
९) राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पंजाब
१०) चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पाटणा
११) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल अॅडव्हान्स्ड स्टडीज, कोची
१२) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ओडीशा, कटक
१३) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ स्टडी अँड रिसर्च इन लॉ, रांची
१४) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अँड ज्युडिशिएल अॅकॅडेमी आसाम
१५) दामोरम संजीवय्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विशाखापट्टणम
१६) तामिळनाडू नॅशनल लॉ स्कूल, तिरुचिरापल्ली
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2018 3:04 am