मेडिकेशन व थेराप्युटिक्स या शाखांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन व्हावे व त्यासाठी सवरेत्कृष्ट मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरता फ्रान्स सरकारच्या पुढाकाराने आणि LERMIT या आंतरविद्याशाखीय संशोधन संस्थेच्या व युनिव्हर्सटिी ऑफ पॅरिस, सॅक्ले यांच्या सहकार्याने पीएच.डी.साठी पाठय़वृत्ती देण्यात येते.
मेडिकेशन व थेराप्युटिक्स या विद्याशाखांबरोबरच जैवविज्ञान, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विद्याशाखांमधील अर्जदारांना मेडिकेशन व थेराप्युटिक्समधील आंतरविद्याशाखीय संशोधन करता यावे, हासुद्धा या पाठय़वृत्तीचा उद्देश असतो. ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू होणाऱ्या पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून १ एप्रिल २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाठय़वृत्तीविषयी : भविष्यातही देशाचा विकास दर उत्तम राहावा, म्हणून फ्रान्सच्या सरकारने संशोधनासाठी व शिक्षणासाठी सुमारे २२ अब्ज युरो एवढय़ा रकमेची तरतूद केली. या कार्यक्रमांतर्गत सरकारने २०११ मध्ये एकूण १०० संशोधन प्रकल्पांची निवड केली. या संपूर्ण प्रकल्पाला ‘लॅबोरेटरीज ऑफ एक्सलन्स’ या नावाने ओळखले जाते. यापकी मेडिकेशन व थेराप्युटिक्स
या शाखांमध्ये संशोधन करणारी मातब्बर संशोधन संस्था म्हणजेच लॅबोरटरीज ऑफ एक्सलन्स इन रिसर्च ऑन मेडिकेशन अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह थेराप्युटिक्स (LERMIT).
LERMIT ही एक आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था असून त्यात जगभरातील सवरेत्कृष्ट जैववैद्यक, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांतील तज्ज्ञांचा समावेश आहे. थेराप्युटिक्स हे आंतरविद्याशाखीय संशोधन क्षेत्र असल्याने वर नमूद केलेल्या विविध विद्याशाखांमधील शास्त्रज्ञ एकत्र येऊन थेराप्युटिक्समधील संशोधन कार्य हाती घेतात.
सध्या मोठय़ा प्रमाणात लागण झालेले आजार म्हणजे कर्करोग, हृदयरोग, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि प्रतिकारशक्ती कमी करणारे रोग. मेडिकेशन व थेराप्युटिक्समधील संशोधनाच्या माध्यमातून या रोगांचा यशस्वी सामना करणे या हेतूने या संस्थेचे कार्य अविरत सुरू आहे. जगातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता या कार्याकडे आकृष्ट व्हावी आणि त्यांच्या संशोधनाच्या माध्यमातून या रोगांवर अद्ययावत उपाय शोधले जावेत, या हेतूने LERMIT आणि युनिव्हर्सटिी ऑफ पॅरिस, सॅक्ले यांच्या सहकार्याने ही पीएच.डी.साठीची पाठय़वृत्ती योग्य उमेदवारांना बहाल केली जाते. पाठय़वृत्तीधारकाच्या पीएच.डी.साठी संशोधन प्रकल्पाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. पाठय़वृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचा प्रकल्प पूर्ण करावा लागतो. या पाठय़वृत्तीअंतर्गत अर्जदाराला त्याच्या विद्यापीठ किंवा संस्थेकडून दरमहा निवासी भत्ता,वेतन भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतात. एकूण पीएच.डी. पाठय़वृत्तींची संख्या संस्थेने नमूद केलेली नाही. पाठय़वृत्तीधारकाची पीएच.डी. अभ्यासक्रमाला ऑक्टोबर २०१६ पासून सुरुवात होईल.
आवश्यक अर्हता : ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. संबंधित क्षेत्रातील संशोधनाचा, औद्योगिक अथवा तत्सम अनुभव असलेल्या अर्जदारांना पाठय़वृत्तीसाठी प्राधान्य दिले जाते. अर्जदाराने त्याच्या संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तीपत्र अर्जासोबत जोडावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. त्याचे फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. फ्रेंच भाषेतील परीक्षा उत्तीर्ण असल्यास तसे पुरावे त्याला त्याच्या अर्जासोबत जोडावे लागतील. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.
अर्ज प्रक्रिया : या पाठय़वृत्तीसाठी उमेदवाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जासोबत त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या पाठय़वृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, त्याने केलेल्या संशोधनाचा लघुसंशोधन अहवाल (Research Proposal), त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात.
याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे. अर्जदारांना अर्ज दाखल करण्यापूर्वी संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी विद्यापीठातील संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकाला ई-मेलद्वारे संपर्क करता येईल.
निवड प्रक्रिया : या पाठय़वृत्तीच्या निवड प्रक्रियेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अर्जाची छाननी करून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाते. त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीकडून या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यातील हुशार व ध्येयवादी उमेदवारांची अंतिम निवड या पाठय़वृत्तीसाठी केली जाते. या वर्षीच्या पहिल्या टप्प्यातून निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती २५ मे २०१६ रोजी होतील.
अंतिम मुदत : या पाठय़वृत्तीसाठीचे अर्ज १ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.

महत्त्वाचा दुवा : http://www.labex-lermit.fr/en/ nitsprathamesh@gmail.com

 

– प्रथमेश आडविलकर