web-knowledge1बहुतांश व्यक्तींकडे किंवा विद्यार्थ्यांकडे संगणकावर मायक्रोसॉफ्टचं ऑफिस – office हे पायरेटेड असतं. कारण हे सॉफ्टवेअर विकत घ्यायला गेल्यास ते महाग पडतं, पण पायरेटेड सॉफ्टवेअरमुळे हक्कभंग होऊन आपण संकटात येऊ शकतो. म्हणून काही फ्री ऑफिस सॉफ्टवेअरची माहिती देत आहोत..
Libre किंवा Open office
साधारणत: ही दोन्ही सॉफ्टवेअर सारखीच असून ती तुम्हाला नेटवर फ्री डाउनलोड करून वापरता येतात. https://www.openoffice.org किंवा https://www.libreoffice.org/ या वेबसाइट्सवरून ती घेता येतील. या दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या फाइल्स पाहता येतात, त्यात बदल करता येतात. मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसप्रमाणेच यातही तुम्हाला वर्ड, स्प्रेड शीट्स म्हणजे एक्सेल वापरता येतं, तसंच पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशनही तयार करता येतं. तुम्ही या सॉफ्टवेअरमध्ये तयार केलेली एखादी फाइल मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये उघडायची असेल, तर ती फाइल सेव्ह करताना मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या कोणत्या व्हर्शनमध्ये तुम्हाला ती हवीये, असा पर्याय तुम्हाला मिळतो. समजा, मला माझ्याकडचं एक डॉक्युमेंट माझ्या एखाद्या मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणाऱ्या मित्राला पाठवायचं असेल, तर मी ती फाइल सेव्ह अ‍ॅज म्हणून सेव्ह करताना त्यात मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं 97-2003 हे व्हर्शन सिलेक्ट करून सेव्ह करेन आणि पाठवेन. जर ती फाइल नुसतीच सेव्ह केल्यास ती ओडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह होईल, जी इतर ठिकाणी ओपन होणार नाही किंवा झालीच तर कदाचित काही डेटा लॉस होऊ शकेल.
एवढी एकच फॉरमॅटची गोष्ट लक्षात ठेवल्यास, बाकी मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखीच सगळी वैशिष्टय़े या दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये आहेत. यात तुम्ही वर्ड काऊंट मोजू शकता, स्टाइल शीट तयार करू शकता, स्प्रेडशीट म्हणजेच एक्सेलप्रमाणेच फॉम्र्युले लावून आकडेमोड करू शकता. त्यामुळे उगाच पायरेटेड सॉफ्टवेअर वापरण्यापेक्षा फुकट असलेली ही दोन ऑफिसेस वापरायला काय हरकत आहे, नाही का!

Microsoft Office
मोबाइलवरची ऑफिसेस : हल्ली आता बरीशची डॉक्युमेंट ई-मेलने येतात आणि मग ती मोबाइल किंवा टॅबवरूच पाहिली जातात. म्हणूनच त्यासाठी मोबाइल किंवा टॅबमध्ये ऑफिस असणं आवश्यक ठरतं. काळाची पावलं ओळखून मे २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्टने अँड्रॉइड मोबाइलासाठीचं ऑफिसचं व्हर्शन उपलब्ध केलं आहे, तेही मोफत! तुम्ही ज्याप्रमाणे कॉम्प्युटरवर वापरता तसंच मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा एक्सेल वापरता यातही वापरू शकता. यात तयार केलेली किंवा सेव्ह केलेली डॉक्युमेंट्स तुम्हाला क्लाउडवर टाकून मग ती कुठूनही शेअर करता येतात. हे ऑफिस वापरण्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्टचं एक अकाऊंट तयार करावं लागतं. मायक्रोसॉफ्टने ऑफिसमधले वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट अशा भागांचे वेगळे अ‍ॅप्सही तयार करून ठेवले आहेत.

WPS office
अँड्रॉइड फोनच्या जगात हे ऑफिस विख्यात आहे आणि हे अ‍ॅप लाखो लोकांनी डाउनलोडही केलं आहे. बऱ्याचशा फोनमध्ये हे अ‍ॅप इनबिल्ट म्हणजे आधीपासूनच टाकलेलं असतं. यातही तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल किंवा पॉवरपॉइंटच्या कोणत्याही फाइल्स ओपन करू शकता, त्यात बदल करू शकता आणि मग सेव्ह करू शकता. यात तुम्ही नवी डॉक्युमेंट्स क्रिएट करून मग त्याला पासवर्ड ठेवण्याचीही सुविधा आहे. याशिवाय तुम्ही यात पीडीएफ फाइल्सही पाहू शकता.

Google docs, Google sheet, Google Slides
मायक्रोसॉफ्टप्रमाणेच गुगलनेही ऑफिससारखीच अ‍ॅप्स विकसित केली आहेत. त्यात तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या फाइल ओपन करून एडिट करू शकता. तसंच गुगल ड्राइव्हवर अपलोड करून शेअरही करू शकता.