अमेरिकेतल्या काही शाळांमध्ये पाठ निरीक्षण करताना खूप मजेशीर अनुभव आले आणि खूप काही शिकायलाही मिळालं. मी भेट दिलेली कॅपे युनियन प्रायमरी स्कूल तर अतिशय सुंदर होती. मुलांना खेळण्यासाठी या शाळेत खूप मोठं मदान होतं. शाळेला छोटसं ग्रंथालय होतं. तिथली पुस्तकं या मुलांचा सहज हात पोहोचेल अशा उंचीपर्यंत ठेवलेली होती. इथल्या एका वर्गात तर मुलांच्या नृत्याच्या तासाला तर मुलांबरोबर मुख्याध्यापकसुद्धा नृत्य करत होते. प्रत्येक वर्गात खूप रंगीत चित्रं आणि तक्ते भिंतीवर अडकवलेले होते. ही शाळा खेडेगावातली होती. त्यामुळे इथे शाळेच्या छोटय़ाशा शेतावर मुलांनी लागवड केलेली फुलझाडं, आणि पालेभाज्या पाहायला मिळाल्या. वर्गात मुलं आणि त्यांच्या शिक्षिका चित्रं काढताना, वाचन करताना, लेखनाचा सराव करताना दिसत होत्या.
इंटर्नशिपच्या काळात इयत्ता अकरावीतल्या एका वर्गात कला शिक्षिकेनं मुलांना फुलं असलेली शुभेच्छा कार्ड दिली होती. ती पाहून आहे तशी काढायला सांगितली होती. मुलं चित्र काढत होती. मागं संगीत सुरू होतं. तशा गप्पाही सुरू होत्या. वर्ग नियंत्रणाचा प्रश्न नव्हता. या शिक्षिकेकडं चित्रांचा फार मोठा संग्रह होता. दुसऱ्या एका वर्गात चित्रकलेच्याच शिक्षिकेनं एक अपूर्ण चित्र काढलं होतं. शिक्षिकेनं एका व्यक्तीचा फक्त चेहरा काढला होता. त्यानंतरचं चित्र तिने मुलांना पूर्ण करायला सांगितलं. एक मुलगा आला, त्यानं कान काढले. दुसऱ्या मुलानं नाक काढलं. अशा प्रकारे अनेकांनी येऊन हे चित्र पूर्ण केलं. हा सुध्दा अनुभव खूप छान होता. हे चित्र काढल्यानंतर प्रत्यक्षातलं चित्र आणि अनेक मुलांनी येऊन काढलेलं चित्र याची तुलना झाली आणि त्यावर वर्गात चर्चासुध्दा झाली.
इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेनं मुलांना प्रकल्प करायला सांगितला होता. तिनं मुलांनाच विषय निवडीचं स्वातंत्र दिलं होतं. त्यातील एका विद्यार्थ्यांनं पशुवैद्यक हा विषय प्रकल्पासाठी निवडला होता. त्यासाठी त्यानं पूर्ण एक दिवस पशुवैद्यकीय इस्पितळामध्ये घालवला होता. तिथल कामकाज कसं चालतं, ते त्यानं पाहिलं होतं. ससे, कुत्रे, मांजरी यांची काळजी कशी घेतात, त्यांच्यावर उपचार कसे केले जातात ते त्याला पाहायला मिळालं. अनुभवाच्या आधारे त्याने प्रकल्प केला होता. त्याच्याच वर्गातल्या एका मुलीने ‘neonatal nurse’ हा विषय प्रकल्पासाठी निवडला होता. नवजात शिशुची काळजी घेणं हे अशा नर्सचं मुख्य काम असतं. या प्रकल्पासाठी या मुलीने हॉस्पिटलमधल्या सर्व औपचारीक बाबी पूर्ण करून प्रत्यक्षात प्रसूती कशी होते, ते पाहिलं आणि त्या माहितीच्या आधारावर तिने प्रकल्प केला होता. या प्रकल्पासाठी ती काही दिवस हॉस्पिटलमध्ये जात होती. डॉक्टर, नस्रेस, गर्भवती महिला आणि बाळंत झालेल्या महिला यांना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांच्याशी बोलून आलेल्या अनुभवावर तिनं प्रकल्प केला होता. हॉस्पिटलमधल्या या अनुभवाबद्दल तिला विचारलं असता तिला रडू कोसळलं. ‘प्रसूतीची प्रक्रिया किती वेदनादायक असते, हे या प्रकल्पानिमित्ताने कळलं. बालकाला जन्म देणं सोपं नसतं,’ असं ती म्हणाली. इतर काही मुलांनी मसाज थेरापिस्ट, कॉस्मेटॉलॉजी, ग्राफिक डिझाईन, नìसग, स्पेशल एज्युकेशन, शू मेकींग, फिजीशियन, वेडिंग प्लॅनर, चाइल्ड डेव्हलपमेंट, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर प्रोग्रॅिमग, वेल्डर, योग, ट्रक ड्रायव्हिंग स्कूल, फायर सर्वसि, समुपदेशन, फिटनेस अ‍ॅन्ड न्युट्रिशन यांसारखे विषय निवडले होते.
स्पेशल एज्युकेशनचा तास हा अभ्यासात मागे पडलेल्या मुलांचा तास असतो. हॅमिल्टन हायस्कूलच्या या वर्गात २० मुले होती. वर्गातल्या मुलांनी शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांचे व्हिडीओ शूटिंग करून त्याचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं होतं. या प्रेझेंटेशनसाठी मुलांनी शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मुलांनी स्वत: कॅमेरे नेत शुटिंग केलं होतं. प्रत्येक नवी स्लाइड समोर दिसल्यावर शिक्षिका मुलांना मध्येच थांबवून प्रश्न विचारत होत्या. या व्हिडिओचं शूटींग करण्यापासून, ते सादर करण्यापर्यंतची सर्व कामं मुलांनी केली होती. त्यात कॅमेरामन, पटकथालेखन, निवेदन, संपादन या सर्व भूमिका मुलांनीच वठवल्या होत्या.
इयत्ता अकरावीच्या वर्गाबाहेर एक मुलगा छोटीशी बाहुली घेऊन उभा होता. चौकशी केल्यावर कळलं की, वर्गात चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयाची तासिका सुरू होती. या बाहुलीचं वैशिष्टय़ म्हणजे तिला घेऊन तुम्ही खाली बसलात तर ती रडायला लागायची. म्हणून तिला घेऊन सतत उभं राहायचं. पालकत्वाचं हे शिक्षण मुलींसोबत मुलांनाही मिळावं, हा विचार या मागं होता. बालकांचं संगोपन ही केवळ आईची जबाबदारी नसून, ती तेवढीच बाबांचीही असते हे शिकण्याच्या वयात मुलांच्या मनावर बिंबविण्यासाठी या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला होता.
अमेरिकन शिक्षण किती वेगळं आहे, हे त्यांच्या शैक्षणिक धोरणांच्या आखणीत आणि अंमलबजावणीत दिसून येतं. शिक्षकांसाठी असलेल्या Teaching Excellence and Achievement Program (TEA)  या अमेरिकन सरकारच्या फेलोशिप प्रोग्रामद्वारे मला खूप काही शिकायला मिळालं. या फेलोशिपबाबत शिक्षकांना अधिक माहिती http://www.usief.org.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.                                                         
borhadem@gmail.com