09 March 2021

News Flash

सावध ऐका, पुढल्या हाका!

आज कुठल्याही विद्याशाखेचे शिक्षण घेताना भविष्यात त्या क्षेत्राचा परिघ अधिक विस्तारणार आहे

| September 7, 2015 02:03 am

गेली काही वर्षे तुम्ही एखाद्या विषयाचे शिक्षण घेतले आणि प्रत्यक्ष करिअरमध्ये प्रवेश करण्याची वेळ आली तेव्हा जर त्या शिक्षणाशी संबंधित क्षेत्राचे स्वरूपच पार बदलून गेले किंवा त्या क्षेत्राला मागणीच उरली नाही तर..? या कल्पनेने कसंनुसं होत असलं तरी या वस्तुस्थितीला सामोरं जाण्याची तयारी प्रत्येकाने आपापल्या परीने करायला हवी.सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या जगात विविध क्षेत्रांचे स्वरूप आणि त्याला असलेली मागणी या गोष्टींमध्ये दिवसागणिक कमालीचा बदल होतोय.. म्हणूनच लक्षात घ्यायला हवे की, आपली पदवी ही कुठल्याही करिअरमध्ये केवळ प्रवेश करण्यापुरती आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. खरे तर आपण जे शिकत असतो, त्यानंतर किमान पाच-सात वर्षांनी त्या क्षेत्रात वावरणार असतो.. पदवी ही जणू त्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा गेटपास असते.. केवळ एक सुरुवात असते. मात्र, त्या क्षेत्रात जे काम तुम्ही करणार आहात, त्या स्पेशलायझेशनमध्ये गती मिळवण्याकरिता  त्यासंबंधीचा एखादा अल्पावधीचा अभ्यासक्रम करणे आज अत्यावश्यक ठरू लागले आहे. उदाहरणार्थ- आज वित्तीय ऑडिटरना कंपनी ऑडिट करताना संगणकीकरणामुळे ती प्रणाली समजून घेणे आवश्यक असते. त्याकरता विविध सर्टिफिकेशन्स परीक्षा उत्तीर्ण असणे ही अर्हता आज आवश्यक मानली जाते.  करिअरमधील बाजारपेठीय नव्या कलांशी जुळवून घेत त्यानुरूप आपल्या क्षमता आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी शिकत राहणे गरजेचे आहे.आतापर्यंत जे शिक्षण घेतले त्यासंबंधीतच क्षेत्रात करिअर करायचे, असा जो आजवरचा प्रवाह होता, तो नजीकच्या भविष्यकाळात पुरता पुसला जाण्याची चिन्हे सुस्पष्ट आहेत.  खरे तर कुणालाही मूलभूत शिक्षण आणि अनुभवावर ‘करिअर कम्प्लीट स्विच करणे’ शक्य असते आणि ते करताना मूळ शिक्षणाचा- मग ते कुठल्याही विद्याशाखेचे का असेना, त्या व्यक्तीला उपयोग होतो. करिअरची वाट बदलूनही यशस्वी झालेली अनेक उदाहरणे आपल्याला भोवताली दिसतात.अलीकडे करिअरच्या संकल्पनांमध्ये मूलगामी बदल होतोय. आपण जे शिकलो, त्यावर आधारितच काम करायचे, असा ग्रह बाळगणे फोल ठरेल अशी सद्यपरिस्थिती आहे. आज कुठल्याही क्षेत्रातील (प्रामुख्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील) मूळ क्षमता प्राप्त करणे आणि नंतर त्यातील वेगळ्या वाटा लक्षात घेणे जणू अनिवार्य ठरू लागले आहे. यामुळे काही वर्षांत त्या क्षेत्राचे स्वरूप जरी बदलले तरी नव्या बदलांशी जुळवून घेणे अवघड जात नाही. मात्र, हे नक्की की, कुठलंही उद्योग क्षेत्र कितीही बदललं तरी त्याचे मूलभूत तर्कशास्त्र बदलत नाही. अशा वेळी त्या क्षेत्रात तगण्यासाठी मूळ विषयाची आवड मात्र हवी.आगामी दिवसांत तगण्यासाठी प्रत्येकाने क्षमता आणि कौशल्य यांतील तफावत लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरेल. जेव्हा एखाद्याला केवळ कौशल्य अवगत असते आणि कालांतराने जर त्या क्षेत्रात मूलभूत बदल झाले तर मग आता कुठले काम करायचे, हा प्रश्न ते काम करणाऱ्यांना भेडसावतो. याचे कारण म्हणजे त्या व्यक्तींनी केवळ साधनविषयक कौशल्य प्राप्त केलेले असते. उदा. सोशल मीडियासंबंधातील कामे. मात्र, अभियांत्रिकी, वित्त, कायदा यांसारख्या विद्याशाखांचा अभ्यास केलेला असला तर त्या विद्याशाखेतील क्षमता तुम्ही प्राप्त करता आणि त्या क्षेत्रातील तुमचा मूलभूत पाया विकसित होतो. म्हणूनच जरी पुढेमागे तुमच्या कामाचे, करिअरचे स्वरूप जरी बदलले तरी मूळ पाया घट्ट असल्याने तुम्ही त्या क्षेत्रातील बदल आत्मसात करू शकता. होऊ घातलेला आणखी एक बदल म्हणजे आगामी काळात केवळ एकच अर्हता पुरेशी ठरणार नाही. म्हणजे काय, तर केवळ अभियांत्रिकीची पदवी असण्यापेक्षा जर त्या अभियंत्याकडे संवादकौशल्य असेल तर नोकरीच्या बाजारपेठेत त्याला नक्कीच झुकते माप मिळेल. आज कुठल्याही करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी सर्जनशील विचार, विश्लेषण क्षमता आणि समस्या निवारण ही कौशल्येही अत्यावश्यक ठरतात. येणारा जमाना आहे तो ‘क्रॉस करिअर’चा! उदाहरणार्थ- हेल्थकेअर क्षेत्रात तंत्रशिक्षण घेतलेल्यांना उत्तम संधी मिळण्याची शक्यता अधिक असते. ‘बायोमेडिकल इंजिनीअरिंग’ केलेल्यांना चांगले दिवस येणार असे म्हटले जाते ते त्यामुळेच! हेल्थकेअर संबंधातील पदवी मिळवल्यानंतर जर व्यवस्थापन विषयीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले तर संभाव्य करिअर संधी आपोआपच विस्तारतात. आज कुठल्याही विद्याशाखेचे शिक्षण घेताना भविष्यात त्या क्षेत्राचा परिघ अधिक विस्तारणार आहे आणि कामाच्या मूळ ढाच्यापलीकडे कितीतरी गोष्टी शिकाव्या लागणार आहेत, याची जाणीव आणि मानसिक तयारी ठेवली तर आणि तरच कुठल्याही क्षेत्रातील इनोव्हेशनच्या नव्या वाटा निर्माण करणे अथवा त्यात मार्गक्रमण करणे शक्य होईल!

– सुचिता देशपांडे
suchita.deshpande@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 2:03 am

Web Title: listen careful the next call
Next Stories
1 मुख्य परीक्षेला सामोरे जाताना..
2 निबंधलेखनाची तयारी
3 इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटची कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट
Just Now!
X