News Flash

अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे रोजगारप्रवण प्रशिक्षणक्रम

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेत कौशल्यावर आधारित रोजगारप्रवण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-

| July 27, 2015 01:10 am

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेत  कौशल्यावर आधारित रोजगारप्रवण  अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-
स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाचा कालावधी : हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा आहे. अभ्यासक्रमाचे सत्र वर्षांतून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुरू होते.
आवश्यक पात्रता : या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदार १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे आवश्यक असते. याशिवाय उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असते.
अभ्यासक्रमाचे स्वरूप : प्रवेशप्रक्रियेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी आहे.
या अभ्यासक्रमांतर्गत पाठय़क्रमात शरीररचना विज्ञान आणि शरीरक्रिया विज्ञान, प्राथमिक सूक्ष्मजीव विज्ञान, प्राथमिक औषध विज्ञान, प्रथमोपचार, रोग व त्याची लक्षणे, उपचार, प्रतिरोधक शक्ती, पोषण, स्वास्थ्य, प्रशासन, माता व शिशु आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रम, नगरपालिका अधिनियमांतर्गत आरोग्य विषयक तरतुदी, कुटुंब कल्याण, जन्म-मृत्यू नोंदणी, पर्यावरण संरक्षण, जल शुद्धीकरण, घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालय व्यवस्थापन इत्यादी विषय  विशेष मार्गदर्शनासह शिकवले जातात.
अभ्यासक्रमाचे स्वरूप प्रत्यक्ष ठिकाणांना भेट देऊन निरीक्षण करणे  व अभ्यास करणे असे असते. अशा पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा राष्ट्रीय स्तरावर अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे घेण्यात येते आणि त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छता निरीक्षक पदविका प्रदान करण्यात येते.
करिअर संधी : स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, रुग्णालये व वैद्यकीय शिक्षण संस्था, औषध उत्पादन कारखाने, साखर कारखाने, रेल्वे व हवाई वाहतूक क्षेत्र, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध आहेत. ‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे या अभ्यासक्रमाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे.

अग्निशमन पदविका अभ्यासक्रम
अभ्यासक्रमाचा कालावधी : या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने आहे.
आवश्यक पात्रता : या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत म्हणजेच त्यांचे वजन किमान ५० किलो, उंची १६५ सेंटीमीटर व छाती फुगवून ५.५ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमाचे स्वरूप
अग्निशमन क्षेत्राच्या वाढत्या प्रशिक्षित मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने राष्ट्रीय स्तरावर बडोदा- गुजरात येथे नॅशनल फायर अकादमीची स्थापना केली. अकादमीने केंद्र सरकारच्या गृह-विभागांतर्गत अग्निशमनविषयक सल्ला देणाऱ्या स्थायी समितीच्या शिफारशींनुसार व इन्स्टिटय़ूशन ऑफ फायर इंजिनीअर्सच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम तयार केला आहे.
या विशेष अभ्यासक्रमात प्रामुख्याने ज्वलनाची रासायनिक प्रक्रिया, अग्निचे वर्गीकरण, अग्निशमन वाहन, अग्निशमनामधील महत्त्वाची उपकरणे व साधने, प्रथमोपचार, द्रव विज्ञान, जल परिवहन, स्थायी अग्निशमनविषयक उपक्रमांची हाताळणी व देखभाल, अग्निशमन नियंत्रण कक्ष, आपत्ती प्रसंगी संदेशवहन, सामग्रीचे संरक्षण, अग्निसेवा संघटन, जहाज व बंदरांची निगा, विमानतळ, गोदाम, कोळसा अथवा एलपीजीच्या आगीचे नियंत्रण इत्यादींचा समावेश आहे.
अभ्यासक्रमामध्ये नियमित अग्निशमनविषयक प्रात्यक्षिके व कवायतींव्यतिरिक्त उमेदवारांना
१५ दिवसांचे स्थानिक अग्निशमन दलामध्ये विशेष प्रशिक्षणही दिले जाते. अशा प्रकारे अभ्यास व  प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे अग्निशमनविषयक पदविका प्रदान करण्यात येते.
रोजगार संधी
अग्निशमनविषयक पदविका अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अग्निशमन दल, विविध उद्योग व रासायनिक कंपन्या, विस्फोटक कारखाने, सैन्य दल, जहाज वाहतूक कंपन्या, आयुध निर्माणी कारखाने, रुग्णालये, हॉटेल्स, उत्तुंग इमारती, मॉल इत्यादी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.

रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रशिक्षण केंद्रे राज्यात नागपूर, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक व सोलापूर येथे कार्यरत असून या संदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.aiilsg.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा खालील प्रादेशिक केंद्रांशी संपर्क साधावा.
* अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्था, नागपूर प्रादेशिक केंद्र, जुनी मनपा शाळा, वाल्मिकीनगर, गोकुळपेठ, नागपूर-४४०००३३.
* अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्था, नवी मुंबई प्रादेशिक केंद्र, वायएमसीए जवळ, सेक्टर- ४, सीबीडी- विवेकानंद नगर, बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४.
* अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्था, कोल्हापूर प्रादेशिक केंद्र, राजारामपुरी- पहिली गल्ली, बागल मार्केट,  कोल्हापूर- ४१६००८.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 1:10 am

Web Title: local organization employment programs
टॅग : Employment
Next Stories
1 ऑनलाइन भाषांतरकार
2 इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची प्रादेशिक व ग्रामीण बँकांसाठी अधिकारी व साहाय्यक पदासाठी निवड परीक्षा :
3 शेवटच्या टप्प्यातील तयारी
Just Now!
X