मी बीई (इलेक्ट्रिक), एमबीए हे अभ्यासक्रम पूर्ण केले असून विद्युत कंपनीत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. अर्थशास्त्र विषयासंबंधीचे तसेच माझ्या करिअरला पूरक  अभ्यासक्रम सांगाल का?

रवी पद्म्ो.

तुम्ही अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास नेमका कशासाठी करू इच्छिता ही बाब सुस्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. केवळ आनंदासाठी म्हणून या विषयांचा अभ्यास करायचा असल्यास आपण मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रम करू शकता. नॅशनल पॉवर ट्रेिनग इन्स्टिटय़ूटमार्फत सुरू करण्यात आलेले एमबीए (पॉवर मॅनेजमेंट), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन थर्मल प्लान्ट इंजिनीअिरग, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इंजिनीअर्स कोर्स इन ऑपेरेशन अ‍ॅण्ड मेन्टेनन्स अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन कोर्स हे अभ्यासक्रम उच्च श्रेणीच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकतात.

संपर्क- npti.in/academics

 

मी बीई इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या प्रथम वर्गात शिकत आहे. मला औद्योगिक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. पदवीसोबत औद्योगिक प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम सुचवावा.

शुभम जायभाये

 

तुला नेमके काय करायचे आहे, हे  प्रश्नावरून स्पष्ट होत नाही. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तू एखाद्या उद्योगसमूहात नोकरी करू शकतोस. त्याद्वारे तुझा प्रवेश औद्योगिक क्षेत्रात होऊ शकतो. त्यामुळे सध्या बीई अभ्यासक्रमावरच लक्ष केंद्रित करावे. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नियुक्ती मिळण्यासाठी सर्व सत्रांमध्ये चांगल्या पद्धतीने व प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण झाल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअिरग या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला GATE या परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तुला औद्योगिक क्षेत्रात उच्च श्रेणीच्या संधी मिळू शकतात.

संपर्क- www.nitie.edu

 

मी एरोनॉटिकल इंजिनीअिरग शिकत आहे. मला शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध होतील का?

ममता कुकडे

तू ज्या विषयाचे शिक्षण प्रशिक्षण घेत आहेस त्या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास एअर इंडिया अथवा इंडियन एअरलाइन्समध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याव्यतिरिक्त भारतीय लष्करातसुद्धा संधी मिळू शकते. कम्बाइन्ड डिफेन्स सíव्हस एक्झामिनेशनकडे लक्ष ठेवावे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध नागरी सेवा परीक्षेद्वारे देशस्तरीय नागरी सेवांमध्येसुद्धा तुला करिअर घडवता येऊ शकते.

 

मी मुक्त विद्यापीठाद्वारे बी.कॉम.च्या अंतिम वर्षांत शिकत आहे. मी एमबीए करू शकतो का? त्यासाठीच्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेशप्रक्रियांची माहिती हवी आहे.

जगदीश उन्हाळे

तू जर मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम करत असशील तर तुला एमबीए करता येऊ शकते. तू ज्या मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम करत आहेस त्या विद्यापीठाचेही एमबीए तुला करता येईल किंवा सीईटी- कॉमन एन्ट्रन्स टेस्ट, सीएटी- कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट, एमएटी- मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट या परीक्षा तुला द्याव्या लागतील. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने एमबीए अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही विषयातील पदवीधरास तो करता येतो. त्याला वयाची अट नाही. मात्र पदवी परीक्षेत खुल्या संवर्गातील उमेदवाराला ५० टक्के आणि राखीव संवर्गात ४५ टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या विद्यापीठातर्फे ओपन मॅट ही चाळणी परीक्षा घेतली जाते. संपर्क- स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मदान घारी, नवी दिल्ली. संकेतस्थळ- www.ignou.ac.in

ई-मेल- soms@ignou.ac.in

 

मी सॉफ्टवेअर  क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. नोकरी करतानाच मला व्यवस्थापन शाखेतील अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम शिकायचे आहेत.

– किरण ताटे

तुम्हाला व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमधील सांयकालीन अभ्यासक्रम करता येतील. सध्याच्या संस्थेमार्फतच एक्झिक्युटिव्ह एमबीए अथवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट  या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आला तर बघावे. काही संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना अशी संधी उपलब्ध करून देत असतात. वुई स्कूलने तीन वष्रे कालावधीचा एमबीए इन (फायनान्स/ मार्केटिंग/ ुमन रिसोर्स मॅनेजमेंट/ इन्फम्रेशन मॅनेजमेंट) हा सायंकालीन (संध्याकाळी- साडेसहा ते रात्रौ साडेनऊ) सुरू केला आहे. संपर्क- http://www.welingkar.org/ Programmes/ PartTimeCourseThreeYear  जमनालाल बजाज  इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेने मार्केटिंग, फायनान्स, ुमन रिसोर्स डेव्हलमेंट आणि इन्फम्रेशन मॅनेजमेंट या विषयांत सांयकालीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

संपर्क- www.jbims.edu , के. जे. सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च या संस्थेने हय़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयांत तीन वर्षे कालावधीचा अंशकालीन अभ्यासक्रम सुरू केला आहे.

संपर्क- www.somaiya.edu/simsr

 

मी गणित, सांख्यिकी आणि संगणकशास्त्र या विषयांसह बी.एस्सी.च्या अंतिम वर्षांत शिकत आहे. मला सांख्यिकी विषयामध्ये कोणती सरकारी नोकरी मिळू शकते?

सौरभ वाजपेयी

तुला महाराष्ट्र वित्त सेवामध्ये करिअर करता येऊ शकेल. शासनाला लेखा अधिकारी व तत्सम विषयातील अधिकाऱ्यांची मोठी गरज भासते. राज्य लोकसेवा आयोगाच्यामार्फत ही नियुक्ती केली जाते. एम.एस्सी. केल्यास शासकीय महाविद्यालयांमध्ये अथवा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात तुला अध्यापन क्षेत्रात करिअर करता येऊ शकेल.

 

मी बीसीए पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला असून माझ्यासाठी एमबीए, एमसीए किंवा एमपीएससी यांपकी कुठला अभ्यासक्रम शिकणे अथवा परीक्षा देणे योग्य ठरेल?

विशाल बेदरे

तुला नेमकी आवड आणि गती कशामध्ये आहे यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. एमबीए करण्यासाठी तुला कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट किंवा मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, कॉमन एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागते. उत्तम संस्थेत प्रवेश मिळाला तरच चांगल्या संधी मिळू शकतात, हे लक्षात ठेवावे. एमसीए करण्यासाठीही चाळणी परीक्षा द्यावी लागेल. यातसुद्धा दर्जेदार आणि नामवंत संस्थेत प्रवेश मिळाला तरच तुला उत्तम प्लेसमेंट मिळण्याची शक्यता राहील. एमपीएससी परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक आणि संयमाची परीक्षा घेणारी असते. जागा अत्यल्प आणि परीक्षार्थीची संख्या हजारो पटीने असते. त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेचा कस आणि कसोटी लागते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांमुळे निकालाला विलंब लागतो. विषयांचा परिपूर्ण अभ्यास, संकल्पनांची स्पष्टता, अचुकता, गती, भाषेवर प्रभुत्व असेल आणि या आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असेल तर यश मिळणे कठीण जात नाही. मात्र बहुसंख्य विद्यार्थी इथेच कमी पडतात आणि यशापयशाच्या िहदोळ्याचा अनुभव घेतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. एमपीएससीवर लक्ष केंद्रित करताना पर्यायी योजना तयार असणे केव्हाही उत्तम.

 

मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे.  मी ती देऊ शकतो का?

विशाल मेश्राम

तुला केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त सार्वजनिक बँकेच्या सर्व स्पर्धा परीक्षा तुला देता येतील.

 

मी आता मराठी लघुलेखन ८० शब्द प्रति मिनीट या परीक्षेला बसलो आहे. लघुलेखनाच्या जागा कुठे भरल्या जातात? सरावासाठी कोणते साहित्य वापरावे?

रोहित मुळे

राज्य लोकसेवा आयोगामार्फत शासनासाठी लघुलेखकांची निवड केली जाते. काही मोठय़ा महापालिकांमध्येसुद्धा नियमितरीत्या भरती केली जाते. या संदर्भातील जाहिरातींकडे लक्ष ठेवावे. सरावासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यक्त्यांची भाषणे नोंदवता येतात का याचा प्रयत्न करून बघावा. म्हणजे आपल्या गतीची कल्पना येईल व त्यात सुधारणा करता येईल.

माझा मुलगा यंदा दहावीची परीक्षा देईल. भविष्यात त्याला कॉम्प्युटर इंजिनीअर व्हायचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अ‍ॅनिमेशन आणि डिझाइन यांत स्वारस्य वाटत आहे. दहावी परीक्षा झाल्यावर सुट्टीमध्ये त्याला करता येण्याजोग्या संगणकविषयक अभ्यासक्रमाची माहिती सांगा.

विजय पाटील

मुंबईच्या शासकीय तंत्रनिकेतनात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १२ आठवडे कालावधीचा अभ्यासक्रम ग्राफिक्स, टू डी अथवा थ्रीडी अ‍ॅनिमेशनचा अभ्यासक्रम शिकता येईल. तसेच एरिना अ‍ॅनिमेशन (संपर्क- www.arena-multimedia.com )  व माया अकॅडेमी ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स (सपंर्क- multimedia.com/ www.maacindia.com/short-term-courses .)या संस्थांनीही अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)