उत्तम करिअर सहजतेने घडू शकते का, असा प्रश्न पालकांना आणि पाल्यांना नेहमीच पडत असतो. या प्रश्नाचे उत्तर होय आणि नाही असे दोन्ही आहे. होय अशासाठी की, जर विद्यार्थ्यांला देशातील दर्जेदार शिक्षण संस्थेत (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजिन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, इत्यादी.) प्रवेश मिळाला तर सारेच काही सहज होऊ  शकते. कारण या संस्थांमध्ये उत्कृष्ट अशा प्रयोगशाळा असतात. सुसज्ज असे ग्रंथालय असते. अनुभवी अध्यापक पुरेशा प्रमाणात असतात. बहुतेक संस्थांमध्ये सक्रिय असे प्लेसमेंट सेल असतात. या संस्थांमध्ये मोठय़ा औद्योगिक कंपन्या आणि कॉर्पोरेट हाऊसेस प्लेसमेंटसाठी येतात. त्यामुळे या संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या करिअरला सुयोग्य आणि सुव्यवस्थित अशी दिशा मिळणे सोपे जाते. या संस्थांमधील अभ्यासक्रमांचे शुल्क हे सर्वसामान्य पालकांना परवडणारे असते.

काही संस्थांचे शुल्क अधिक असले तरी त्यासाठी या संस्थाच बँका वा इतर अन्य मार्गाने शैक्षणिक कर्ज अल्प व्याजदराने मिळवून देण्यासाठी साहाय्य करतात. काही संस्था गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलती देतात. शिष्यवृत्ती दिली जाते. भारत सरकारच्या अखत्यारीतील संस्थांमध्ये राखीव जागांचे सूत्र काटेकोरपणे पाळले जाते. व्यवस्थापन कोटा वगैरे पद्धतींचा अवलंब नसतो. निवड प्रक्रिया पारदर्शक असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता जवळपास नसतेच. बहुतेक संस्थांमध्ये वसतिगृहाची सोय असते. मुलींसाठी स्वतंत्ररीत्या राहण्याची व्यवस्था केली जाते.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

या झाल्या सकारात्मक बाबी. नकारात्मक बाब म्हणजे या संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असणारी तीव्र स्पर्धा. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी काही विशिष्ट प्रमाणातच जागा असतात. मात्र इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक जागेमागे किमान हजार पटीने अधिक असते. त्यामुळेच इच्छुक विद्यार्थ्यांचे करिअर सहजरीत्या घडेलच असे नाही.

स्पर्धेला पर्याय नाही

आजच्या काळात स्पर्धेला पर्याय नाही. याद्वारे विद्यार्थ्यांचा कस लागतो. आपली क्षमता जोखता येते. देशातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निवड वा चाळणी परीक्षा घेतली जाते. बहुतेक पालकांना वैद्यकीय, अभियांत्रिकी या क्षेत्रासाठीच घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती असते. नागरी सेवा परीक्षा किंवा बँकांच्या परीक्षा यांची थोडीफार माहिती असते. पण देशातील अनेक राष्ट्रीय, काही काही नामवंत खासगी शैक्षणिक संस्थांमधील डिझाइन, फॅशन तंत्रज्ञान, व्यवस्थापन, योग, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी, पर्यटन, क्रीडा, सैन्यदल, विज्ञान संशोधन, अन्न प्रकिया तंत्रज्ञान, पादत्राणे निर्मिती, नाटय़, अभिनय, दिग्दर्शन इत्यादी क्षेत्रांमधील प्रवेशासाठीही चाळणी/ निवड परीक्षा घेतली जाते, याबद्दल अल्प प्रमाणात माहिती असते.

महाराष्ट्रीय पालकांची अनभिज्ञता

बरेचसे महाराष्ट्रीय पालक याबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे या परीक्षांचा विचार महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये ठळकपणे केला जात नाही. अभियांत्रिकी वा वैद्यकीय क्षेत्रापलीकडेही मोठे जग असून त्यात उत्तमोत्तम संधी मिळू शकतात, याचा विचार प्राधान्याने होत नाही. म्हणूनच अशा परीक्षांकडे दुर्लक्ष होते. त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. कारण सर्व प्रकारे पात्र व गुणवत्तेत तसूभरही कमी नसूनही महाराष्ट्रीय मुले या दर्जेदार संस्थांमध्ये मोठय़ा प्रमाणात निवडली जात नाहीत. याचे मुख्य कारण या परीक्षांविषयी असलेली अनास्था. शाळांमध्येही  अपवादानेच  शिक्षक मंडळी वैद्यकीय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांशिवाय इतर परीक्षांविषयी मार्गदर्शन करीत नसल्याचे सर्वसाधारण चित्र आहे. त्यामुळेच यंदा करिअर वृत्तान्तमध्ये ‘यशाचे प्रवेशद्वार’ या सदरामधून वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांची विस्तृत माहिती दिली जाईल.

अशा परीक्षा, अशी संधी

या माहितीमध्ये परीक्षेचे स्वरूप, परीक्षेतील गुण, अभ्यासक्रम, अभ्यास कसा करावा, परीक्षांचे केंद्र आदी बाबींचे विस्तृत विवेचन राहील. शिवाय या परीक्षांचे वेळापत्रक, कॅम्पसेसची माहिती, अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यास करिअर संधी याचाही आढावा घेतला जाईल. महिन्यातून दोन वेळा ही माहिती दिली जाईल. साधारणत: २४ ते २५ अभ्यासक्रम/ शिक्षण संस्थांचा यात समावेश असेल. यामध्ये बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांसोबतच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचाही विचार केला जाईल. व्यवस्थापन शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या परीक्षा आणि निवड प्रकियांची माहिती दिली जाईल. बँक/रेल्वे वा इतर शासकीय आस्थापनांमधील नियुक्तीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या करिअर नियोजनामध्ये या परीक्षांचा समावेश करण्यासाठी या माहितीचा निश्चितच उपयोग होईल.