व्यावसायिकांसाठी अभ्यासक्रम

  • आयआयएम प्रमाणेच सनदी लेखापाल (सीए) परीक्षा घेणाऱ्या इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) व्यावसायिकांसाठी चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोइंबतूर येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष एच पद्मनाभन यांनी या अभ्यासक्रमांची माहिती दिली. ‘एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा इन बिझिनेस इव्हॅल्युएशन’, ‘सर्टिफिकेट कोर्स इन आर्बिटेशन’, ‘सर्टिफिकेट कोर्स इन जीएसटी’, ‘एक्स्लुझिव एक्झिक्युटिव्ह डिप्लोमा इन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटिंग’ असे चार अभ्यासक्रम आहेत. फेब्रुवारीपासून हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

युनानीमधील पदविका अभ्यासक्रम

  • भारतीय पारंपरिक वैद्यक शास्त्रामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अशा तीन शाखांचा प्रमुख्याने विचार केला जातो. रोगनिदान आणि औषधोपचाराची या प्रत्येक शाखेची स्वतंत्र खुबी आणि पद्धती आहे. युनानी या उपचार पद्धतीतील औषधनिर्मितीचा पदविका अभ्यासक्रम जामिया मिलिया इस्लामिया या केंद्रीय विद्यापीठाने सुरू केला आहे. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीमध्ये ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला आहे. युनानी औषधनिर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या उद्योगांशी विद्यापीठाने करारही केला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमांत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

अद्ययावत ज्ञानासाठी..

  • करिअर निवडल्यानंतरही आपले ज्ञान अद्ययावत करणे, सध्याच्या स्पर्धेच्या युगात महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी इंटरनेट, माध्यमांचा आधार घेता येतो. पण त्याला शिस्तबद्ध अभ्यासक्रमाची जोड मिळाली तर पुढील वाट चोखाळणे अधिक सोपे होऊ शकते. व्यवस्थापन क्षेत्रात करिअर सुरु केलेल्या, काही प्रमाणात कामाचा अनुभव गाठीशी असलेल्यांसाठी आयआयएम रोहतकने पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून पाच वर्षे नोकरी करणाऱ्यांसाठी या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील सध्याच्या घडामोडी, पद्धती, तत्वे यातून शिकता येतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी हा अभ्यासक्रम करता येईल. १६ एप्रिलपासून सुरू होणारा हा अभ्यासक्रम ६२५ तासांचा असणार आहे. त्यासाठी १ मार्चपर्यत ऑनलाईन नोंदणी करायची आहे. मुलाखती घेऊन निवड करण्यात येणार आहे.  अधिक माहिती http://www.iimrohtak.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संकलन – रसिका मुळ्ये