मी मराठीतून बीएस्सी हॉर्टिकल्चरची पदवी मुक्त विद्यापीठाद्वारे मिळवली आहे. पण आमची जमीन नाही. त्यामुळे माझा शेतीशी काही संबंध नाही. मी शेअर मार्केट व म्युच्युअल फंडात दोन वर्षे इन्व्हेस्टमेंट करत आहे. याचे तंत्रशुद्ध शिक्षण देणारे अभ्यासकक्रम कोणते? नोकरीच्या संधी सांगाव्यात. – शिवप्रकाश अंकम

शेअर मार्केट व म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले आहेत, असे तुमचे वाक्य आहे. प्रथम त्या सल्ल्यासाठी कोणाला तुम्ही किती पैसे दिलेत याचा विचार करावा. केवळ कोर्स करून या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळणे खूप अवघड आहे. गुंतवणूक, फायनान्स, टॅक्सेशन या तिन्हीची किमान माहिती व त्यातील पदवी असेल तरच या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. अन्यथा कोणाही पदवीधराला ज्या कारकुनी स्वरूपाची कामे मिळतात तशी कामे मिळत राहतात. तुमची तशी अपेक्षा नसावी. वैयक्तिक आवड व अभ्यास म्हणून करण्याचे एक आठवडा ते सहा महिन्यांचे असे असंख्य अभ्यासक्रम प्रत्येक शहरात उपलब्ध आहेत. अक्षरश: रोज त्यांच्या जाहिराती वाचायला मिळतात, त्यातून तुम्हीच निवड करू शकता.

  • मी बी.ई. मेकॅनिकलच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला वकील वा पत्रकार होण्याची तीव्र इच्छा आहे. या दोन्ही क्षेत्रांसाठी कशा, किती व कुठे संधी उपलब्ध आहेत?  – अर्जुन शोभा नानासाहेब वगैरे

तसे पाहिल्यास पत्रकार होणे, वकील होण्यापेक्षा सोपे व कमी कालावधीचे काम आहे. पण वरवरचे. मी अशा अर्थाने म्हटले की, पत्रकारितेच्या प्रवेशासाठी केली जाणारी प्रक्रिया ही वकिलीच्या प्रवेशासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या तुलनेत कमी खर्चिक आणि सुलभ आहे. परंतु पत्रकाराला जगातल्या घडामोडींची अद्ययावत माहिती ठेवावी लागते. त्याचे काम कधीही संपत नाही. वाचन प्रचंड लागते. त्याचे उपयोजन करण्याची क्षमता लागते.  पत्रकारितेत नोकरीपासून मुक्त पत्रकारितेपर्यंत विविध रस्ते आहेत. मात्र मेकॅनिकल इंजिनीअर झालेल्या एखाद्याला त्यात जास्त संधी आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरावे. तीव्र इच्छा हा तुझाच शब्द त्यासाठी नीट तपासणे गरजेचे आहे. वकील होण्यासाठी तीन वर्षांची पदवी घेऊन त्यात सुमारे पंचवीस प्रकारची विविध कामे तू करू शकतोस. त्याची यादी इथे देण्यापेक्षा एखादा जाणकार वकील तुला त्याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतो. मात्र पेटंट या क्षेत्रात सल्लागार वा कामाला सुरुवात करण्यासाठी हा रस्ता वेगळा ठरू शकतो. वर उल्लेख केलेल्या दोन्ही रस्त्यांचे केवळ प्रशिक्षण घेताना, पदव्या मिळवताना जो कालावधी जाईल त्यानंतर मेकॅनिकल क्षेत्रात पुन्हा प्रवेश अशक्य असेल याची मात्र जरूर दखल घ्यावीस.

  • मी एम.ए. भूगोल करत आहे. मला करिअरसाठी पुढे कुठल्या संधी आहेत? – विपुल जाधव

भूगोलाची मनापासून आवड असेल व उत्तम मार्क आजवर मिळत असतील तर भूगोल या विषयात चांगल्या संधी आहेत. त्याला कॉम्प्युटरचा वापर व इंग्रजीची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे. जिओइन्फॉर्मॅटिक्स या विषयात प्रशिक्षण देणाऱ्या अनेक नामवंत संस्था आहेत. सिम्बायोसिस हे एक प्रातिनिधिक नाव आहे. हवामानशास्त्र, मेडिकल जिओग्राफी ही वेगळी क्षेत्रे वाढत आहेत. समुद्री अभ्यासासाठी तीव्र स्पर्धा व मोजक्या जागा गोवा येथील संस्थेत उपलब्ध आहेत. अन्यथा बी.एड. करून माध्यमिक वा उच्च माध्यमिक स्तरावर शिकवणे हा पर्याय आहे. त्यात स्थिर नोकरीची शक्यता कमी.