13 December 2018

News Flash

करिअर मंत्र

मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांला शिकत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

  • मी बी.कॉम.च्या पहिल्या वर्षांला शिकत आहे. सी.एस., फाऊंडेशनचा अभ्यास करत आहे. सी.एस. झाल्यानंतरच्या जॉबच्या संधी काय असतात? कोणत्या राज्यातून ही परीक्षा देणे सोयीचे असते? – वैष्णवी

केंद्रीय स्वायत्त संस्थेतर्फे सी.एस.च्या परीक्षा व नोंदणी ही प्रक्रिया होत असते. कोणत्याही राज्यातून, शहरातून तिचा अभ्यास व परीक्षा देणे शक्य आहे. सी.एस.नंतर जॉबच्या संधी छोटय़ा कंपन्यांत कंपनी सेक्रेटरीला मदत करणे किंवा अशा अगदी छोटय़ा कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम करणे यातून सुरू होते. अनुभवानुसार प्रगती होते. मात्र सी.एस.च्या शिक्षणक्रमातील पन्नास टक्के भाग हा विविध प्रकारच्या अकाऊंट्स मॅनेजमेंट व प्रशासकीय विषयांशी संबंधित असल्याने तत्सम क्षेत्रांतील नोकऱ्या जास्त सुलभतेने मिळतात. मात्र त्यात काम करण्याची तयारी असेल तरच! मागणीचे प्रमाण व पुरवठा यात बरीच तफावत असल्याने गेली काही वर्षे सी.एस.नंतर उत्कृष्ट अ‍ॅकॅडेमिक्स असेल तरच चांगल्या संधी मिळत आहेत, इतरांना वर उल्लेखलेल्या क्षेत्रात पुरेशी मागणी आहे, हेही नक्की. मुद्दाम या वास्तवाचा उल्लेख केला आहे.

  • मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांला शिकत आहे. त्यानंतर मिळू शकणाऱ्या तांत्रिकी क्षेत्रातील सरकारी नोकऱ्यांविषयी माहिती द्याल का? मला इंडियन इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसची परीक्षा देण्याचीही इच्छा आहे. त्यातील संधी, फायदे, तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करावे. – समीर, पिंपरी-चिंचवड

मेकॅनिकल इंजिनीअरसाठी (किंवा खरे तर कोणत्याही इंजिनीअरसाठी) डिझाईन, प्रॉडक्शन टेस्टिंग, क्वालिटी, मार्केटिंग, सेल्स यातील मॅनेजर म्हणून नोकऱ्या उपलब्ध आहेत. सरकारी नोकऱ्यांची शक्यता व उपलब्धता अत्यल्प आहे. मात्र इंडियन इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसच्या वा रेल्वेच्या परीक्षा देऊन दरवर्षी मोठय़ा संख्येने इंजिनीअर निवडले जातात. तसेच शेवटच्या वर्षांपासून गेटची परीक्षा देऊन चांगल्या (व्हॅलिड गेट स्कोअर) मार्काने उत्तीर्ण झाल्यास विविध सरकारी नवरत्न कंपन्यांत निवड होऊ शकते. ओएनजीसी, एनटीपीसी, भेल इ.चा त्यात समावेश आहे. या तीनही प्रकारांसाठी एकाच वाक्यात तयारीबद्दल सांगता येते. इयत्ता बारावी ते बी.ई. या दरम्यान असलेल्या अभ्यासावर आधारित या परीक्षा असतात. ती सवय विद्यार्थ्यांना नसल्याने त्या अवघड वाटतात. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्यास यश मिळेल.

  • मी सध्या १२ वी सायन्सला शिकत आहे. मला आय.ए.एस. बनायचे आहे. कोणत्या शाखेतून पदवी घ्यावी? त्यासाठी टक्केवारीची अट आहे काय? कोणत्या संस्थेत प्रवेश घ्यावा? पुस्तकांची नावे सांगा. – संदीप खुटाळे

‘लोकसत्ता’मध्ये स्पर्धा परीक्षाविषयक विस्तृत लेखमाला ‘करिअर वृत्तांत’ या पानावरच चालू असते. सर्वप्रथम ती नीट समजून घेऊन वाचायला सुरुवात करावी. तोवर बारावी सायन्सला सत्तर टक्के वा जास्त मार्क मिळावेत म्हणून प्रयत्न जोराने सुरू करावेत. कोणत्याही शाखेतून पदवी घेऊन तुला यूपीएससीची परीक्षा देता येत असली तरीही त्यातून यश न मिळाल्यास आयुष्याला नेमके वळण देणारी पदवी घेणे हा एक उत्तम रस्ता तुला बारावीत सत्तर टक्के मार्क मिळाल्यास निवडता येईल. आयएएससाठी निवडले जाणारे (किंवा यूपीएससीत यश मिळवणारे) सुमारे तीन लाखांतून फार तर हजारभर विद्यार्थी असतात. उत्तमता हा शब्द महत्त्वाचा, टक्केवारी नव्हे.

First Published on March 2, 2018 1:36 am

Web Title: loksatta career mantra 14