मी सध्या बी.ए. दुसऱ्या वर्षांला आहे. मला राज्य कर निरीक्षक (एसटीआय) व राज्य सेवा आयोग परीक्षांची तयारी करायची आहे. पहिल्यांदा मी कशाची तयारी करू?   – मंगेश खांडेभराड

मंगेश, ‘पहिल्यांदा मी कशाची तयारी करू?’ या प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात. त्याचे उत्तर म्हणजे बी.ए.चा अभ्यास डिस्टिंक्शन मिळवून पास होण्याइतका गरजेचा, निकडीचा, महत्त्वाचा आहे. तो करून रोज एक तास स्पर्धा परीक्षांसाठी पूर्वपरीक्षेची तयारी करणे उपयुक्त ठरेल. सध्या बी.ए. दुसरे वर्ष चालू आहे याचा अर्थ तुझ्या हाती पदवी मिळेपर्यंत ४०० तासांचे पूर्वपरीक्षेसाठीचे वाचन लागलेले असेल.

खरे सांगायचे तर बी.ए.च्या अभ्यासातून कंटाळा आल्यावर बदल, विरंगुळा असा या वाचनाचा उपयोग तुला करून घ्यावा वाटणे महत्त्वाचे ठरावे. असंख्य विषयांची बारीकसारीक माहिती पूर्वपरीक्षेला गरजेची असते, तिचा अभ्यास, पाठांतर करणारे त्यातील आनंद घालवून बसतात. तो आनंद तुला ज्या क्षणी मिळतो आहे असे जाणवेल, त्यानंतरच स्पर्धा परीक्षांची खरी तयारी सुरू झाली, असे समजायला हरकत नाही.

या उलट कर निरीक्षकाच्या जागा, राज्य सेवा आयोगातील पदे यांची स्वप्ने पाहण्यातच पदवीचा अभ्यास दूर राहतो. हाती सामान्य मार्काची पदवी पडते. स्पर्धा परीक्षांत दुर्दैवाने यश मिळाले नाही तर हीच पदवी आपल्याला आयुष्यभर उपयुक्त राहणार असते, हे सत्य कटू असले तरी नीट लक्षात ठेवावेस.

अनेकांचे प्रश्न या संदर्भात येत असतात, मात्र ‘लोकसत्ता’ करीअर वृत्तान्त व यूपीएससीची तयारी ही सदरे नीट वाचून मग प्रश्न विचारणारा मात्र क्वचितच असतो. दोन्हीचे नियमित वाचन करणे हीसुद्धा तुझी एक उपयुक्त तयारीच असेल. त्यासाठी तुला शुभेच्छा!