|| डॉ. श्रीराम गीत

  • मी मुक्त विद्यापीठातून पूर्वतयारी अभ्यासक्रमानंतर थेट बीएला प्रवेश घेतला. बी.ए. पूर्ण झाले आहे. नोकरीसाठी अर्ज केल्यावर मला बारावीचे गुण विचारले जातात. तिथे मी कोणते गुण लिहावेत? – कृष्णा सहाने

आपण जर पदवीधर आहात, तर बारावी पाससाठीच्या नोकरीला अर्ज करणे थांबवावे. पदवीनंतरची कौशल्ये म्हणजे संवाद, कॉम्प्युटरवापर, इंग्रजी लिखाण वाढवा व नोकरी शोधा.

  • शेफ या करिअरविषयी थोडी माहिती हवी होती. – शरू खोपकर
  • मी बारावीची परीक्षा दिली आहे. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे. माझ्या भविष्यासाठी हे योग्य आहे का? पुढे काय संधी आहेत? कोणत्या कॉलेजमधून पूर्ण करावे? – प्रतीक पाटील

शेफ अर्थात बल्लवाचार्य होण्यासंबंधीचे हे दोन्ही प्रश्न शरु आणि प्रतीक यांनी विचारले आहेत. मला आपणा दोघांना विचारायचे आहे की, ‘लोकसत्ता’तर्फे घेतलेल्या करिअर कार्यक्रमांच्या संदर्भात हा विषय उत्तम पद्धतीत समजावून सांगणारे तज्ज्ञ आले होते. त्याच्या बातम्या तरी वाचल्या काय? मागील आठवडय़ात त्याचा संपूर्ण वृत्तांतही आलेला होता. त्यावर नजर टाकली का?

हॉटेल मॅनेजमेंटचा चार वर्षांचा पदवीचा किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. काम करू इच्छिणारा कोणताही पदवीधर या क्षेत्रात बेकार राहात नाही. कॉलेजची निवड ही एकत्रित सीईटीमधून होते.

ती यंदाची झाली आहे. तुमच्या गावातील संस्थेतही डिप्लोमाला प्रवेश घेणे शक्य आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर उमेदवारी संपते, तेव्हा ‘शेफ’ची करिअरची सुरुवात होते. त्यामध्ये कलिनरी कोर्सेस करून कौशल्ये वाढवता येतात. मात्र मुळात स्वयंपाक या विषयात प्रचंड आवड आणि जोडीला कष्टांची तयारी असल्याशिवाय शेफचा रस्ता नको.