|| डॉ. श्रीराम गीत

  • मी यंदा बी.ए.ची परीक्षा दिली आहे. इंग्रजी विषय आहे. एनसीसी सर्टिफिकेट उत्तीर्ण झालो आहे. वय २१ आहे. लॉ किंवा मास्टर्स इन सोशल वर्कला प्रवेश घेण्याचा विचार आहे. माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार मला कोणत्या संधी असतील? पुढचे शिक्षण कोणते घ्यावे? – अक्रम रुकसाना दिलबर मणेर

आपण गुणांची टक्केवारी दिलेली नाहीत, म्हणून मोघमात सांगायचे झाल्यास, एमएसडब्ल्यू करून एनजीओद्वारे काम व नोकरी नक्की मिळेल. कदाचित सरकारी क्षेत्रात शिरकाव होऊ शकतो. लॉनंतर प्रॅक्टिस सुरू होण्याचा कालावधी मोठा राहतो. शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनसाठीचा रस्ता सी सर्टिफिकेटद्वारे उपयुक्त ठरू शकतो.

त्याचाही विचार करावा. निमलष्करी दलात नोकरीचा प्रयत्न करणेही शक्य आहेच. त्याचाही विचार करावा.

  • मी स्टॅटिस्टिक्समध्ये बी.एस्सी. केले आहे. मला मास्टर्स करायचे आहे. त्यासाठी कोणते विद्यापीठ चांगले आहे? मास्टर्सनंतर कशाप्रकारे वाव राहील? – मानसी निलंगीकर

आपल्या गुणांचा कोणताच उल्लेख नाही. मास्टर्ससाठी तीव्र स्पर्धा असते व प्रवेश परीक्षा घेऊनच प्रत्येक विद्यापीठ प्रवेश देते. सर्वात उत्तम संस्था ‘इंडियन स्टॅटिस्टिक्स इन्स्टिटय़ूट, कलकत्ता’ आहे. नंतर संशोधन संस्थांत संख्याशास्त्रीय विश्लेषक म्हणून काम सुरू होते.

  • मी यंदा बारावीची परीक्षा दिली आहे. मला फोटोग्राफीची आवड आहे व त्यातच करिअर करायची इच्छा आहे. त्यासाठी पदवी अभ्यासक्रम कोणता व संधी कोणत्या मिळतील?  – अक्षज

फिल्म अँड व्हिडीओ, फोटोग्राफी किंवा बॅचलर्स इन मास कॉम हा अभ्यासक्रम करून मग सिनेमॅटोग्राफी असे अभ्यासक्रम विविध खासगी विद्यापीठात उपलब्ध आहेत. त्यानंतर उमेदवारीमध्ये चार-पाच वर्षे जातातच. हमखास संधी कोणीच सांगू शकत नाही. स्वत:च्या कौशल्यावर संधी मिळते. नीट विचार करावा आणि निर्णय घ्यावा.