|| डॉ. श्रीराम गीत

माझी बारावी झाली आहे. आयात-निर्यात क्षेत्रात मला रस आहे. ते शिकवणारा शासकीय अभ्यासक्रम कोणता? तसा नसेल तर या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल?   – प्रसाद चकोर

आयात-निर्यात क्षेत्र म्हणजे परदेशगमन नव्हे, परदेशी कंपनीत नोकरी नव्हे. अनेकजण हा एक फार मोठा भ्रम घेऊन इंपोर्ट-एक्स्पोर्टच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. त्यांना सहसा इंपोर्ट-एक्स्पोर्ट करणाऱ्या क्लिअरिंग अ‍ॅण्ड फॉरवर्डिग (सी अ‍ॅण्ड एफ) कंपनीत कारकुनाची नोकरी मिळते. अशा शंभरातील एखादाच नंतर एमबीए करून प्रगती करू शकतो. त्या क्षेत्रात तुला रस आहे म्हणजे काय, याचा जरा नीट विचार करावास.

बॅचलर्स इन फॉरेन ट्रेड वा इंटरनॅशनल बिझनेस या नावाने असंख्य कॉलेजात पदवी अभ्यासक्रम चालतो. त्यातील अनेक जागा गेली काही वर्षे रिकाम्याही राहातात. प्रथम पदवी, नंतर कामाची उमेदवारी किमान पाच वर्षे व नंतर यशाची चव असा रस्ता तुझ्यासाठी वाट पाहात आहे.

मी दहावीनंतर सायन्सला प्रवेश घेतला. २०१४ मध्ये बारावी झालो. नंतर फिटरचा आयटीआय कोर्स पूर्ण केला. त्यानंतर स्पर्धा परीक्षा द्यायच्या म्हणून मुक्त विद्यापीठाला बी.ए.ला प्रवेश घेतला. सध्या दुसऱ्या वर्षांला आहे. दरम्यान काहीच अभ्यास झालेला नाही. आता बी.ए.ची परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा एकदम आल्या आहेत. काय करावे कळत नाही. खूप ताण आला आहे. शिक्षण घ्यावे वाटते पण पैशांचीही गरज आहे. मी आर्थिकदृष्टय़ा अतिशय गरीब घरातील आहे. सध्या वय २१ आहे. मी काय करू?    – अंकुश बोरीकर

अंकुश, तुझ्या नावाप्रमाणेच तुझ्या भरकटणाऱ्या विचारांवर प्रथम अंकुश लावणे गरजेचे आहे. मुक्त विद्यापीठ बी.ए. करताना फिटरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळणारे काम स्वीकारले असतेस तर? काम करताना रोज रात्री तासभर अभ्यास करून बी.ए.ला फर्स्ट क्लास सहज शक्य होता ना? बारावी सायन्स झाला आहेस म्हणून मी हे लिहीत आहे. ‘वयाच्या एकविसाव्या वर्षी कमावणारा’ म्हणून तुझ्याकडे आत्मविश्वास नक्कीच असता ज्याचे आज ताणात रूपांतर झाले आहे. रेल्वे भरतीला प्राधान्य दे, बी.ए. झालास तरी त्याचा लगेच कोणताही उपयोग नाही. सवडीने वय ३७ पर्यंत स्पर्धा परीक्षा देऊ शकतोस. सध्या गरज आहे ती उत्पन्न मिळवण्याची, काम करण्याची.

मी यंदा बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण करेन. मला नेटवर्किंग किंवा बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये एम.एस. करायचे आहे. त्यानंतर ग्लोबली कसा वाव राहील? कोणता देश त्यासाठी योग्य राहील?   – यश नाराळे

खऱ्या अर्थाने नेटवर्किंगसंदर्भात तीन एक वर्षांचा अनुभव घेतल्याशिवाय वाव, प्रगती, पॅकेज वगैरेपैकी कोणतीच गोष्ट सुरू होत नाही हे एक वास्तव लक्षात घ्यावेस. त्यासाठी माझ्या मते, भारतात आधी साधारण ३  वर्षांचा अनुभव तू घ्यावास. त्यानंतर मास्टर्ससाठी अमेरिका गाठणे रास्त ठरेल. पण नेटवर्किंगसाठी अमेरिकेत निव्वळ मास्टर्स पूर्ण केले म्हणजे तिथे राहण्याचा अथवा नोकरी करण्याचा परवाना मिळतो हे ध्यानात घे. परवाना म्हणजे नोकरी किंवा संधी नव्हे. म्हणजेच अमेरिकेत मास्टर्स केले याचा अर्थ तिथे नोकरी मिळालीच असा नाही.   बायोमेडिकलसाठी बारावीच्या बायोलॉजीचे वाचन किमान गरजेचे राहील. तुझा तो विषय नसल्यास ते नकोसे वाटू शकते. बायोमेडिकलमध्ये फार कमी कंपन्या उत्पादन क्षेत्रात काम करतात. त्यात शिरकाव करण्यासाठी उत्कृष्ट शैक्षणिक पाश्र्वभूमी गरजेची असते. तुझ्या ग्लोबल शब्दाचा ‘लोकसत्ता’च्या अनेक वाचकांसाठी खरा अर्थ मुद्दाम सांगत आहे. जागतिक दर्जाच्या रिअल एमएनसीची जीआयसी म्हणजेच ग्लोबल इन्क्युलेशन सेंटर्स (रिसर्चची केंद्रे) भारतातच आहेत. मात्र समजा हजारभर तज्ज्ञ तिथे असतील तर त्यात उत्तम विद्यापीठाचे डॉक्टरेट झालेले किमान चारशे जण त्यात काम करतात. या सगळ्याचा नीट विचार कर, सध्या अभ्यास कर.