|| डॉ. श्रीराम गीत

मी बी.ए. करीत आहे. मला ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करायचे आहे. मी कोणता अभ्यासक्रम निवडू? नोकरी वा रोजगाराच्या कोणत्या  संधी उपलब्ध आहेत?  – रोहित शिरसाठ, मालेगाव

सध्या भारतातल्या प्रत्येक शहरात, काही गावांतही ग्राफिक डिझाईनचे बेसिक कोर्स शिकवणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांचे शुल्क ३० हजार ते एक लाख ३० हजार यादरम्यान आहेत. पदवीदरम्यान बेसिक कोर्स करून पाहावा. जमतो आहे असे वाटले तर पुढचा टप्पा योग्य राहतो. अनेक नामवंत  संस्थांचे जाळे सर्वत्र आहे. निर्णय चौकशी करून घ्यावा. कोर्स केला की नोकरी मिळतेच हे मनातून काढावे. चांगल्या डिझाईनरलाच नोकरी मिळते, हे लक्षात ठेवा.

मी सध्या पीसीएमबी घेऊन बारावीला आहे. मला नंतर डी.फार्मा किंवा इंजिनीअरिंग करायचे आहे. काय करावे?   – नामदेव शिंदे

बारावी सायन्सला किमान ६० टक्के हे ध्येय ठेवून नंतर इंजिनीअरिंग व फार्माची सीईटी देणे गरजेचे आहे. त्यातील मार्कानुसार प्रवेशाची यादी बनते. गणित आवडत असेल तर इंजिनीअरिंग, अन्यथा फार्माचा रस्ता असा साधा निर्णय आहे.

मी एमए इंग्रजीच्या प्रथम वर्षांत शिकत आहे. मला खेळाची आवड आहे. मंत्रालयात पत्रकार म्हणून कार्य करावे असे वाटते. मार्ग दाखवावा.   – हमीद सय्यद

‘मंत्रालयात पत्रकार’ असा काही प्रकार नसतो. प्रत्येक वृत्तपत्राचा एखादा वार्ताहर त्यासाठी काही काळाकरिता नेमला जातो. सहसा तो बऱ्यापैकी अनुभवी म्हणजेच दहा-बारा वर्षे काम केलेला असतो. सरकारी नोकरीतील पत्रकार प्रथम अनेक वर्षे जिल्हा केंद्रात काम करीत असतात.

आपण प्रथम पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घ्यावीत. त्यादरम्यान या साऱ्याची रीतसर माहिती आपल्याला मिळेलच. त्यासाठी प्रवेश परीक्षा असते, तिची तयारी एमए करताना आपण सहज करू शकता.