|| डॉ. श्रीराम गीत

  • आपले सदर मी नियमित वाचतो. मी इयत्ता ९ वीत आहे. मला रोबोटिक्स इंजिनीअर व्हायचे आहे. मी काय करू? – यशराज संजय इंगळे

दहावीत व इयत्ता दहावीनंतर सतत ८० टक्के मार्क मिळवून १२ वी सायन्स पीसीएम घेऊन पूर्ण करावेस. त्यानंतर हा अभ्यासक्रम सुरू होतो. गणित हा विषय उत्तमरीत्या आत्मसात करणे यावर सध्या लक्ष दे. केवळ रोबो म्हणजे काहीतरी भारी, वेगळे अशा कोणत्या नुसत्याच वाटण्यामुळे तर तुला रोबोटिक्स करायचे नाही ना, यावर जरूर विचार कर.

  • मी सध्या एसवायबीएला शिकत आहे. मला प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा करावयाचा आहे. त्यासाठी कुठले कॉलेज, कोर्स व संधी उपलब्ध आहेत? – रोहित शिरसाठ, मालेगाव

इयत्ता दहावीनंतर पुण्याच्या पीव्हीजी या संस्थेद्वारे हा डिप्लोमा चालवला जातो. त्यासाठीचे तुझे शिक्षण व वय यांचा सध्याचा विचार करता तो फारसा उपयुक्त राहणार नाही, असे वाटते. त्याऐवजी डीटीपी- डेस्क टॉप पब्लिशिंगचा परिपूर्ण कोर्स बी.ए.सोबत पूर्ण केला तर व्यवसायाच्या विविध संधी किंवा नोकरी मिळू शकेल हे नक्की. हे सारे मालेगाव, नाशिक येथेही खासगीरीत्या उपलब्ध आहे.

  • मी १२ वी सायन्सला आहे. मला परदेशात जाऊन मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स करायचे आहे. शिष्यवृत्ती घेऊन ते करण्यासाठी मला काय करावे लागेल? – सुनील खोत

प्रथम उत्तम गुणांसह पदवी मिळवणे त्यासाठी गरजेचे आहे. ती कोणत्याही क्षेत्रातील चालेल. मात्र १२ वीनंतर किमान चार वर्षांचे शिक्षण आवश्यक असते. ते नसेल म्हणजे बीएस्सी केले तर पदव्युत्तर पदवी आवश्यक ठरेल. इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आदी पदव्यांचा कालावधी चार वर्षे असतो. त्यानंतर किमान दोन वर्षांचा प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव महत्त्वाचा आहे. त्यानंतर किंवा त्याबरोबर जीमॅट व टोफेल या परीक्षा देणे गरजेचे असते. या परीक्षांमधील उत्कृष्ट गुण मिळाले असतील तरच शिष्यवृत्ती किंवा पाठय़वृत्ती हा शब्द सुरू होतो. अन्यथा परदेशात एम.बी.ए. करण्याचा खर्च सहजपणे एक कोटी रुपये ओलांडून पुढे जातो. हे आकडे आहेत २०१९ चे. तुला तर अजून सहा-सात वर्षे वाट पाहायची आहे ना? सध्या चांगल्या मार्कानी १२ वी सायन्स संपवून उत्तम कॉलेजात इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवणे यावर लक्ष केंद्रित करावेस, त्यासाठी शुभेच्छा.

  • माझे बी.ए. झाले आहे. इंडियन आर्मीमध्ये पदवीच्या आधारावर कुठे भरती होता येते? माहिती द्यावी. – प्रतीक पडोळे

तुझे वय २१ ते २३ च्या दरम्यान असेल तर अधिकारी पदासाठी प्रयत्न करणे शक्य आहे. अन्यथा नाही. त्यासाठी  http://www.joinindianarmy.nic.in वर माहिती मिळेल.