मी कोल्हापूर विद्यापीठातून २०१६ साली ७१ टक्के गुणांसह बी.फार्मसी केले आहे. तर मी एमपीएससी किंवा यूपीएससीच्या कोणत्या परीक्षा द्यायला पात्र आहे? यामध्ये नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?  – मयूर बनकर, सातारा

तुम्ही संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा देऊन देशस्तरीय १७ ते १८ महत्त्वाच्या नागरी सेवांमध्ये उच्च पदे मिळवू शकता. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, विदेश सेवा, राजस्व सेवा, वनसेवा, पोस्टल सेवा आदींचा समावेश आहे. कम्बाइन्ड डिफेन्स एक्झामिनेशन देऊन इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी/ ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळवू शकता. जर तुम्ही बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेतले असाल तर एअर फोर्स अ‍ॅकॅडेमीच्या निवडीसाठी पात्र ठरू शकता. स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देऊन केंद्र शासनाच्या विविध विभागांतील निम्नस्तरीय पदांसाठी पात्र ठरू शकता. राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा, विक्रीकर निरीक्षक परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, राज्य वन सेवा परीक्षा देऊ  शकता.

 

  • मी बी.कॉमचा विद्यार्थी आहे. मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे. मी यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी करीत आहे. वाणिज्य शाखेत मला फारसा रस नाही, पण या शाखेचा अभ्यासक्रम करीत असल्याने मला भविष्यात त्याचा उपयोग होईल का? त्यावर मी लक्ष केंद्रित करू की नको? नागरी सेवा परीक्षेची मी तयारी कशी करू? -अमोल कारके

वाणिज्य शाखा ही नेहमीच उत्तम करिअर घडवणारी शाखा समजली जाते. त्यामुळे तुम्ही या शाखेचा मनापासून अभ्यास केल्यास व त्यात प्रावीण्य मिळवल्यास विविध प्रकारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी कोणत्याही विषयातील पदवी ही आवश्यक अर्हता आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेतील पदवी मिळवल्यावर तुम्ही या परीक्षेला बसण्यासाठी पात्र ठरू शकता. मात्र सद्य:स्थितीत या शाखेच्या अभ्यासक्रमावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा प्लॅन बी तयार होईल. नागरी सेवा परीक्षेसाठी देशभरातून सहा ते सात लाख विद्यार्थी दरवर्षी बसतात. त्यातून अवघ्या अकराशे किंवा बाराशे उमेदवारांची निवड होते. ही प्रचंड स्पर्धा लक्षात घेता प्लॅन बी तयार असणे गरजेचे आहे. अन्यथा नैराश्य येऊ  शकते. नागरी सेवा परीक्षेची तयारी करताना सध्या तुम्ही प्राथमिक परीक्षेवर भर द्या. ही परीक्षा सीसॅट- सिव्हिल सव्‍‌र्हिस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट या नावाने ओळखली जाते. यामध्ये सामान्य अध्ययन आणि सामान्य क्षमता चाचणी असे दोन पेपर्स द्यावे लागतात. सामान्य अध्ययनच्या पेपरमध्ये चालू घडामोडी, भारताचा इतिहास, भारत आणि जगाचा भूगोल, भारतीय राजकीय व्यवस्था आणि सुशासन, आर्थिक आणि सामाजिक विकास, पर्यावरणाशी संबंधित सर्वसामान्य मुद्दे, विज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात. सामान्य क्षमता चाचणीच्या पेपरमध्ये उताऱ्यावरील प्रश्न, संवादकौशल्य, विश्लेषण आणि कार्यकारणभाव क्षमता, निर्णयक्षमता आणि समस्यांचे निराकारण, वर्ग दहावीच्या स्तरावरील गणितीय प्रश्न, माहिती विश्लेषण, इंग्रजी यावर प्रश्न विचारले जातात. यासाठी एनसीईआरटीची पुस्तके, भारत वार्षिकी, दर्जेदार वृत्तपत्रांचे वाचन व नोंदी यासाठी दररोजचा काही वेळ काढून ठेवायला हवा.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com    या पत्त्यावर पाठवा.)