|| डॉ. श्रीराम गीत

मी १९९५ साली दहावी झालो, तर २०१८मध्ये कलाशाखेतून बारावी (६२ टक्के) झालो आहे. मला आता मुक्त विद्यापीठातून बीए करायचे आहे. मला पुढच्या दहा वर्षांत गावी जाऊन जुन्नर येथे वकिली करायची आहे. त्यासाठी लागणारा सर्व अभ्यास करायची माझी तयारी आहे. मी पुढे काय करावे?   – मृगेश माळी

आपण १९९५ साली दहावी झाला आहात, त्यामुळे आपले वय सध्या ४०च्या आसपास असावे. सर्व अभ्यास करून वकिलीचे शिक्षण घेण्यात आणि कायद्याचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मला कोणतीच अडचण वाटत नाही. मात्र सध्या आपण नोकरी करत असल्यास तिच्या वेळा सांभाळून कॉलेजात नोंदणी करणे, इतकीच अडचण आपल्याला सोडवावी

लागेल. वकिली सुरू करण्यात व तहहयात चालू ठेवण्यात वयाची अडचण वा अडथळा येत नाही. शिकण्याच्या या तीव्र इच्छेबाबत आपले विशेष अभिनंदन.

मी २० वर्षांचा आहे. मला कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करायचे आहे. पहिल्या वर्षांला अडकलो आहे. घरच्यांचा आग्रह इंजिनीअरिंग करावे असा आहे. मला एमबीए (फायनान्स घेऊन) आयआयएम किंवा परदेशी विद्यापीठात करावे असे वाटत आहे. माझी १२ वी ६३ टक्के घेऊन झाली. मला कायद्याच्या अभ्यासक्रमातही रस वाटतो आहे. मी पहिल्यांदा कोणती पदवी घ्यावी? ज्यातून मला पुढचा रस्ता सापडेल?    – एम. शिवराज

शिवराज तुझ्यासाठी उत्तम मॅनेजमेंट संस्थांचे दरवाजे तुझ्या हातानेच तू बंद करून घेतलेले आहेस. उत्कृष्ट शैक्षणिक आलेख असेल तरच त्या संस्थांत कसाबसा प्रवेश मिळतो, हे मी आवर्जून नमूद करत आहे. इंजिनीअरिंगमध्ये अडकलो असे वाटत असेल तर कायद्याच्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा देऊन ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करायला अडचण कसलीच नाही. मात्र तो अभ्यासक्रम कसा आहे, पुस्तके कोणती आहेत हे पाहून निर्णय घ्यावा.

‘लोकसत्ता’ वाचकांसाठी मुद्दाम माहिती देत आहे. इंजिनीअरिंग व लॉ या दोन्ही अभ्यासक्रमांतील दरवर्षी सर्व विषय नीट पास होणाऱ्यांची टक्केवारी सारखीच आहे. जेमतेम ३० टक्के एवढीच. त्यामुळे कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना त्याची पुस्तके नीट चाळा आणि मुळात तो अभ्यासक्रम आपल्याला का करायचा आहे, याची खरीखुरी उत्तरे शोधा.

माझे २०१५ मध्ये बीएस्सी झाले. मला आता लॉ करायचे आहे. पदवीला ५८ टक्के होते. बारावीत ४१ टक्के होते. सध्या वय २५ आहे. मी काय करावे?  – इंद्रजीत चव्हाण

वाट कशाची पाहतोयस इंद्रजीत? यंदा प्रवेश मिळू शकतो व तीन वर्षांनी लॉची पदवी मिळू शकेल.

गरज फक्त घरच्यांच्या पाठबळाची आहे. कारण तुझ्या आजवरच्या मार्कानुसार लगेचच फार चांगली नोकरी हाती असेल असे मला वाटत नाही. कदाचित ती नोकरी करताना लॉ शक्य आहे काय याचाही विचार करावास.