डॉ. श्रीराम गीत

  • माझ्या मुलीने बारावी सायन्सची परीक्षा दिली आहे. तिला वकिली करायची आहे. हे क्षेत्र मुलींसाठी चांगले आहे काय? त्यासाठी सीईटी आहे काय? कोणते कॉलेज चांगले? आता कोणता अभ्यास करावा? – केदार

बारावीनंतर कायद्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची सीईटी असते. संपूर्ण देशभरातील प्रवेशासाठी सीएलएटी (क्लॅट) असते. त्यातील मार्कानुसार कॉलेज मिळते. आता सायन्समधून लॉचा प्रवेश होत असल्याने राज्यशास्त्र, समाजशास्त्र व सामान्य वाचन यांचा अकरावी, बारावीचा अभ्यास गरजेचा आहे. वकिलीमध्ये अनेक शाखा आहेत. त्यातील फॅमिली कोर्ट यासारख्या शाखेत स्त्रिया उत्तम काम करत आहेत. अर्थातच अन्य शाखांतही त्यांना वाव आहे. हे क्षेत्र मुलींसाठी वाईट नाही. खरे तर आपण सचोटीने काम केले तर कोणतेच क्षेत्र कोणाचसाठी वाईट नसते, हे लक्षात घ्या.

 

  • मी बीएस्सी करून पीजीडीएमएस व पीजीडीएफटी केले. सध्या मेंथॉल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करतो. वय ४५ वर्षे आहे. मी पार्ट टाइम एमबीए फायनान्स करू शकतो काय? कसे करावे? – संतोष डी. पाटील

संतोषजी आपल्याकडे भरपूर पदव्या आहेत. त्यांचा अभ्याससुद्धा एमबीए समकक्ष आहे. मॅनेजमेंट, फॉरिन ट्रेड यांचा अभ्यास व त्यानंतर काम झालेले आहे. त्यामुळे एमबीए फायनान्स तेही पार्ट टाइम करून ‘शिक्षणाचा आनंद’ या पलीकडे त्यातून तुम्हाला फार काही मिळेल असे मला दिसत नाही. नोकरीमध्ये एक वर्षांची रजा घेऊन किंवा कंपनीतर्फे पाठवल्यास एक्झिक्युटिव्ह एमबीए पूर्ण वेळाचे केल्यास कदाचीत फायदा होईल. त्याचा खर्च व एक वर्षांची रजा यावर ते अवलंबून आहे.

अनेकांना एमबीएचे आकर्षण असते. त्यानंतर मिळणाऱ्या पॅकेजसंदर्भात ते करावेसे वाटते. मात्र योग्य वयात, उत्तम संस्थेतून व उत्तम पदवीनंतर केल्यासच त्याचा अधिक फायदा होतो हे समजून घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विचार करावा.

 

  • मी बीएस्सी फॉरेन्सिकच्या दुसऱ्या वर्षांला आहे. या क्षेत्रात पुढील शिक्षणाच्या व नोकरीच्या संधीबद्दल मार्गदर्शन करावे. – ओवी सलगरे

मुख्यत: फॉरेन्सिक लॅबमध्ये सरकारी नोकरी मिळू शकते. मात्र त्या जागा अत्यल्प आहेत. फॉरेन्सिकनंतर एखाद्या नेमक्या विषयात पदव्युत्तर केल्यास मानद सल्लागार म्हणून कारकीर्द सुरू होऊ शकते. बॅलिस्टिक, फिंगर प्रिंट, जेनेटिक असे त्यातील विषय असू शकतात. मात्र हा सारा रस्ता कठीण आहे. प्राध्यापकांशी चर्चा करून त्यातील स्पर्धा तुला समजू शकते. ओवीच्या निमित्ताने एक नोंद करावीशी वाटते. बरेचदा फॉरेन्सिक शब्दाचे आकर्षण घेऊन अनेक विद्यार्थी त्याकडे वळतात. काही प्रवेश करतात. मात्र ही वाट आकर्षणात किंवा मालिकांमध्ये दिसते तशी नुसतीच स्टायलिस्ट दिसण्याची आणि कामाची नाही. इथला रस्ता खडतर आहे. शिवाय काहीसा रुक्षही. त्यामुळे अनेकांच्या बाबतीत शिक्षणाआधीचे आकर्षण शिक्षण घेताघेताच संपून जाते. नोकरीमध्ये त्याचे रूपांतर झाल्यावर तर ते आणखीनच वाढून, आपला रस्ता चुकला की काय, अशी भीती वाटू शकते. याला अपवाद अर्थातच आहेत. परंतु फक्त फॉरेन्सिकच नव्हे तर कोणतेही करिअर निवडताना ते आपण का निवडत आहोत, शिक्षणानंतर यामध्ये नेमके काय काम आपल्याला करायचे आहे, त्याचे स्वरूप कसे असेल या सगळ्याची माहिती विद्यार्थ्यांनी करून घ्यावी. मगच त्या क्षेत्रात जाण्याचे ठरवाव.