14 October 2019

News Flash

करिअर मंत्र

मी एमएस्सीच्या शेवटच्या वर्षांला आहे. मी आता सेटची तयारी सुरू करणार आहे.

|| डॉ. श्रीराम गीत

मी एमएस्सीच्या शेवटच्या वर्षांला आहे. मी आता सेटची तयारी सुरू करणार आहे. मला शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. एमएस्सीनंतर नोकरीच्या आणखी काय संधी आहेत?   – स्नेहल पाटील

स्नेहल, आपण मास्टर्सचा विषयही लिहिलेला नाही त्यामुळे उत्तराला मर्यादा येतात. सेट पास झाल्यास किंवा नोकरी उपलब्ध झाल्यास त्याच विषयासाठी कॉलेजमध्ये नोकरी करणे हा पर्याय आहे. अन्यथा स्पर्धा परीक्षा, एमबीए, बँकिंग परीक्षा अशा वाटा शोधाव्या लागतील.

माझा मुलगा पाचवी पूर्ण करून सहावीत जाईल. त्याला मिलिटरी स्कूलमध्ये घालण्याचा व नंतर एनडीएसाठी तयारी करण्याचा विचार आहे. आम्हाला सोयीची तशी शाळा मिळाली नाही, त्याला अशा शाळेत पाठवण्याबद्दल मार्गदर्शन कराल का?   – राजेश त्रिभुवन

मिलिटरी स्कूलमध्ये मुलगा गेला म्हणून तो एनडीएमध्ये जाणारच असे होत नाही. तर तेथील साऱ्यांनाच एनडीए प्रवेश परीक्षेला बसवतात. त्यातील जे सक्षम असतात ते निवडले जातात. हे प्रमाण साधारण १-२ टक्के असते. मात्र उत्कृष्ट आणि स्वस्त रेसिडेन्शिअल स्कूल म्हणून त्याकडे पाहावे. शिस्त आयुष्यभर उपयुक्त असतेच. डेहराडून मिलिटरी कॉलेज या संस्थेत इयत्ता सातवीसाठी आपण प्रवेश परीक्षेद्वारे प्रयत्न करू शकता. हा अजून एक रस्ता उपलब्ध आहे. अन्यथा एनडीएची तयारी इयत्ता दहावीपासून सुरू होते. मुख्यत: गणित व सामान्यज्ञान हे खूप आवश्यक राहते.

माझी नातेवाईक दीप्ती हिने बीई (कॉम्प्युटर), एमबीए मार्केटिंग व मास कम्युनिकेशन केले आहे. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून ती सध्या नोकरीत आहे. तिला टीव्हीवरच्या जाहिरात क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी कसा प्रयत्न करणे आवश्यक आहे?   – भास्कर वडजे

जाहिरात क्षेत्र हे प्रचंड मोठे क्षेत्र आहे. त्याचा विस्तार छापील, दूरदर्शन वाहिन्या, समाजमाध्यमे, आकाशवाणी, मासिके, वृत्तपत्रे, सार्वजनिक ठिकाणी लागलेली होर्डिग्ज असा सर्वव्यापी असतो. या क्षेत्रातील सर्वच कंपन्या यातील प्रत्येक क्षेत्रासाठी विविध कामे करत असतात. खरे तर या साऱ्याचे रीतसर प्रशिक्षण तिच्या एमबीए व मास कॉम या पदव्यांदरम्यान झाले आहे. त्यामुळे दीप्तीने अनुभवातूनच पुढे जायचे आहे.  दीप्ती आणि साऱ्याच वाचकांसाठी एक लहानसे उदाहरण देतो. एखाद्या वाहिनीवर नवी मालिका सुरू होणार असेल तर त्याची वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात दिसते ना? म्हणजे जरी मालिका टीव्हीवर लागणार असेल तरीही त्याची माहिती वृत्तपत्रांतून दिली जातेच. सर्वच वाहिन्या या जाहिरातीसाठी चढाओढ करत असतात. हेच जाहिरात क्षेत्र आहे.

First Published on April 19, 2019 8:45 am

Web Title: loksatta career mantra 33