मी आयटीमध्ये बीई केले आहे. सध्या ह्य़ुमन रिसोर्स या विषयात एमबीए करत आहे. उपजिल्हाधिकारी परीक्षेची तयारी करत आहे. त्यासाठी मला मार्गदर्शन करावे. त्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत वा संदर्भ साहित्य वाचावे?   – जयश्री अहेर

राज्य लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी राजपत्रित अधिकारी पदांसाठी सामाईक परीक्षा घेतली जाते. या पदांमध्ये दरवर्षी उपजिल्हाधिकारी संवर्गीय पदांचा समावेश असेलच असे नाही. शिवाय ही पदे १०च्या आसपासच साधारणत: भरली जातात. या परीक्षेला बसणाऱ्या एक लाखांहून अधिक उमेदवारांची पहिली पसंती या पदालाच असते. त्यामुळे उपलब्ध पदे, उमेदवारांचा पसंतीक्रम आणि गुणवत्ता यादीतील क्रमांक यावर आधारित अंतिम निवड केली जाते. त्यामुळे साधारणत: पहिल्या १० ते १५ क्रमांकाच्या उमेदवारांचीच निवड या पदासाठी होऊ  शकते. शिवाय ही पदे भरताना राखीव जागांचे प्रमाणही पाळले जाते. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण की या पदांसाठी अत्यंत मोठी स्पर्धा असते. ही बाब लक्षात ठेवून या परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे निराशा येणार नाही आणि करिअरसुद्धा घडेल. या परीक्षेसाठी राज्यसेवा आयोगाने घोषित केलेल्या अभ्यासक्रमाचे निरीक्षण केल्यावर असे लक्षात येते की, साधारणत: कला/ वाणिज्य/ विज्ञान शाखेचा पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम समजून उमजून केलेले विद्यार्थी ही परीक्षा चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण होऊ शकतात. उमेदवारांचे चौफेर व्यक्तिमत्त्व तपासण्यासाठी या परीक्षेत प्रश्न विचारले जातात. दहावीपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचा अभ्यास केलेला असतो. तो पाया मजबूत करायला हवा. बारावीपर्यंतच्या वेगवेगळ्या शाखेतील मित्र-मैत्रिणींच्या मदतीने अभ्यास करायला हवा. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची सर्व विषयांची पुस्तके उपयुक्त ठरू शकतात. या पुस्तकांमधे नमूद संदर्भ ग्रंथ/संदर्भ साहित्याचा वापर करावा. पदवीस्तरीय अभ्यासक्रमासाठी विद्यापीठांनी सुचवलेली पुस्तके व संदर्भ ग्रंथ वाचावेत. त्याच्या नोट्स काढाव्यात. खासगी संस्थांनी एमपीएससीच्या अभ्यासक्रमावर विषयनिहाय अभ्यास साहित्य तयार केले आहे. त्याचे अवलोकन करावे. त्यामुळे अभ्यासाची दिशा ठरवणे सोपे जाऊ शकते. मात्र या संस्थांचे हे साहित्य परिपूर्ण असेलच याची खात्री देता येत नाही. या परीक्षेसाठी असलेली तीव्र स्पर्धा लक्षात घेऊन तू एमबीए पूर्ण करून नोकरी मिळवावीस व प्लॅन बी तयार ठेवावा. त्यामुळे निश्चिंत मनाने अभ्यास करता येईल. प्लॅन बी नसल्यास व सतत अपयश आल्यास काही वर्षांनी नैराश्याच्या गर्तेत सापडण्याची दाट शक्यता असते.