25 November 2020

News Flash

कलेतही आहे करिअर!

कला ही माणसाला जगण्याचे भान देते. त्यामुळे कला जोपासायला हव्यातच.

अभय कुलकर्णी, अभिनेते

कला ही माणसाला जगण्याचे भान देते. त्यामुळे कला जोपासायला हव्यातच. पण खरोखरच त्याची आवड आणि त्यात गती असेल तर नुसताच छंद म्हणून नव्हे तर करिअर म्हणूनही कलेकडे पाहायला हरकत नाही, असा विश्वास दिला, चित्रकार, समीक्षक महेंद्र दामले यांनी. लोकसत्ता मार्ग यशाचा या कार्यक्रमात चित्रकलेतील करिअरविषयी त्यांनी विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

महेंद्र दामले चित्रकार, समीक्षक

आपल्याकडे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी, राखीव जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी चित्रकलेच्या शिक्षणाचा फायदा होतो. मात्र त्या पलीकडे जाऊन खरोखरच चित्रकलेत करिअर करायचे असेल तर त्यासाठी औपचारिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. कला ही अभिव्यक्ती आहे. त्यामुळे तेथे काही वेळा गुणांचे ठोकताळे कामी येत नाहीत. मात्र औपचारिक शिक्षणाने त्याला एक चौकट मिळते.

खरेतर चित्रकलेची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. तरीही चित्रकलेत करिअर करावे किंवा चित्रकार व्हावे असा आवर्जून विचार करणारी मुले किती? कोणतीही कला आतून यावी लागते, उपजत असावी लागते असे म्हटले जाते ते बरोबरच. मात्र त्याचबरोबर शाळेत विद्यार्थ्यांचा नेमका ओढा किंवा कल कळत नाही त्यामुळेही कलेच्या शिक्षणाकडे काही अंशी दुर्लक्ष होते. त्याचबरोबर चित्रकला ही उद्योग क्षेत्राशी फारशी जोडली गेली नाही. त्यामुळे तिला ‘जॉब टायटल’ नाही. त्यामुळे इतर शाखांतील पदवी घेऊन चित्रकला त्याच्याबरोबरीने जोपासायची असे मत असते. आपले मूल डॉक्टर, अभियंता होणार हे सांगताना जी खात्री असते ती चित्रकलेच्या क्षेत्राविषयी नसते. कारण त्यामागे आवश्यक असलेली आर्थिक हमी नसते. पारंपरिक कला शिकणे म्हणजे उपाशी राहणे असा काहीसा समज दृढ झाला. त्याचबरोबर चित्रकलेच्या शिक्षणाचे स्वरूप तांत्रिक आहे. त्या तंत्राचे उपयोजन कसे करावे याचा अंदाज नसल्यामुळे या क्षेत्राबाबत मोठय़ा प्रमाणात गैरसमज पसरले. मात्र चित्रकलेचे क्षेत्र हे चित्र काढायची, त्याचे प्रदर्शन भरवायचे किंवा विक्री करायची एवढय़ा पुरतेच हे क्षेत्र मर्यादित नाही. अलीकडच्या काळात चित्रकलेतील औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर खरोखरच चांगले पैसे मिळू शकतात. अलीकडे मोठय़ा झालेल्या अ‍ॅनिमेशन उद्योग, जाहिरात क्षेत्र, डिझाइन क्षेत्र, कला क्षेत्रासाठी कन्टेन्ट रायटिंग, कलाविषय तज्ज्ञ म्हणून अशा अनेक क्षेत्रांमध्ये चित्रकलेतील शिक्षण घेऊन काम करता येऊ शकते. त्यामध्ये चांगला मोबदलाही मिळतो.

चित्रकलेतील औपचारिक शिक्षणामध्ये पदवी आणि पदविका अभ्यासक्रम असतात. त्यांना बारावीनंतर प्रवेश घेता येतो. त्यासाठी कला शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश परीक्षा घेण्यात येते. लहानपणापासून आवड असेल तर अधिक उत्तम. यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न होणेही तितकेच गरजेचे आहे. कला महाविद्यालयात मुख्य भर प्रात्यक्षिकावर असतो. त्यामुळे दिवसातले किमान ६ तास प्रात्यक्षिकात जाणार हे लक्षात घ्यावे लागते. विद्यार्थ्यांनी स्वत: एखादी कलाकृती करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वत: विचार करणे, जमले पाहिजे. फाइन आर्ट्समधील शिक्षणासाठी दहावीनतंर सरकारी डिप्लोमा आहे. बारावीनंतर पदवी आहे. कोणत्याही कला शाळेत पदवी प्रवेश घेताना सीईटी महत्त्वाची ठरते. ही परीक्षा शालेय स्तरावर असलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसारखीच असते. सीईटी परीक्षेत सामान्य ज्ञान हा विषय वाढीव असतो. इंटरमिजिएट परीक्षेत अ, ब श्रेणी मिळवणे महत्त्वाचे ठरते. सीईटी परीक्षेबरोबर इंटरमिजिएट परीक्षेला प्राधान्य दिले जाते. दहावीनंतर डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास हरकत नाही. अप्लाइड आर्ट आणि फाइन आर्ट्सची सीईटी एकच असते.

औद्योगिक क्रांतीपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या सर्व शिल्पकला, चित्रकला, टेक्स्टाइल डिझाइन, इंटिरिअर डिझाइन या फाइन आर्ट्स प्रकारात येत होत्या. औद्योगिक क्रांतीमुळे ज्या वस्तू बाजारात यायला लागल्या त्याची जाहिरात करणे गरजेचे होऊ लागले. त्यातून फाइन आर्ट्सचे कौशल्य या जाहिराती बनवण्यासाठी उपयोगात यायला लागले. याच माध्यमातून शिक्षणाची एक नवीन शाखा उदयाला आली ज्याला अप्लाइड आर्ट म्हटले जाते. फाइन आर्ट जाहिरात तयार करण्यासाठी उपयोगात आणले जाते त्याला आपण अप्लाइड आर्ट असे म्हणतो. हा फरक विद्यार्थी-पालकांनी लक्षात घ्यायला हवा.

संधी, नोकरी आणि करिअर हे तीन शब्द कोणताही अभ्यासक्रम निवडताना आपण सातत्याने वापरत असतो. शिकत असलेले शिक्षण समाजासाठी उपयोगाची आहे का? ते केल्यामुळे पैसे मिळतील का? या क्षेत्रात मला अपेक्षित असलेली कारकीर्द विकसित करू शकेल का?, असे प्रश्न असतात. पण कलेतही उत्तम करिअर दडलेले आहे. तुम्ही कला शिक्षक होऊ शकता. मानसशास्त्राची आवड असेल तर आर्ट थेरपिस्ट होता येते. संग्रहालयशास्त्रात शिक्षण घेऊन प्राचीन कलाकृतींचे जतन करणे, मृत प्राण्यांच्या अवशेषांवर काम करून त्यापासून पेंढा भरलेले आणि जिवंत वाटतील असे पुतळे बनवणे, आदी कामे तुम्ही करू शकता. क्यूरेटर होता येते. आर्ट सेलर होता येते. याही क्षेत्रात संधी आहेत, गुणवत्ता आहे, पैसेही आहेत केवळ गरज आहे ती, ते सगळे शोधण्याची. आपल्यातील गुणवत्तेला आकार देण्याची!

प्रशिक्षण तर हवेच! – अभय कुलकर्णी, अभिनेते

कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर त्याचे शिक्षण, प्रशिक्षण गरजेचे आहे. अभिनयाचेही तसेच आहे. आता अभिनय म्हणजे अंगभूतच त्यासाठी प्रशिक्षण वगैरे काही नको.. असा एक समज असतो. तो चुकीचा आहे. एखाद्या व्यक्तीकडे अंगभूत अभिनय असेलही पण म्हणून त्याचे प्रशिक्षण गरजेचे नाही, असे नव्हे.

या क्षेत्रात शिकण्यासारखे काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र सगळ्यात कठीण अभिनयाचे शिक्षण आहे. अभिनयात एका वेगळ्या व्यक्तीची व्यक्तिरेखा, त्यांचे आयुष्य जगावे लागते आणि ते सर्वात जास्त कठीण असते. जोपर्यंत तुम्ही एखाद्या परिघाबाहेर जात नाही तोपर्यंत त्यापलीकडेच जग आपल्याला अनुभवता येत नाही. आपण आत्मसंतुष्ट होतो आणि तिथे आपली प्रगती थांबते. अभिनयातील प्रशिक्षण ठोकळेबाज नसते.   आपली तात्त्विक बैठक पक्की होण्यासाठी ते गरजेचे असते. शिक्षणामुळे एक शिस्त लागते. एखादी भूमिका साकारण्यामागे काय विचार आहे, हे अभिनयाच्या प्रशिक्षणातून शोधता येते.

अभिनय किंवा सूर हा उपजत असतानाच काही कलाकार सवरेत्कृष्ट ठरतात यामागे एखादी सकारात्मक गोष्ट त्यांच्याकडे असते. यासाठी एखाद्या संस्थेत किंवा दिग्दर्शकाकडून शिक्षण घेणे महत्त्वाचे असते. जेव्हा मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेत शिक्षण घेतले त्या वेळी १३०० गुणांची वार्षिक परीक्षा व्हायची. नापास झाल्यावर संस्थेत शिक्षण घेता येत नव्हते. यात सरकारकडून दर महिन्याला विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असते. नापास झाल्यास ही शिष्यवृत्ती सरकारला परत करावी लागते. पूर्वी एनएसडीमधील अभ्यासक्रम बारावीनंतर होता. मात्र आता हे पदवीनंतरचे शिक्षण झालेले आहे. कोणत्याही शाखेतील शिक्षण या प्रवेशासाठी लागू होते. कला शाखेत असल्यास वाङ्मयाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. विज्ञान शाखेत प्रकाशयोजना, नेपथ्य यांसारख्या गोष्टी येतात आणि वाणिज्य शाखेचे असल्यास व्यवहार शिकता येतो. नाटकामध्ये आवड असल्यास वाचता येतील तितकी नाटकं वाचा. समीक्षा वाचा. नाटक, एकांकिका जे जमेल ते करा. नाटय़विषयक जाणीव वाढायला हवी. एनएसडीच्या प्रवेशासाठी किमान दहा नाटकात कोणत्याही विभागात काम करणे आवश्यक असते.

एनएसडीच्या मुलाखतीसाठी भारतातील दोन उत्तम नाटककारांच्या नाटके तयार करावे लागतात. येथे हिंदी आणि इंग्रजी भाषा येणे उपयुक्त असते. कविता सादरीकरणात दोन ओळीत दोन पानांचा अर्थ लिहायचा असतो. व्यक्तिमत्त्वाविषयी लेखी परीक्षा असते. विद्यार्थ्यांकडे निरीक्षणशक्ती असणे आवश्यक असते. कलाकाराला प्रत्येक क्षेत्र उत्तम येणे आवश्यक नसते, मात्र त्याची जाणीव असायला हवी. जे करायचे आहे ते निश्चित करा. अभिनय क्षेत्रात पैसा आहे. प्रसिद्धी आहे. मात्र प्रचंड मेहनत आहे. याची मानसिक तयारी असायला हवी.

अभिनयासाठी अनुभव महत्त्वाचा!   – अभिराम भडकमकर, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते

कला ही अंगभूत असावी लागते. मग त्यात शिकायचे काय? शिकून कला येते का? असे प्रश्न नेहमी विचारले जातात. कलेचे शिक्षण कशासाठी हवे हा गोंधळ आपल्याकडे कायमच दिसतो. मात्र, कला अंगभूत असली तरी त्याचे सादरीकरण करण्याचे प्रशिक्षण आवश्यक असते. पूर्वी मोठे कलाकार, दिग्दर्शक हे कलाकारांची पुढील पिढी घडवत असत. भालजी पेंढारकर किंवा त्या पिढीतील अनेकांनी कलाकार शब्दश: घडवले. तेव्हा औपचारिक प्रशिक्षण गरजेचे नव्हते. दिग्दर्शकांकडूनच तेव्हा मार्गदर्शन मिळत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कामाचा ताण, व्यावसायिक गणिते जमवण्याचा ताण असतो की दिग्दर्शकांनी ठरवले तरीही ते कलाकार घडवण्याच्या प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ देऊ शकतील असे नाही. त्यामुळे कलाकार प्रशिक्षित असेल तर त्याची निवड प्राधान्याने करण्यात येते. जेणेकरून त्याच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील, त्याने सादरीकरणाचे तंत्र अवगत केले असेल. तंत्र म्हणजे काय तर उदाहरणच द्यायचे झाले तर चित्रपट, नाटक दोन्हीकडे अभिनय ही सामाईक गोष्ट असली तरी कॅमेरासमोरील सादरीकरण आणि रंगभूमीवरील सादरीकरण यांमध्ये फरक आहे. तो नेमका काय, तो फरक का आहे हे शिकण्यासाठी औपचारिक प्रशिक्षण गरजेचे असते.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ललितकला केंद्र, पुणे, भोपाळमधील नाटय़विद्यालय आदी संस्था नाटय़विषयक अभ्यासक्रम देतात. एफटीआयमध्ये चित्रपट विषय प्रशिक्षण दिले जाते. इतरही अनेक विद्यापीठांचे नाटय़शास्त्राचे अभ्यासक्रम आता आहेत. बारावी अथवा पदवीनंतर त्यांना प्रवेश घेता येतो. लेखी परीक्षा, मुलाखत घेऊन प्रवेश दिला जातो. एनएसडीमध्ये परीक्षा, मुलाखत आणि त्याच्या जोडीला पूर्वानुभवही पाहिला जातो. मात्र, तो नसेल तरीही अभ्यासक्रमासाठी निवड झालेली अनेक उदाहरणे आहेत. एनएसडीला निवड झालेल्या विद्यार्थ्यांची एक कार्यशाळा असते. त्या कालावधीतही तुमचे परीक्षण होत असते. कुणाला काय आवडते, काय करू शकतात याचा अंदाज या कार्यशाळेत येतो. एनएसडीनंतर फक्त अभिनय करता येतो असे नाही. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, तांत्रिक बाजू अशा अनेक गोष्टींचे पर्याय असतात. या अभ्यासक्रमांनंतर एक पाश्र्वभूमी तयार होते. आपल्या आवडीनुसार नंतर करिअर करता येऊ शकते. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मेहनत, चिकाटी, स्वत:ला अद्ययावत ठेवणे, नवे शिकण्याची तयारी असणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2018 1:38 am

Web Title: loksatta marg yashacha 2018
Next Stories
1 स्टेथोस्कोपशी दोस्ती!
2 अभियांत्रिकीच्या प्रांगणात..
3 यूपीएससीची तयारी : मुख्य परीक्षा विशिष्ट क्षमतांची गरज
Just Now!
X