‘लोकसत्ता’तर्फे मार्ग यशाचा ही करिअर कार्यशाळा दादर आणि ठाणे या ठिकाणी नुकतीच पार पडली. या कार्यशाळेमध्ये विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केवळ संधी आणि पैसा याला प्राधान्य न देता क्षमता आणि आवड या निकषांवर करिअर निवडा, असा सल्ला करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी दिला.

बहुसंख्य मुले दहावीमध्ये मिळालेल्या टक्क्यांनुसार शाखेची निवड करतात. अनेकदा नातेवाईकांच्या दबावाला बळी पडतात किंवा आपल्या मित्रांच्याच वर्गात जायचे म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ते शाखा निवडतात. पण करिअरची निवड फक्त टक्क्यांवर असू नये. शाखा निवडताना प्रत्येक विद्यार्थ्यांने शाळेत आपल्याला अभ्यास करण्यासाठी सर्वात जास्त आवडणारे, झेपणारे विषय, मध्यम आवडणारे आणि अजिबात न आवडणारे व झेपणारे विषय याचा कागदावर तक्ता करावा. या तक्त्याच्या तीन रकान्यांमध्ये आपले शाळेतील विषय बसवावेत. सर्वात जास्त आवडणारे विषय आणि तुम्हाला दहावीत त्या विषयात मिळालेले गुण पाहून तुमची आवड कोणत्या शाखेकडे हे तुमचे तुम्हाला उमगेल.

शिक्षण – करिअर घडविण्याचा एक टप्पा

महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे करिअर नाही. करिअर घडविण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा टप्पा आहे. शाखा निवडताना संधी कोणत्या क्षेत्राला आहे, याची बहुतेकदा पालक विचारणा करतात. तुम्ही कला-वाणिज्य-विज्ञान अशा कुठल्याही विद्याशाखेतून शिक्षण घेतले असेल तरीही करिअरचे अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले होतात. उत्तम करिअर घडविण्यासाठी तुम्हाला त्या विषयाची किंवा करिअरविषयीची मनातून ओढ असली पाहिजे.

शाखा निवडण्यापूर्वी – तुम्ही निवडत असलेल्या शाखेची संपूर्ण माहिती घ्या. या शाखेमधून शिक्षण पूर्ण करून नोकरीमध्ये असलेल्या लोकांना प्रत्यक्ष भेटा, त्यांचे या क्षेत्राचे अनुभव जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला वास्तव परिस्थिती लक्षात येईल. केवळ संधी आणि पैसा या दोन निकषांवर शाखेची निवड किंवा करिअरची निवड करू नका.

विज्ञान शाखेतील संधी – विज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र यापलीकडेही अनेक संधी उपलब्ध आहेत. पशुवैद्यक, फिजिओथेरपी, स्पीचथेरपी आणि बी.एस्सी. नर्सिग अशा अनेक अभ्यासक्रमांना जागतिक स्तरावरदेखील उत्तम संधी आहेत.

अभियांत्रिकी क्षेत्र निवडताना – महाराष्ट्रात सध्या अभियांत्रिकी शाखेतील ७० प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बहुसंख्य विद्यार्थी त्यातील केवळ मोजक्या शाखांकडेच वळताना दिसतात. मात्र, आज उत्तम मागणी असलेल्या आणि अशा विद्याशाखांचे दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालये राज्यात असताना पेट्रोलियम अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, ऊर्जा अभियांत्रिकी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अशा शाखांचाही विद्यार्थी-पालकांनी विचार करायला हवा.

अभियांत्रिकी शाखेलाच जाण्याचे पक्के ठरले असेल तर पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे फायदेशीर आहे. दहावीमधील चांगल्या गुणांच्या आधारे पदविका अभ्यासक्रमासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यात अडचण येत नाही. बारावीनंतर सीईटी, जेईई आदी परीक्षा देण्याची गरज पडत नाही. पदविका मिळाल्यानंतर डिग्रीच्या थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो. पदविकेमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया पक्का झालेला असल्याने पदवी अभ्यासक्रमाला सामोरे जाणे सोपे होते. आणखी महत्त्वाचे म्हणजे अभियांत्रिकी पदविकेच्या बळावर रेल्वेपासून लष्करापर्यंत तसेच खासगी कंपन्यांतही नोकरी मिळू शकते. दहावीनंतर थेट पदविकेचे काही तोटेही आहेत. अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश घेतल्यानंतर करिअरच्या इतर वाटा बंद होतात. पदविकेच्या तिसऱ्या वर्षांला सर्वोत्तम गुण मिळाले, तरच पदवीच्या दुसऱ्या वर्षांत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. दुसऱ्या वर्षांसाठी मोजक्या जागा असतात आणि प्रवेशासाठी चुरसही मोठी असते.

वाणिज्य शाखेतील व्यावसायिक शिक्षण – सीए, सीएस असे अनेक पर्याय या शाखेत आहेत. मेहनत आणि चिकाटी असणाऱ्यांनीच या क्षेत्राची निवड करावी. यासाठी प्रवेश परीक्षा, मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा असे टप्पे आहेत.

हॉटेल मॅनेजमेंट – कोणत्याही शाखेचा विद्यार्थी बारावीनंतर या अभ्याक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. मात्र, त्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील सीईटी देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राच्या स्वतंत्र सीईटीत उत्तीर्ण झालात तर राज्यभरातील नामांकित संस्थांमधून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. त्याशिवाय हॉटेल मॅनेजमेंटचा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रमही अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे. फक्त कितीही तास काम करण्याची तयारी आणि शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते.

विधी क्षेत्रातील संधी – कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर सीएलएटी परीक्षा देऊन विधि महाविद्यालयात प्रवेश मिळविता येते. देशातील विविध शहरांत असलेल्या या नॅशनल लॉ स्कूलमधून पाच वर्षांचे कायद्याचे शिक्षण घेऊन तुम्ही करिअरची वाट निवडू शकता. मात्र यात नोकरीपेक्षा व्यवसायाच्या संधी जास्त आहेत.

नेव्ही आणि वैमानिक होण्यासाठी – मर्चन्ट नेव्ही हेदेखील क्षेत्र विज्ञान शाखेतील मुलांकरता खुले आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क जास्त असले, तरी या नोकरीचे वेतनही तसेच भरभक्कम मिळते. वैमानिक होण्याची आकांक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बारावीला विज्ञान शाखेत भौतिक, रसायन शास्त्र आणि गणित विषय घेणे आवश्यक आहे. अनेक खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्था यासंबंधीचे प्रशिक्षण देतात. त्यात रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी ही आघाडीची संस्था आहे. याचे शुल्क ३५ लाखांच्या घरात असले तरी नोकरीनंतर काही महिन्यांत शुल्कवसुली होईल इतके वेतन तुम्हाला मिळते.

फाइन आर्ट्स – चित्रकला आणि गणित या दोन्हींची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र या विषयातही करिअर घडविता येईल. त्यासाठी बारावीनंतर ‘नाटा’ ही परीक्षा द्यावी लागते. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स या पदवीसाठीही प्रवेशपरीक्षेला सामोरे जावे लागते. हा पर्याय सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. डिझायनिंग या विषयात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डिझायनिंगमध्येही इंटिरिअर, फॅशन, प्रॉडक्ट असे अनेक प्रकार आहेत. अहमदाबादची नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायनिंग ही संस्था या अभ्यासक्रमासाठी सर्वोत्तम आहे. या संस्थेच्या प्रवेशासाठी बारावीनंतर प्रवेश परीक्षा द्यावी लागते.