करिअरच्या प्रगतिपथावर कोणतीही पायरी वगळून चालत नाही. प्रत्येक पायरी तितक्याच काळजीपूर्वक चढणे गरजेचे असते. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी-पालकांमध्ये एक गोंधळ निर्माण होतो. ७० टक्के पडले तर विज्ञान, ८० टक्के मिळाले तर आयआयटी ९० टक्के पडले तर डॉक्टर बनू. पण यापलीकडे जाऊन एक विचार करावा लागतो. बेस्ट ऑफ फाइव्हचे टक्के किती आहेत हे पाहणे गरजेचे असते. समाजशास्त्र आणि भाषेत जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला तर गोंधळ नक्कीच होतो.  विद्यार्थ्यांची विषयातील आवड महत्त्वाची असते. पूर्ण गुण मिळणारा विषय आवडताच असतो असे नसते. कधीही नावडत्या विषयात शिकण्यापेक्षा आवडीला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे पण त्याचसोबत आपली क्षमता किती आहे, याचाही विचार व्हायला हवा. दहावीनंतरची सुरुवात म्हणजे एकाच रस्त्यावरची वाटचाल नाही. सगळ्या रस्त्यांची माहिती करून घ्यावी. एकाच रस्त्यावर थांबू नका. डॉक्टर, इंजिनीअर, आयटी, सीए, एमबीएस, हॉटेल मॅनेजमेंट असे असंख्य मार्ग आहेत. आपल्यापुढे असलेले करिअरचे मेन्यूकार्ड वाचायला शिका. कमी गुणांमुळे नाराज होऊ नका. जर विज्ञानात आवड नाही पण भाषा छान आहे तर वाचन वाढवा. त्यामुळे दरवर्षी दोन टक्के वाढतील. मेहनत करायला सुरुवात करा. पदवी परीक्षेत दहावीपेक्षा दहा टक्के वाढलेले दिसतील. दरवर्षी तीन टक्के वाढले तरी कल्पनेबाहेरचे यश तुमच्या हाती येते. निश्चय महत्त्वाचा आहे.  दहावीनंतर किमान सहा रस्ते असतात. तीन पारंपरिक तर तीन वेगळे मात्र कोणताही रस्ता उत्तम करिअरकडे घेऊन जातो. कला, वाणिज्य, विज्ञान सर्वानाच माहिती आहे.

कलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांला कमर्शियल आर्ट्सही करता येऊ शकते. चित्रकलेच्या काही परीक्षा असतात. ज्या आठवीत आणि नववी इयत्तेत दिल्या जातात. मात्र दहावीत विद्यार्थी गेले की चित्रकलेचा कागद आणि पेन जरी समोर ओढले तरी पाठीत धपाटा बसतो. मात्र इंटरमिजीएट परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाली तर त्याचा उपयोग कमर्शियल आर्ट्ससाठी नक्की होतो. एमसीव्हीसी हा एक उत्तम पर्याय आहे. हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल, टुरिझम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

प्रत्येक क्षेत्रात संवाद आवश्यकच असतो. वाचन आणि लिखाणाचा वेग वाढवा. दरवर्षी स्वत:च्या कौशल्यात वाढ करा. विशेष कौशल्य समजून घ्या. टक्केवारी इतकीच कौशल्ये महत्त्वाची असतात. वर्तमानपत्रे वाचणे, घरगुती सामानाचे बाजारभाव घरातल्या मोठय़ांकडून जाणून घेणे, गरजेचे असते. आपल्या गावाबद्दल पानभर माहिती लिहून काढा. रोज जरी लिहून काढलीत तरी त्यात फरक जाणवेल. कारण तुमची जाणीव प्रगल्भ होत जाईल. हीच गोष्ट स्वत:विषयी. अनेक ठिकाणी स्वत:बद्दल बोलायला सांगितले जाते. इथेच उमेदवार कमी पडतात. आपल्याविषयी थोडक्यात पण महत्त्वाचे आणि संतुलित कसे बोलावे, लिहावे ही सवय आपली आपणच लावून घ्या. त्यासाठी असे छोटे उपक्रम करत राहा. यामुळे कौशल्य वाढीस लागते. परिणामी व्यक्तिमत्त्व सुधारते. पुस्तकी ज्ञानाइतकेच सामान्य ज्ञान आणि व्यवहार ज्ञानाचे शिक्षण घेणेही गरजेचे आहे. चांगले लिहिणे, नेमके वाचणे आणि आवश्यक ते बोलणे शिकायला भरपूर वेळ लागतो. यासाठी लहानपणापसूनच स्वत:ला वाचनाची सवय लावून घ्या. आर्ट्स म्हणजे निव्वळ भाषा नव्हे तर ते जीवनाला व्यापणारे सार आहे. यामुळे समाज घडतो. अमेरिकेमध्ये डॉक्टर्स, इंजिनीअर्सना अजिबात मागणी नाही. पण मानसशास्त्रज्ञाला, समाजशास्त्रज्ञांना अधिक किंमत आहे. एखादी परदेशी भाषा शिकलात तरीही भरपूर वाव आहे. वाणिज्य शाखेत तर प्रत्येकाला प्रगतीची संधी आहे. यश आहे. पण नाइलाज म्हणून वाणिज्य निवडू नका. हे व्यापाराचे क्षेत्र आहे. त्यामुळे आधी व्यवहार समजून घ्या. बँकिंग, टॅक्सेशन, इन्शुरन्स, शेअर मार्केट, फायनान्स, इम्पोर्ट, एक्स्पोर्ट आहे. तर विज्ञान शाखेची तीव्र गरज गणित ही आहे. या शाखेत आल्यानंतर मेहनत घेणे महत्त्वाचे ठरते. संशोधक व्हायचे असेल तर विज्ञानच घ्यावे लागते. आर्किटेक्चरमध्ये फार नोकऱ्या नाहीत. बहुतांश लोक स्वव्यवसायच करणे पसंत करतात. पण मुलींचा या क्षेत्राकडे अधिक कल आहे. यासाठी कोणत्याही शाखेतून गणित घेणे गरजेचे असते. त्यानंतर नाटाची परीक्षा द्यावी लागते. बारावीची टक्केवारीही पाहिली जाते. आयटीआयचा पर्याय हा उत्तम आहे. ट्रॅव्हल्सचा पर्याय देखील चांगला आहे. याचबरोबर हेल्थ केअर इंडस्ट्री, हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा कोर्स कोणत्याही पदवीनंतर करता येतो. तर संगीत, नाटय़, नृत्य करायचे असेल तर बारावीनंतर ललित कलाकेंद्रासारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेता येते. पण या क्षेत्रात यश मिळवणे खडतर असते. रेडिओवर आरजे होण्यामध्येही उत्तम करिअर आहे. यासाठी पदवीधर असणे, वाचन, अनुभव आणि समज असणे खूप गरजेचे असते.

कोणतेही करिअर निवडलेत तरी त्यात मनापासून काम करा. आपल्यासमोरील रस्ते कंधी संपत नाहीत. फक्त  त्यावरून उत्तम वाटचाल करण्यासाठीचा शोध सुरू ठेवा!

 

अभ्यासाला घाबरू नका! – प्रसाद चाफेकर

यूपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास १६ ते १८ तास करावा लागतो यासारख्या अनेक दंतकथा आपण ऐकत असतो. मात्र अशा दंतकथांना न घाबरता मेहनत करून परीक्षेला सामोरे जावे. आठवी ते बारावी इयत्तेत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने वळण लागते. या कालावधीत घेतलेल्या निर्णयाचा निकाल तुम्हाला पाच ते सात वर्षांनी दिसून येणार असतो. जो काही अभ्यास कराल तो लक्षपूर्वक करा. जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास करा. जेणेकरून त्या अभ्यासाचा फायदा भविष्य घडविण्यासाठी होईल. भारतात विविध क्षेत्रांमध्ये स्पर्धा वाढत आहेत. सिव्हिल सव्‍‌र्हिसेस म्हणजे प्रशासकीय सेवा. प्रशासनाच्या आणि देशाच्या सर्वोच्च पदावर असणारे अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा या पदांसाठी दिली जाते.

यूपीएससीचा अभ्यास करताना अनेकजण आयुष्यातील आठ ते नऊ वर्षे घालवतात. त्यामुळे अभ्यास कधी सुरू करावा हे महत्त्वाचे आहे. इयत्ता ८ वीपासूनच अभ्यास सुरू केला तर तुम्ही तुमच्या पदवीच्या शिक्षणापर्यंत थकून जाता. त्यानंतर पुन्हा पुढील तीन र्वष तरी सात-आठ तास अभ्यास करणे गरजेचे असते त्यावेळी आपोआप कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली अभ्यासाची पद्धत ओळखून मार्ग निवडला पाहिजे.  मनापासून प्रशासनाच्या पदांवर काम करण्याची आवड असेल तरच या पर्यायाची निवड करा.

वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी तुम्हाला या परीक्षेत मिळत असते. त्यामुळे जगाबद्दल अनेक गोष्टी समजून घेण्याची ही एक उत्तम संधी असते. भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. या परीक्षेचा अभ्यास अवघड आहेच पण तो सोपा करण्यासाठी तुमच्याकडे सुसंगतपणा आणि समर्पणाची तयारी महत्त्वाची असते. हा अभ्यास करताना अभ्यासाचे तंत्र शिकून घेणे अधिक महत्त्वाचे असते. जी मुले पहिल्या दोन ते तीन प्रयत्नांत यशस्वी होतात ते विद्यार्थी या परीक्षेचे संशोधन करून येतात. आपल्याला परीक्षेत यश मिळवायचेच आहे तर या परीक्षेला कोणता आणि कशा प्रकारचा अभ्यास करणे गरजेचे आहे हे स्वत:हून ठरवावे लागते.  तुम्ही शाळेत सामान्य विद्यार्थी असाल तरी चालते. पण या परीक्षेचा अभ्यास किती मनापासून करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. अभ्यास करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील एक मार्ग म्हणजे ज्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे त्यांच्या मुलाखती यूटय़ूबवर बघाव्यात. तसेच आपली क्षमता, आपल्याकडे कोणत्या गोष्टींची कमतरता आहे आणि आपण काय करू शकतो याचा विचार होणे गरजेचे असते. याला स्वनिरीक्षण म्हणतात. जेव्हा आपण हे स्वनिरीक्षण करतो त्यावेळी आपल्याला कोणत्या विषयावर भर देणे गरजेचे आहे हे समजते. एखादे विषयाचे तंत्र समजून घेताना सुरुवातीपासून समजून घ्यावे. मध्येच विषयाची सुरुवात केली तर त्या विषयाच्या व्याख्याच माहीत नसल्याने अभ्यास करणे कंटाळवाणे होते. विषयांचा पाया पक्का असणे   गरजेचे आहे. ५ ते १२ वीच्या विषयांच्या पुस्तकांवर भर द्यावा. त्यानंतर केंद्रीय सेवा आयोगाने त्यांच्या संकेतप्रणालीवर दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास करण्यास सुरुवात करावा. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा.

परीक्षेची मागणी काय आहे याकडे लक्ष द्या. त्यानुसार तयारी करा. ही परीक्षा अनेकजण देत असतात. त्यामुळे कधीकधी एखाद्या गुणाच्या फरकानेही संधी हुकते. अशावेळी तुमचा प्लॅन बी तयार असू द्या. या परीक्षेसाठीच नव्हे तर इतरही अभ्यासक्रमांसाठी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि भरपूर वाचन, अभ्यास, टिपणे काढण्याची सवय आणि सराव नियमितपणे ठेवा. तयारीला सुरुवात केल्यानंतर अनेक जण वेगवेगळा सल्ला देण्यासाठी पुढे येतील. कशाला नसत्या फंदात पडतोय, असेही सांगतील. पण पालकांनी आपल्या पाल्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि त्याचा आत्मविश्वास वाढवावा. आपले  व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा.

 

आत्मविश्वास बाळगा! – स्वाती थोरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यातील विविध पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. कोणताही पदवीधर या पदांसाठी परीक्षा देऊ शकतो. त्यामध्ये तीन परीक्षांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘अ’ श्रेणीतील अधिकारी जसे डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार ही पदे या परीक्षांच्या माध्यमातून भरली जातात. त्याच परीक्षेतून गुणवत्तेच्या आधारावर ‘ब’ श्रेणीचे नायब तहसीलदार, बीडीओसारख्या पदांवरही नियुक्ती केली जाते. तसेच ‘क’ श्रेणीमध्ये पीएसआय (पोलीस निरीक्षक), मंत्रालयातील साहाय्यक(असिस्टंट) यासारख्या पदांसाठी एकत्रित परीक्षा घेतली जाते. तिन्ही श्रेणीसाठी वेगवेगळी घेण्यात येते, मात्र यामध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आपल्याला यापैकी काय व्हायचे आहे, यानुसार अभ्यास करणे आवश्यक आहे. अधिकारी पदाच्या वलयाला नुसते भुलू नका. त्यामागची जबाबदारी लक्षात घ्या.    ती घ्यायची तयारी असेल तर जरूर ही परीक्षा द्या.

मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा उत्तम असायला हव्यात. त्यासाठी वृत्तपत्र आणि पुस्तकांचे भरपूर वाचन हवे.  इतिहास, राजकारण, विज्ञान, कृषी अशा  जवळपास दहा विषयांचा अभ्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी करावा लागतो. त्याचबरोबर सामान्य अध्ययनचा भागही महत्त्वाचा आहे. चांगली चर्चासत्रे, व्याख्यानांना हजेरी लावावी. आपल्या व्यक्तिमत्त्व घडणीत याचा मोठा हातभार लागतो.

आपल्याला नेमकी कोणत्या पदासाठी परीक्षा द्यायची आहे, त्यांची नावे, त्यांचे काम हे समजून घ्या. तुम्हाला कशा प्रकारचे काम करायला आवडते त्यानुसार निवड करा. शिवाय एमपीएससी दिलेल्या सर्वानाच लाल दिव्याची गाडी मिळत नाही. प्रत्येकाचे काम, स्वरूप वेगळे असते. हे समजून घ्या. मला माहिती होते, माझ्या व्यक्तिमत्त्वानुसार मला पोलीस दलातील कोणतेही पद योग्य ठरले नसते. त्याऐवजी कार्यालयात बसून मी अधिक सक्षमतेने काम करू शकले असते. त्यामुळे मी सेवाकर विभागातील साहाय्यक आयुक्त या पदाची निवड केली.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनेक विद्यार्थी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होतात, पण मुलाखतीत अगदी लहानसहान गोष्टींमुळे अनुत्तीर्ण होतात. अनेकांना स्थिर बसण्याची सवय नसते. कुणाला बोटांनी पेनाशी चाळा करण्याची सवय असते. या सवयी अगदी क्षुल्लक वाटतात पण मुलाखतीदरम्यान  त्यांचा चुकीचा प्रभाव पडू शकतो. काहीजणाना ताठ बसायची सवय नसते. काहींना हात आणि शरीराची ठेवण कशी राखावी, याची माहिती नसते, या गोष्टी शेवटच्या क्षणी कळल्यावर त्या बदलणे कठीण होते. त्यासाठी फार कमी वेळ राहिलेला असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ताच म्हणजे १०-१२ वीतच समजून घ्या. त्यानुसार स्वत:ला तयार करा. मुलाखतीकडे विशेष लक्ष द्या. कारण मी मंडळी आपल्या प्रत्येक हालचालीवरून परीक्षण करत असतात. उत्तरे देतानाही आपली मते संतुलित असतील, याकडे लक्ष द्या. उगाच टोकाचे विचार मांडू नका.

पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले तरच मी अभ्यासाला सुरुवात करेन किंवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले तर मग मुलाखतीचं बघेन, असं म्हणूच नका. आपण जी परीक्षा देतो आहोत, तो आपला पहिला आणि शेवटचा प्रयत्न आहे, वाट्टेल तितके कष्ट घेऊन त्यात यशस्वी होऊच असा आत्मविश्वास बाळगून अभ्यासाला लागा.

 

वाचाल तर वाचाल.. – अनिल नागणे

प्रशासन आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये जाण्याची आवड असेल त्यांनी दहावी-बारावीपासूनच एमपीएससीच्या तयारीला सुरुवात करावी.  परीक्षा देण्यासाठी सोयीस्कर होईल म्हणून शाखेची निवड करण्याऐवजी क्षमता आणि आवडीच्या क्षेत्राची निवड करा.  पदवीनंतरच परीक्षा देते येते पण त्याआधी अभ्यास सुरु करता येतो, हे मात्र लक्षात ठेवा. चालू घडामोडी हा विषय एका वर्षांत समजण्यासारखा नाही. त्यासाठी वर्तमानपत्रांचे रोजचे वाचन हवे. राज्य सेवेचा अभ्यासक्रम नीटपणे पाहिल्यानंतर तुम्हाला वर्तमानपत्रातून कोणते विषय वाचावेत, हे समजून येईल. अर्थशास्त्र हा विषय शाळा- महाविद्यालयांमध्ये शिकलो असलो, तरी प्रत्यक्ष प्रशासनामध्ये हा विषयाचे महत्त्व काय आहे, हे रोजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून समजू शकते.

परीक्षेतील आव्हाने – राज्य सेवेच्या परीक्षेसाठी सुमारे ५-६ लाख विद्यार्थी दरवर्षी बसतात. त्यातील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाते. यामधून सुमारे ३०० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतात. साधारणपणे दोनशे ते अडीचशे जागांसाठी यामधून अंतिम निवड केली जाते. तेव्हा या वर्षभराच्या प्रवासामध्ये मोठय़ा प्रमाणात स्पर्धा तर असतेच शिवाय कसून अभ्यास आणि चिकाटीही आवश्यक असते. या परीक्षांची काठिण्यपातळीही अधिक असते. तेव्हा या तीन टप्प्यांमध्ये अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने तयारीला सुरुवात करा. तेव्हा पहिल्या प्रयत्नामध्ये निवड नाही झाल्यास आपल्या अभ्यासाची दिशा योग्य आहे का याची पडताळणी करून पुढच्या परीक्षेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

पदवीला उत्तम गुण मिळतील, याची खात्री करून घ्या. अनेकांनी परीक्षेसाठी म्हणून पदवी नावापुरती केलेली असते. त्यानंतरची काही वर्षे एमपीएससीच्या अभ्यासात घातलेली असतात. मग  त्यात अपयश आल्यावर पुढे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.म्हणूनच पर्यायी करिअरचाही विचार व्हायलाच हवा. राज्य सेवेशिवाय अन्य करिअरचे पर्याय उपलब्ध असतील अशा पद्धतीने पदवीच्या अभ्यासक्रमाची निवड करावी.

या परीक्षेसाठी शिकवणी लावावी का, याचे उत्तर आपले आपणच शोधायचे आहे. चांगल्या ठिकाणी  शिकवणी लावल्यास त्याचा फायदा नक्कीच होईल, परंतु शिकवणी लावली म्हणजे अधिकारी होणारच अशी काहीही हमी नाही. शिकवणी न लावताही स्वअभ्यासाने उत्तम यश मिळवता येते.

कोणत्याही परीक्षेत यशस्वी व्हायचे तर उत्तम वाचन हवेच. स्पर्धा परीक्षाही त्याला अपवाद नाहीत. रोजचे वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे. संपादकीय वाचल्याने तुमचा दृष्टीकोन विकसित व्हायला मदत होते. सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी बातम्यांवर लक्ष ठेवलेच पाहिले. एमपीएससी होण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी अभ्यासाच्या जोरावर यश नक्कीच मिळवता येते.